‘रायिंझग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची दिवसाढवळ्या
गोळ्या घालून हत्या करण्यात आली,
ही दु:खद आणि धक्कादायक
घटना आहे. त्यांची दोन लहान मुले,
पत्नी आणि नातलगांवर तर
दु:खाचा पहाडच कोसळला आहे. त्यांच्या सांत्वनाला आपल्या सर्वांचे शब्द अपुरे आहेत.
या दु:खद घटनेनंतर मोदी सरकारच्या काश्मीर धोरणावर टीका होऊ लागली आहे, जी सर्वथैव अनाठायी आहे. एका संपादकाच्या हत्येमुळे जर मोदी
सरकारचे धोरण कुचकामी ठरत असेल,
तर मग आतापर्यंत मारल्या
गेलेल्या प्रत्येक नागरिकाच्या मृत्यूनंतरही हीच प्रतिक्रिया उमटायला हवी होती. पण
तसे होताना दिसत नाही. शुजात बुखारी यांची हत्या कुणी का करावी, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. अजूनही लिबरल आणि सेक्युलर
मीडिया शुजात बुखारी यांची हत्या दहशतवाद्यांनी केली, हे मानायला तयार नाही. दहशतवाद्यांनी जर बुखारी यांची हत्या केली, तर ती का केली असावी, असे प्रश्न उपस्थित होतील
म्हणून सेक्युलर मंडळी या संदर्भात मौन असावेत. कालांतराने सत्य बाहेर येईलच.
काहींचे म्हणणे आहे की, जमिनीच्या विवादातून ही हत्या झाली आहे. कुणी म्हणतात की, शुजात बुखारी यांनी दहशतवाद्यांच्या विरोधात कायम भूमिका घेतल्याने
हत्या झाली. शुजात बुखारी हे संपादक व्हायच्या आधी भारतविरोधी, हिंदु विरोधी वृत्तपत्र- ‘द हिंदु’मध्ये कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी ‘रायिंझग काश्मीर’
वृत्तपत्र सुरू केले. ते
पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयच्या वेतनयादीवर होते, असा आरोप केला म्हणून याच शुजात बुखारी यांनी प्रसिद्ध स्तंभलेखिका
व सामाजिक कार्यकर्त्या मधुपौर्णिमा किश्वर यांच्यावर खटला दाखल करून अजामीनपात्र
अटक वॉरंट काढायला लावला होता. मधुपौर्णिमा किश्वर या उथळ पत्रकार नाहीत. अत्यंत
जबाबदारीने त्या लिहीत आणि बोलत असतात. असे असूनही सर्वांनी किश्वर यांनाच दोषी
ठरविले आणि आताही शुजात बुखारी यांच्या हत्येबाबत किश्वर यांनाच दोषी ठरविण्याचा
प्रयत्न ‘टुकडे-टुकडे गँग’ने सुरू केला आहे. हा
प्रकार अतिशय निंदनीय आहे.
कुणाच्याही मृत्यूचे राजकारण करू नये, असा सभ्य प्रघात असतानाही, आजचे कथित पत्रकार कुठलाच
विधिनिषेध ठेवत नसल्याचे दिसून येते. मग इतरांनीही का म्हणून चूप राहायचे? घुसळण तर होणारच ना! असो. शुजात बुखारी यांची हत्या, दोन मुद्यांकडे लक्ष वेधते. एक म्हणजे, जर बुखारी आयएसआयच्या वेतनयादीवर असतील तर त्यांची हत्या करण्याचे
दहशतवाद्यांना काय कारण होते. कुठला तरी संपत्ती किंवा पैशाचा व अन्य वाद असावा
आणि त्या वादाची परिणती शुजात यांच्या हत्येत झाली असावी. दुसरे म्हणजे, शुजात हे खरोखरच भारतसमर्थक आणि काश्मिरातील दहशतवादविरोधात असले
पाहिजे. त्यामुळेच, हा विरोधी सबळ आवाज कायमचा बंद करणे, तसेच यापुढे अशा प्रकारची हिंमत करण्यास कुणी धजू नये, अशी दहशत निर्माण करण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली असावी.
आजतरी दुसर्या कारणाची शक्यता अधिक वाटते. हे जर खरे असेल, तर शुजात बुखारी यांची हत्या ही, काश्मिरातील
दहशतवाद्यांच्या हताशेचे प्रतीक मानायला हवे.
