Total Pageviews

Sunday, 10 June 2018

काश्मिरमध्ये इसीस, अल कायदाचा चंचु प्रवेश Source: तरुण भारतJun 3 2018 अभय बाळकृष्ण पटवर्धन

२२/२३ मार्च २०१८ च्या रात्री काश्मिरमधील सोपोर क्षेत्रात भारतीय सेनेने अटीतटीच्या चकमकीत सहा जिहाद्यांना अल्ला प्यारे केले. त्या आधी २२ मार्चला दिवसाढवळ्या कुपवाराच्या सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्सच्या (सीआपीएफ) कंपवर झालेल्या फिदायीन हल्ल्यात चार सीआरपीएफ जवान शहीद झाले आणि उत्तरादाखल दोन जिहादी मारले गेले. मात्र, पाकिस्तान वा भारतामधील कुठल्याही दहशतवादी/जिहादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी घेतली नाही. त्याच दिवशी दिल्लीतील पाकिस्तानी दूतवास त्याचप्रमाणे इस्लामाबादमध्ये झालेल्या पाकिस्तान डे ला दिल्लीमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्रालय व सेनेचे वरिष्ठ आधिकारी आणि पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायुक्त व तेथील इंडियन मिलिटरी अटॅचींनी हजेरी लावल्यावर दूरचित्रवाणी आणि इतर प्रसारमाध्यमांमध्ये राजकीय शिष्ठाचार की जाज्वल्य देशभक्ती? हा गदारोळ माजला. काश्मिरमधील हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा काहीच संबंध नसतो हे हल्ले इसीस (इ्स्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया) किंवा अल कायदाचे मुजाहिदीन करतात असे आधी पाकिस्तानी चर्चाकारांनी दूरचित्रवाणीवर आणि नंतर त्यांच्या सरकारी प्रवक्त्यांनी भारत सरकारतर्फे दोषारोपण झाल्यावर सांगितले. त्यामुळेच काश्मिरमध्ये इसीस आणि अलकायदाने पाय रोवायला सुरवात केली आहे का हा प्रश्‍न उभा ठाकला.
१७ नोव्हेंबर १७ ला काश्मिरमधील झकुरा येथे सेना आणि पोलिसांबरोबरच्या चकमकीत श्रीनगर जवळील परिंपोरा गावातला मुगीस अहमद मीर अल्ला प्यारे झाला. १९ नोव्हेंबरला या कुख्यात जिहाद्याचा जनाजा निघाला त्या वेळी पहिल्यांदा अन्सर गझवत अल हिन्द(एजीएएच) या कोर्‍या करकरीत जिहादी संघटनेचे फलक आणि झेंडे दिसून आले. मुगीस मीरची कफन पेटी अल कायदा आणि इसीसचा पांढरा लोगो असलेल्या काळया कपडयामध्ये गुंडाळलेली होती आणि जिहाद्यांचे दफनस्थान असलेल्या ईदगाहकडे जाणार्‍या ५००० लोकांच्या त्या जनाजा तील अनेक तरूणांच्या हातात शस्त्र आणि अलकायदा व इसीसचा पांढरा लोगो असलेले काळे झेंडे होते. यानंतर डिसेंबर १७ मध्ये मारल्या गेलेल्या हिजबुल मुजाहिदीनच्या सज्जाद गिलकारला सुध्दा मलरत्तामधील जनाजाच्या वेळी अशाच प्रकारच्या झेंड्यामध्ये गुंडाळण्यात आल्याचे दिसून आले. काश्मिरचे आयजी मुनिर खान यांच्या नुसार पोलिसांनी दोन्ही वेळा जनाजात फडकावलेले एजीएएचचे झेंडे व फलक काढलेत काही लोकांना तपासासाठी अटक केली आणि कोणी उगाचच अंसर गझवत अल हिंदच्या नावाचा दुरूपयोग करतो आहे का याचा तपास सुरू केला.अर्थात आजतागयात जम्मू काश्मिर सरकारकडून याबद्दल पुढे काहीच कळलेले नाही.
