गोष्ट, म्हटली तर फारच छोटीशी आहे आणि म्हटली तर फार
मोठी. परवा, राजस्थानातल्या कुण्या एका तरुणाने एका डिओड्रंट
कंपनीविरुद्ध दावा ठोकला. या युवकाने त्या कंपनीचा डिओड्रंट वापरला. बाकायदा पैसे
देऊन विकत घेऊन वापरला. पण, त्यांच्या जाहिरातीत दाखवितात
तसे काही घडले नाही, ही त्याची खंत आहे. त्याचाच संताप
त्याच्या या कृतीतून व्यक्त झालाय्. जाहिरातीत, हा डिओ
अंगावर नुसता फवारला रे फवारला, की लागलीच सभोवतालच्या सार्या
पोरी नायकाकडे आकर्षित होतात. त्याच्यावर भाळतात. यानेही तोच डिओ आणला बाजारातून.
तोच ब्रॅण्ड. तोच गंध.किंमतही बहुधा तीच. आणल्याबरोबर
डिओ, त्या हिरोच्या स्टाईलनेच स्प्रे केला. बस्स! आता
सभोवताल पोरींचा घोळका जमणार ही भाबडी आशा बिचार्याची! पण कसचं काय. घोळका सोडा,
एकही पोरगी फिरकली नाही जवळपास. हाच प्रयोग पुन्हा पुन्हा साकारला.
पण उपयोग काही होईना! अंगावर शिंपडून डिओची शिशी संपायला आली तरी कुणीच जवळ येईना! मग साहेबांची सटकली!
स्वारी पोहोचली थेट कोर्टात. डिओचा दर्जा, त्याचीकिंमत, त्याचा सुगंध
याबद्दल तक्रार नव्हतीच काही. तक्रार होती ती ही की, हे
उत्पादन वापरल्यावर त्याचा ‘हवा तसा’ परिणाम
झाला नाही...
ही घटना गांभीर्याने घ्यायची की हसण्यावारी
न्यायची, हा
ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जरासा वेगळ्यानं विचार केला, तर
एक ‘ग्राहक’ म्हणून सर्वांसाठीच
ऐरणीवर असावा असा एक मुद्दा हा तरुण सार्या देशाला देऊन गेला आहे. टीव्हीवर
झळकणार्या किती जाहिराती फसव्या असतात, याचा कधी विचार करतो
आपण? फेअर अॅण्ड लव्हली लावल्याने कुणी गोरं होऊ शकतं? एखादा डिओ वापरल्याचा परिणाम म्हणून मुली कुणावर भाळू शकतात? एखादे एनर्जी ड्रिंक प्यायल्याने चारचाकी गाडीचे इंजीन चार्ज करण्याइतकी ऊर्जा त्याच्या
शरीरातून प्रवाहित होऊ शकते? एखाद्याला भूक लागल्यावर
तो बेताल वागू लागतो, मात्र त्यानंतर कुठलेसे चॉकलेट
खाल्ले की त्याचे पोट भरते आणि मग तो ताळ्यावर येतो... शक्य तरी आहे हे? गुळगुळीत टक्कल पडलेल्या डोक्यावर केसं उगवण्यापासून तर लठ्ठपणा कमी
करण्यापर्यंतच्या झाडून सार्या जाहिराती, त्यातील दावे
फसवे असल्याच्या वस्तुस्थितीपासून अनभिज्ञ नाहीच कुणी येथे. दुर्दैव फक्त एवढंच
आहे की, त्याविरुद्ध आवाज उठविण्याची ना कुणाला गरज
वाटत ना कुणाला तेवढी फुरसत आहे. बहुधा म्हणूनच कुणीही येऊन आम्हाला गंडवून जातो.
कुणी सफाईच्या नावाखाली डोळ्यांदेखत सोने लुटून नेत साठमारी करतो, तर कुणी थेट आयपीएलचे सामने आयोजित करून कोट्यवधीची माया जमा करतो. जनता
तर काय, स्वत:ची फसवणूक करून घ्यायला आणि स्वत:ला
लुटवून घ्यायलाच जन्माला आली आहे ना? तिची तर कीवही
करीत नाही कुणी!