काश्मीरमध्ये जे बहुस्तरीय धोरण राबविणे सुरू
केले, त्याच्या परिणामस्वरूप कधी नव्हे इतके दहशतवादी
ठार मारण्यात आले आहेत. शुजात बुखारी यांची हत्या ही अशीच एक चाल असण्याची शक्यता
अधिक वाटते. दहशतवाद्यांविरोधात केंद्र व राज्य सरकारने जे अतिशय कडक धोरण
स्वीकारले आहे, ते लोकांच्या दबाबामुळे मवाळ व्हावे, असा हेतू, शुजात यांच्या हत्येने साध्य होईल, अशी आशा या दहशतवाद्यांच्या मनात असू शकते. तसे झाले तर त्यांना ते
हवेच आहे. परंतु, जनतेनेदेखील दहशतवाद्यांचा हा डाव ओळखला पाहिजे.
जम्मू-काश्मिरात नेमकी काय परिस्थिती आहे, काय अंत:प्रवाह सुरू आहेत, कुठली गुप्त माहिती
सरकारजवळ आली आहे, याची आपल्याला सुतराम कल्पना नसते.
दहशतवाद्यांविरोधात लेखणी चालविली म्हणून जर शुजात बुखारी यांची हत्या होत असेल, तर या राज्यातील सर्वसामान्य नागरिक किती भयभीत असेल याची कल्पना
करता येईल. ते दहशतवाद्यांविरोधात बोलत नाहीत, याचा अर्थ त्यांना हा
सर्व हिंसक प्रकार मान्य आहे असा होत नाही. दहशतवाद्यांना टिपण्यात अलीकडच्या
काळात जे प्रचंड यश मिळाले, ते स्थानिक लोकांच्या सहकार्याशिवाय मिळणे शक्य
नाही. जेव्हा स्थानिक समाजच विरोधात उभा होतो तेव्हाच कुठलीही चळवळ विझू लागते.
पंजाबातील खलिस्तान चळवळीचीही याच मार्गाने गत झाली, हे आपल्याला आठवत असेल.
नागरिकच खलिस्तानी अतिरेक्यांचा ठावठिकाणा पोलिसांना सांगू लागले होते.
काश्मिरातही हेच घडणे सुरू झाले असावे, असा अंदाज आहे. अन्यथा, दहशतवाद्यांचा इतका नेमका ठावठिकाणा सुरक्षा दलांना लागलाच नसता.
ही एक फार मोठी सकारात्मक घडामोड आहे. सर्वसामान्य समाजाचा पाठिंबा आपण गमवीत आहोत, हे लक्षात आल्यावर दहशतवाद्यांनी, लोकांमध्ये संभ्रम
निर्माण करणे सुरू केले असावे. त्यामुळे दहशतवाद्यांच्या या जाळ्यात कुणीही सापडू
नये, असे वाटते.
काश्मीरचे पोट पर्यटनावर अवलंबून आहे. अनेकांनी
लाखो रुपयांचे कर्ज घेऊन पर्यटनाचा व्यवसाय उभा केला आहे. भारतीयांनी मोठ्या
प्रमाणात काश्मीर राज्याला भेट देऊन, या लोकांच्या
पोटापाण्याचा प्रश्न सोडविला पाहिजे. जीव जाण्याच्या भीतीने आपण उघडपणे काही बोलत
नसलो, तरी उर्वरित भारत आपल्या पाठीशी उभा आहे, याची अनुभूती काश्मिरींना आली पाहिजे. सरकारला त्याची कठोर धोरणे
राबवू देतानाच, इतर भारतीयांनीदेखील काश्मिरी जनतेच्या
पोटपाण्याची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. असे झाले तर, ही काश्मिरी जनताच एक दिवस त्यांच्या भूमीत पसरलेला दहशतवाद उखडून
फेकून देईल! काश्मीरबाबत इतक्या नकारात्मक गोष्टी घडत असतानाही, जी काही आश्वासक व सकारात्मक मंद किरणे दृग्गोचर होत आहेत, त्यांना सबल बनविणेच, खर्या अर्थाने शुजात
बुखारी यांना श्रद्धांजली अर्पण करणे ठरेल. हे राज्य दहशतवादमुक्त होवो, अशीच समस्त भारतीयांची इच्छा असणार.
No comments:
Post a Comment