‘लिव्हिंग अवर होम्स, अवर फॅमिलीज्, ऑल कंफर्टस् ऑफ द वर्ल्ड अंड सॅक्रिफायसिंग अवर फ्युचर्स; वुई हॅव कम टू द फिल्ड ऑफ अ‍ॅक्शन सो दॅट, ऑनर ऑफ अवर पिपल इज सेफ गार्डेड अंड खलिफत इज एस्टॅब्लिश्ड इन काश्मिर अंड द वर्ल्ड’ या शब्दात फ्लंबॉयन्ट जिहादी बुरहान वानीने मे १६ मध्ये काश्मिरात इस्लामी खलिफत स्थापन करण्याची घोषणा केली होती. अमेरिकेत २७ जुलै १६ च्या द गार्डियन वृत्तपत्रात ग्लोबल इस्लामिक फ्रन्ट या अल कायदा व इसीसच्या संयुक्त प्रसिध्दी खात्यांनी काश्मिरमध्ये पॅन इस्लामिक ग्रुप, एजीएएचची शाखा स्थापन झाल्याची बातमी दिली. बुरहान वानी अल्ला प्यारे झाल्यानंतर इस्लामी खलीफतला पाठिंबा न देणार्‍या हुरियत काँन्फरंसच्या प्रमुख नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे हिजबुल मुजाहिदीन या जहाल जिहादी संघटनेतून निष्कासित करण्यात आलेला नुरपूरा त्रालचा कुख्यात जिहादी झकीर रशिद भट उर्फ झकीर मुसा याला यासंघटनेचा सर्वेसर्वा घोषित करण्यात आले. काश्मिरमधील हुरियत नेत्यांवर इस्लामिक स्टेटच्या (खलिफत) स्थापनेतील सर्वात मोठा अडथळा असल्याचा आरोप करत झकीर मुसाने पाकिस्तानमध्ये लपलेल्या हिजबुल मुजाहिदीन प्रणेता सलालुद्दीनसंदर्भात ‘मॅन इन पाकिस्तान, सिटिंग इन एसी रूम ऑन लक्झुरियस सोफा’ असा डिवचणारा टोला लगावला होता.
अन्सर गझवत अल हिन्दच्या स्थापनेला हिजबुलचा सलालुद्दिन आणि हुरियतच्या सय्यद अली शाह गिलानी मिरवाइझ ऊमर फारूख आणि मोहम्मद यासीन मलीकनी काश्मिरचे स्वातंत्र्य युध्द आम्हीच स्वयंभूरित्या चालवू यामध्ये अल कायदा किंवा इसीस सारख्या काश्मिरमध्ये पायही न रोवलेल्या विदेशी मुस्लीम संघटनांनी हस्तक्षेप करू नये या शब्दात विरोध दर्शवला. यानंतर झकीर मुसा भूमीगत झाला तरी देखील त्याच्या समर्थनार्थ श्रीनगरच्या खोर्‍यातील तरूणांनी मुसा मुसा; झकीर मुसाचा नारा बुलंद केला. याचेच पडसाद शुक्रवारच्या नमाजानंतर कायदा हाती घेतलेल्या जमावाने श्रीनगरमधील जामा मशिदीसमोर २२ जून १७ ला काश्मिर पोलिस डीएसपी अयुब पंडीतच्या केलेल्या हत्येच्या आणि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींच्या काश्मिरी संत मिर सय्यद हमदानीच्या मजारवर १५ नोव्हेंबर १७ ला केलेल्या अर्दासच्या वेळीदेखील उमटले.
सज्जाद गिलकार आणि मुगीस मिरच्या जनाज्यांच्या वेळी हुरियत कॉन्फरंस नुमाईंद्यांच्या हकालपट्टीची प्रकर्षाने जाणीव होऊन नेहमी करण्यात येणार्‍या हमे चाहिये आझादी आणि जीवे जीवे पाकिस्तान या घोषणांना फाटा दिला गेल्याची लक्षणीय बाब उघड झाली. दोन्ही जनाज्यांनंतर खोर्‍यात कडकडीत बंद पाळण्यात आला कारण ते दोघेही काश्मिरमध्ये इस्लामी खलिफत स्थापनेसाठी प्रयत्नशील होते. ज्या वेळी गृहमंत्री राजनाथ सिंह, डीजीपी सैष पॉल वैद आणि आयजी मुनिरखान काश्मिरमध्ये इसीस, अल कायदा किंवा एजीएएचच नामोनिशाण नाही असे वार्ताहारंना, वृत्त परिषदेत सांगत होते त्याच वेळी मुगीस मिरचा जनाजा दफन भूमीकडे कूच करत होता आणि मुगीस भाईका एक पैगाम, कश्मिर बनेगा दारूल इस्लामच्या नार्‍यांनी श्रीनगरच आकाश दणाणून गेले होते. इतकेच नव्हे तर धिस इज मुगीसस मेसेज दॅट काश्मिर विल बिकम ए इस्लामिक स्टेटहे स्लोगन आणि ओसामा बिन लादेन आणि त्याच्या लहान मुलाला मांडीवर घेऊन हाती गन असलेला मुगीस मिर हे चित्र एजीएएचच्या बॅनरवर ठळकपणे दिसत होत. मात्र यावर काहीच प्रशासकीय प्रतिक्रीया न आल्यामुळे, यू ट्युबवर असलेल्या याच्या घटनेच्या व्हिडियोकडे प्रशासनानी दुर्लक्ष केले असावे असे वाटते.