सभ्य भारतीय समाजाला सहज साध्य होऊ शकेल, असे सावज समजून लूटमारीचा हा
धंदा, अत्यंत हुशारीने षडयंत्र रचून चालला आहे. एक तरुण
एका डिओड्रंट कंपनीविरुद्ध कोर्टात गेला, तर त्याची ‘बातमी’ झाली. कित्येकांच्या लेखी तर तोही खिल्ली
उडविण्याचाच विषय ठरला. खरंतर ही जाहिरात बघणारे, लाखो-करोडो
लोक आहेत. त्यांच्या लक्षात नाही येत कधीच, की कुठलासा
डिओड्रंट वापरला म्हणून कुणाच्या गळ्यात पडायला मुली एवढ्या मूर्ख नाहीयेत म्हणून? असे घडणे शक्य नाही हे आम्हाला कळते. ज्यानं जाहिरात केली त्यालाही याची
जाणीव आहे. मग ही शुद्ध फसवणूक असल्याची आणि तसे करणे हा कायद्यानं गुन्हा
असल्याची पूर्ण कल्पना असतानाही तो असले फसवे दावे का करतो? ते
दावे करण्याची िंहमत होते कशी त्याला? याचे उत्तर एवढेच
आहे की, भारतीय ग्राहक स्वत:च्या अधिकारांबाबत जराही
जागरूक नसल्याचीही पुरेपूर कल्पना त्याला एव्हाना आलेली आहे. ग्राहक आणि त्याचे
भाबडेपण दोन्ही गृहीत धरूनच जाहिरातींच्या माध्यमातून ही फसवणूक खुलेआम चालली आहे.
त्यातून लोकांची लूटही छान चालली आहे अन् त्यांचे धंदेही.
अमेरिकेत ‘किंडर एग सरप्राईज’ नामक उत्पादनात लहान मुलांकरिता पौष्टिक घटक नसल्याच्या कारणावरून कुणी
आक्षेप नोंदवला तर त्यावर बंदी घातली जाते. भारतात विचारतो कोण हो
खाद्यपदार्थांमधील पौष्टिक घटकांना? कोकाकोलाच्या
बाटलीतून पेस्टिसाईडस् आपल्या पोटात जात असल्याची बाब किती भारतीयांनी गांभीर्याने
घेतली सांगा? डेअरी मिल्कच्या कॅडबरी चॉकलेट्समधून
कधीकाळी अळ्या निघाल्या होत्या, ही बाब किती लोकांच्या
स्मरणात आहे आता? स्टारबक्सच्या कॉफीच्या दर्जावरून
कधीतरी चर्चा झडली, तर प्रकरण ‘निपटून’ घेण्याचा दावा त्या कंपनीचा अधिकारी नेमका कशाच्या जोरावर करतो? त्याचा इथल्या भ्रष्ट व्यवस्थेवर विश्वास असतो की लोकांच्या मूर्खपणावर? काही वर्षांपूर्वी दर्जाच्या कारणावरून मॅगीवर लादली गेलेली बंदी नंतर सहज
कशी हटली, सांगता येईल कुणाला? कॅडबरीत
निघालेल्या अळ्यांवर, अमिताभ बच्चन यांच्या सहभागातून तयार
करण्यात आलेल्या जाहिरातीचा तोडगा शोधून काढला त्या शहाण्यांनी! कोकाकोलामधील
पेस्टिसाईडस्बाबतची वस्तुस्थिती आता बदलली असल्याचा दावा त्यांनी स्मृती
इराणींच्या तत्कालीन टीव्ही नायिकेच्या प्रतिमेचा वापर करून केला आणि तमाम
ग्राहकांना तो बिनदिक्कतपणे मान्यही झाला. कॅडबरी काय नि मॅगी काय, पुन्हा दाखल झाले बाजारात... तेवढ्याच दिमाखात.