इसीस या मुस्लीम जगतातील प्रभावशाली जिहादी संघटनेच्या एका हाकेवर जगभरातील मुस्लीम तरूणाई या संघटनेत सामील होऊन स्वत:च्या देशात दहशतवादी, आत्मघातकी हल्ले करायला उद्यूक्त होतांना दिसते. तोच प्रभाव अल कायदाचा देखील आहे. काश्मिर आणि तद्नुसार भारतामधील तरूणही यांच्या संमोहनातून सुटलेले नाहीत. इसीस, अल कायदा व एजीएएचच्या आध्यात्मिक दृष्टीकोनातून काश्मिरमधील भारतीय सेना व सुरक्षादल कुफर: नॉन बिलिव्हर्स असून लश्कर ए तायबा, जैश ए महम्मद सारख्या पाकिस्तानी जिहादी संघटनाचा उद्देश जगात इस्लामिक साम्राज्य स्थापने ऐवजी काश्मिर पादाक्रांत करून तेथे राज्य करणे हा असल्यामुळे इसीसच्या नावाखाली काश्मिरमध्ये कार्यरत होण्यासाठी प्रत्येक जिहाद्याला आणि संघटनेतील सर्वांना, खलीफा अबु बक्र अल बगदादीशी त्याची/त्यांची बायात (स्पिरिच्युअल अलीजियंस) आहे अशी शपथ घ्यावी लागेल आणि ती मंजूर झाल्यानंतरच तो जिहादी आणि ती संघटना खलीफतचा हिस्सा आहे असे मानले जाते. फिलिपिन्सच्या अबु सयाफ या जहाल कट्टर पंथी संघटनेनी २०१६ मध्ये अशी बायात (आध्यात्मिक शपथ) घेतल्यानंतरच त्यांना इसीसने आपल्या पदराखाली घेतले. केन्द्र व राज्य सरकार व इटलिजंस एजंसींनी मात्र काश्मिरमध्ये कुठल्याही जिहादी संघटनेनी अशी शपथ घेतल्याची खात्री नसल्यामुळे इसीस, अल कायदा, एजीएएचच्या नावाखाली जिहादी हल्ला झाल्याच्या केवळ वल्गनाच होतात प्रत्यक्षात मात्र तशी परिस्थिती नाही हा युझुअल डिनायल मोड घेतलेला दृष्टीपथास येतो.
नवीन माहितीनुसार, झाकीर मुसाच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या या जिहादी संघटनेनी संपूर्ण भारतभरात मोठ्या सरकारी कंपन्या आणि भारतात आर्थिक गुंतवणूक करणार्‍या विदेशी कंपन्यांवर त्या काश्मिरमध्ये काफिर राज्य टिकवण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना आर्थिक मदत करतात या कारणास्तव निवडक जिहादी हल्ले करण्याची धमकी २६ फेब्रुवारी २०१८ ला इंटरनेटवरील एका प्रसारणात दिली आहे. भारतातील व्यापारी क्षेत्रावर (कार्पोरेट सेक्टर) या आधीदेखील फेब्रुवारी १९९३ चे मुंबई बाँब ब्लास्ट आणि २६ नोव्हेंबर २००८ मधील मुंबई जिहादी हल्ल्यासारखे भीषण हल्ले झाले आहेत. पण या धमकीमुळे आता जिहाद्यांनी भारताविरूध्द आर्थिक युध्द छेडण्याची घोषणा केलेली दिसून येते. बहुतांश भारतीय कंपन्यांमध्ये अशा जिहादी आत्मघाती हल्ल्याला तोंड देण्यासाठी मूलभूत सुविधादेखील नसल्यामुळे दोन तीन हत्यारबंद जिहादी, आत्मघातकी हल्ल्याच्या माध्यमातून भारतीय कार्पोरेट सेक्टरमध्ये निवडक औद्योगिक, आर्थिक हैदोस (सिलेक्टिव्ह इंडस्ट्रियल/मॉनेटरीमाह्येम) माजवू शकतात हे २००८ च्या ताजमहाल हॉटेलमधील जिहादी हैदोसानंतर सिध्द झाल आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने झाकीर मुसाच्या धमकीकडे पुरेशा गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित आहे.
डिसेंबर २०१७ मध्ये पुलवामा, काश्मिरमधील सीआरपीएफ क्रंपवर फरदीन खंडे व मंसूर बाबा या नुकतीच मिसरूड फुटलेल्या काश्मिरी तरुणांनी केलेला हल्ला हा पहिला सर्वकष काश्मिरी आत्मघाती हल्ला (फिदायीन अटॅकइन काश्मिरी टोटॅलिटी) केला होता. या हल्ल्यामुळे इसीस, अल कायदा, एजीएएचच्या अपप्रचाराला (प्रोपोगंडा) बळी पडून जिहदात सामील झालेले नव्या पीढीतील काश्मिरी तरूण पुढेही भारतभरात असा हल्ला करू शकतील अशी भीती भारताच्या इंटलिजंस एजसींना वाटते आहे. पाकिस्तानमधून आलेल्या आत्मघाती पथकांपेक्षा भारतीय नागरिक या नात्याने भारतात कुठेही बे रोकटोक जाऊ शकणार्‍या काश्मिरी तरूणांनी येथील मोठ्या शहरांमधे स्थिरावलेल्या काश्मिरी तरूणांच्या मदतीने लीलया केलेले आत्मघाती हल्ले जास्त सुलभ असतील. सुलभेमुळे ते जास्त प्रभावी होऊन त्याचे धागेदोरे आयएसआय वा पाकिस्तान सरकारशी जोडण अशक्य होईल असेही इंटलिजंस एजंसींचे मत आहे.
१९९० मध्ये झेंड्यावर हिरवा, लाल आणि पांढरा पट्टा असणारी जम्मू काश्मिर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ), अफगाणिस्तानचे भाडोत्री सैनिक असलेली हिजबुल मुजाहिदीन (एचएम) आणि अब्दुल घनी लोनची पिपल्स काँफरंस (पीसी) यांच्यात काश्मिरच्या नेतृत्वाची चुरस सुरू झाली. १९९५ नंतर जेकेएलएफ आणि पीसीच नामोनिशान मिटू लागले. २००२ मधील काश्मिर विधान सभेच्या निवडणुकीनंतर २००८ पर्यंत काश्मिरमधील अलगाववादी शक्तींना हात चोळत बसावे लागले. २००८ मधे गुलाम नबी आझादच्या कांग्रेस सरकारने अमरनाथ यात्रेसाठी जमीन दिल्यामुळे चवताळलेल्या पिपल्स काँफरंसच्या मुफ्ती मोहम्मद सईदनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर काश्मिर परत एकदा अलगाववादी, जिहादी शक्तींच्या प्रभावाखाली आले. २००८, ०९, १० आणि १६ च्या दगडफेकीच्या घटनांमध्येदेखील प्रामुख्याने पाकिस्तानी झेंडेच फडकवले जात असत. जुलै २०१६ मधील बुरहान वानीच्या एनकाउंटर नंतरचे १५ महिने देखील सर्व प्रदर्शन, मोर्चे आणि जनाज्यांमध्ये केवळ पाकिस्तानी झेंडेच दिसत असत.