लोकांना मूर्ख बनविण्याची त्यांची तर्हा बघा
कशी न्यारी आहे. तो कुठला बिग बॉस नावाचा कार्यक्रम. फारतर मोजून तीन महिन्यांचा
कालावधी असतो त्याचा. रग्गड पैसा कमाविण्याच्या उद्देशाने बिग बॉसच्या घरात दाखल
झालेली मंडळी, एकतर
आल्या दिवसापासूनच एकमेकांशी भांडायला लागते. एकमेकांशी कडाकडा भांडणारी ही माणसं.
त्यांची त्यांच्या कुटुंबीयांशी गाठ घालून देण्याचा मुहूर्त तो बिग बॉस नावाचा
अज्ञात प्राणी हमखास शोधतो. उण्यापुर्या महिना-दोन महिन्यांच्या कालावधीतच हे लोक
इतके बेचैन झालेले असतात की, पस्तिशीतला एखादा कलावंतही
आईला बघून ढसाढसा रडायला लागतो... नौटंकीबाज लेकाचे! पण करता काय, भारतीय प्रेक्षकांचा आवडता शो आहे ना तो! त्यांनी फसवलेलंही आवडतं
लोकांना. मग ते कशाला पर्वा करतील कुणाची? शेवटी यांच्याच तर
भरवशावर धंदा चालतो त्यांचा!
आपला कार्यक्रम संपूर्ण भारतात बघितला जाणारा, लोकप्रिय ठरलेला, लोकांनी डोक्यावर घेतलेला ‘एकमेव कार्यक्रम’ असल्याचा दावा तर सारेच करतात. त्यांना त्यांच्या कार्यक्रमात लोकसहभागही
हवा असतो. त्यांच्या स्पर्धांचा निकालही लोकांनी केलेल्या व्होटिंगच्या आधारे लावण्याचा प्रयोग होतो. तो अफलातून, ऐतिहासिक
असल्याचा दावा करायलाही ते विसरत नाहीत. गाणं सुरू झालं की लोकांनी व्होटिंग करायचं. थेट प्रक्षेपण सुरू असलेल्या
एका कार्यक्रमात प्रेक्षकांनी देशाच्या कानाकोपर्यातून केलेल्या मतदानाची चार
मिनिटांचं गाणं संपेपर्यंत मोजणीही होते अन् स्पर्धेचा‘निकाल’ही लागतो. आहे ना गंमत? हे कसे घडत असेल, प्रत्यक्षात त्याची शक्यता किती, आदी प्रश्नही
पडत नाहीत इथे कुणालाच. या प्रकारातून आपल्या खिशातून पैसे उकळून मोबाईल कंपनीसाठी
व्यवसाय करवून घेतला गेल्याचेही ध्यानात येत नाही कुणाच्या.
एकूण, लोकांची लूट करून, त्यांना फसवून कुणीतरी धंदा करतंय्. त्यासाठी धादांत खोटे दावे करणार्या
जाहिराती तयार करून लोकांना भुरळ घालणे,हादेखील धंदाच झालाय्
त्यांचा. एखादा कुणीतरी फेअर अॅण्ड लव्हलीविरोधात कोर्टात धाव घेऊन पैसे मोजण्यास
कंपनीला भाग पाडतो. दुसरा कुणीतरी डिओड्रंट कंपनीविरुद्ध दंड थोपटून उभा राहतो.
नाही म्हणायला, अलीकडे ग्राहक न्यायालयात धाव घेणार्यांची
संख्याही जराशी वाढलेली दिसते आहे. बाकीच्यांची लूट, फसवणूक
होत राहते. पण गंमत अशी की, तरीही ते मजेत आहेत.
अन्यायाविरुद्ध लढण्याच्या प्रवृत्तीचा तसाच अभाव आहे. इथे तर अन्याय होत
असल्याचीच खबरबात नाही कुणाला...!
No comments:
Post a Comment