२०१८ च्या सुरवातीला पुलवामातील करीमाबादमधे नासीर अहमद पंडितच्या पहिल्या बरसीच्या वेळी चेहर्‍यावर मास्क घातलेल्या पाच बंदुकधारी मुजाहिदीनांनी इस्लामिक स्टेट नसलेल्या पाकिस्तानी झेंडे फडकवण्यास आणि पाकिस्तान समर्थक घोषणा देण्यास, बंदुकीच्या नोकावर बंदी घालून, या नंतर जो केवळ अल्लासाठी, खलिफतच्या नावे कुर्बान होईल तोच शहीद मानला जाईल हे इसीस फर्मान जाहीर करते, खलीफतसाठी छेडलेला जिहाद लवकरच पाकिस्तान आणि भारतात येईल असे आश्‍वासन ही उपस्थितांना दिले. हा इसीसच्या काश्मिरमधील चंचुप्रवेशाचा ओनामा होता. सीमेवरील भारतीय सैनिकांचा अपवाद वगळता अजून तरी काश्मिरमध्ये इसीस आणि अल कायदा मध्यपूर्वेत करतात त्या प्रमाणे बोकड कापण्याच्या सुर्‍यांनी कोणाचेही शीर कलम करण्यात आलेले नसले किंवा इतरत्र भारतात वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये विध्वंसासाठी इस्तेमाल झालेल्या विमानांसारखा भयानक विनाश घडवला गेला नसला तरी तो या पुढेे होणारच नाही असे नाही कारण जम्मू काश्मिरप्रमाणेच केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रामध्ये आयसीस व अल कायदाला मिळणारा छुपापाठिंबा द्रुतगतीनी वाढतो आहे.
इसीस व अल कायदा काश्मिर व भारतात आले आहेत हा केवळ एक अपप्रचार असून काश्मिर, ऊत्तरप्रदेश व बिहारमध्ये फडकवण्यात आलेले इसीस व पाकिस्तानचे झेंडे भारताला केवळ खीजवण्यासाठी होते त्याचप्रमाणे काश्मिरमधील हिंसाचार केवळ तेथील स्वातंत्र्य चळवळीचा परिपाक आहेे असे छातीठोकपणे जाहीर करणार्‍या भारतीय चलचित्र वाहिन्या, वृत्तपत्रांमधील अग्रलेख आणि मानवाधिकारवादी सामाजिक प्रवक्त्यांच्या भाषणांचे आज पुराव्यानिशी खंडण करता येत नसले तरी इसीस आणि अल कायदा यांचा प्रभाव भारतात झपाठ्याने वृध्दिंगत होतो आहे यात शंकाच नाही. आज जरी त्यांची संख्या नगण्य असली तरी भविष्यातही ती तशीच राहील असा आशावाद बाळगणे सामरिकदृष्ट्या अपरिपक्वतेची निशाणी सिध्द होईल.
भारत व काश्मिरमधल्या मुस्लीम तरूणांमधली वाढती बेरोजगारी, अस्वस्थता व खदखद यांना मूलतत्ववादाचे खतपाणी घालणारे मदरसे व मौलवी इराक व सिरियामध्ये कार्यरत, कणा मोडलेल्या इसीसच्या बाजूनी लढण्यासाठी व आता देशात परत येत असलेले अनिश्‍चीत संख्येतील तरूण आणि या दोघांचा फायदा घ्यायला टपून बसलेला पाकिस्तान त्याचप्रमाणे चीनी कम्युनिस्ट विचारधारणेने वेडावलेले, मध्य भारतातील नक्सली हे आयसीस व अल कायदाचे पोटेंशियल कंडिडेट आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. हीच चूक आपण ८०-९० च्या दशकात आधी पंजाब आणि नंतर काश्मिरमध्ये केली होती हे विसरून चालणार नाही..
केरळमधील हिंसक विघटनवादी घटना, पश्‍चिम बंगाल, गुजरात व बिहारमध्ये राम नवमीच्या मुहूर्तावर झालेले दंगे, ओवेसी व त्याच्या बगलबच्चांची अलगाववादी, स्फोटक वक्तव्यं; मुंबईतील तथाकथित अनियमीत रेलभरतीच्या नावाखाली झालेला उद्रेक, जेएनयूमधील विद्यार्थी नेत्यांची जहाल मुक्ताफळ आणि मार्चच्या सुरवातीला छत्तीसगढच्या सुकमामधील आयईडी स्फोटाची प्रखरता (इंटेंसिटी) व तंत्रज्ञान सफाई (टेक्निकल नो हाऊ) यामुळे नक्सल्यांच्या बाँबस्फोटांवर उमटलेली जिहादी सांगडीची मोहर; वरील वचनाला उजागर करतात. आता याच्यावर काही उपाय शोधायचा की देवदयेने सर्वकाही आपोआप मार्गी लागेल, नीट होईल या भाबड्या आशेने शहामृगाप्रमाणे रेतीत तोंड खुपसल्यागत संकटाकडे डोळेझाक करायची हे सर्वस्वी केन्द्र व राज्य सरकार, त्यांच्या इंटलिजंस एजंसी आणि सेना व सुरक्षा दलांवर निर्भर आहे.

No comments:

Post a Comment