खरंच, वंदे मातरम् म्हणायचं
कुणी ? भारतमातेचे गुणगान करायचे कुणी ? पान खाऊन रस्त्यावर थुंकायचं अन् भारतमाता की जय म्हणायचं ! वर
पुन्हा, आपला देश कसा घाणेरडा आहे, बेशिस्त आहे,
असं म्हणत नाकं मुरडायची.
मग अर्थ काय उरतो देशभक्तीच्या बाता हाणण्यात? या देशातल्या प्रत्येक
नागरिकाला विदेशाचं आकर्षण आहे. तिथली स्वच्छता, तिथला झगमगाट, तिथली श्रीमंती,
ती शिस्त, त्यांनी साधलेली तंत्रज्ञानातली ती नेत्रदीपक प्रगती... या सार्याचेच
अप्रूप असते इथे सर्वांना. तिथल्या कठोर नियमांचं आणि त्याच्या काटेकोर पालनाचंही
मग कौतुक थांबता थांबत नाही. फक्त सुई आपल्या देशावर येऊन थांबली की मात्र तंत्र
बिघडते. मग तो कायद्याचा दंडकही नको असतो नि स्वच्छतेचा आग्रहही. भ्रष्टाचारमुक्त
राजकारणाची, पारदर्शी कारभाराची तर्हा, त्यांची त्यांच्या देशात. त्याचं तोंड भरून कौतुक करायला ना नाहीच
कुणाची. पण, आपल्या देशात मात्र “चलता हैं सब कुछ,”
असं म्हणत आपल्या बेछूट
वर्तनाचं निलाजरेपणाने समर्थन करत राहायचं अन् तुलना मात्र त्यांच्याशी करायची.
अपेक्षा मात्र स्वच्छ, चारित्र्यवान, महान, कर्तबगार, भ्रष्टाचारमुक्त देशाची करायची... चालेल असं? कसं चालेल, सांगा!
भौगोलिक नकाशातल्या जमिनीच्या तुकड्यापलीकडेही
अस्तित्व असते कुठल्याही देशाचे. तिथली माणसं, त्यांनी जपलेल्या
संस्कृतीच्या माध्यमातून जमिनीच्या त्या तुकड्याला खर्या अर्थाने ओळख देत असतात.
त्यामुळे आपल्या देशाची वैश्विक प्रतिमा कशी असावी, जगात तो नेमका कशासाठी
ओळखला जावा, हे अवलंबून तर शेवटी तिथल्या माणसांवरच आहे.
डॉक्टर बनलेली ज्या देशाची तरुणाई अमेरिकेच्या आरोग्य विभागाचा इतका मोठा डोलारा
लीलया हाताळते, जिथली जिनियस माणसं ‘नासा’ला कायम हवी असतात, त्या भारताची ओळख जर ‘भिकार्यांचा देश’ एवढीच मर्यादित राहिली असेल, तर त्यामागील कारणांचा
शोध घेत त्याच्या निवारणाची जबाबदारी आपणच स्वीकारायला हवी ना? तरच बदलेल ना जगाच्या नजरेतली आपली प्रतिमा! अन्यथा, आपण आपल्याचपुरता केलेला उच्चरवातला तो जयघोषाचा स्वरही मातीमोल
ठरतो. खरं तर इथे सर्वात जास्त प्रॉब्लेम शिकल्यासवरलेल्यांचाच आहे... ज्यांनी चार
भिंतींच्या आत, पुस्तकांची चार पानंही कधी पलटवली नाहीत, ती तमाम माणसं शिस्तीत वागतात. गरज असेल तिथे रांगेत उभी राहतात.
आपला क्रम येईपर्यंत धीरानं थांबतात. अरे, इथे तर मुकी जनावरंदेखील
रस्त्याच्या बाजूनं अगदी शिस्तीत चाललेली असतात अन् चांगली शिकलेली, सुटाबुटातली माणसं मात्र
विमानतळावरही बेताल वर्तणुकीचे दुर्दैवी प्रदर्शन मांडतात. नको तिथे थुंकतात. नको
ते बरळतात. चौकातले सिग्नल तोडणार्यांमध्ये सर्वाधिक संख्या कुणाची असते बघातरी
एकदा! गावखेड्यातून आलेली अशिक्षित माणसं तर कायद्याच्या भीतीने गुमान उभी असतात
पांढर्या रेषेच्या आत. मस्ती फक्त शहरी भागातल्या कथित सुशिक्षितांचीच चाललेली
असते. ज्यांनी स्वातंत्र्याचे युद्धही बघितले नाही अन् त्या समरासाठीच्या समर्पणाची
किंमतही कधी मोजली नाही, ती तरुणाई सत्तर वर्षांनंतर स्वातंत्र्याच्या
उन्मादाचे प्रदर्शन मांडत रस्त्यांवरून फिरते अन् ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य
मिळावं म्हणून घरादारावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व बहाल केलं, त्यांच्यावर मात्र,
या तरुणाईला घाबरून बाजूला होण्याची
वेळ येते...
पंतप्रधान म्हणतात तसा खरंच अधिकार आहे या तरुणाईला
वंदे मातरम् म्हणण्याचा?
घरातला कचरा उकिरड्यावर आणून
टाकणार्या, सांडपाणी नदीत सोडून सार्वजनिक आरोग्याचे खोबरे
करणार्या, नद्यांचे नाले अन् नाल्यांचे सांडपाणी वाहून नेणार्या
निमुळत्या प्रवाहात परिवर्तन करणार्या, तोंडात पानाचा तोबरा भरून
पिचकार्यांनी सार्वजनिक भिंती रंगविणार्या, भरपूर वेतन घेऊनही आपल्या
कर्तव्यात कसूर करणार्या, खाबूगिरी करून लोकांची अडवणूक करणार्या, बँका लुटून विदेशात पळून जाणार्या, आपल्या देशातली संपत्ती विदेशी
बँकांत नेऊन ठेवणार्या, लोकांच्या जिवावर निवडून आल्यावर गब्बर झालेल्या, ग्राहकांची फसवणूक करणार्या, शेतकर्यांची पिळवणूक करणार्या, शौचालय नाकारणार्या,
विकास झुगारणार्या, राजकारणाचे मातेरे करणार्या, समाजकारणाचा बाजार मांडणार्या...
अशा कुणाला म्हणून कुणालाच वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही.
पंतप्रधानांच्या विधानाचा अर्थ एवढाच की, या देशात जबाबदार,
कर्तबगार, जागरूक नागरिकांची फौज निर्माण व्हावी. एक नागरिक म्हणून ज्याला कुणाला स्वत:ची
जबाबदारी कळत नसेल, त्यानुरूप वागता येत नसेल, ज्याला आपल्या गावाची ख्याती निर्माण करता येत नसेल, स्वत:च्या वर्तनातून आपल्या समाजाचा स्तर सुधारता येत नसेल, आपल्या कर्तबगारीतून देशासाठी काही करता येत नसेल, त्याला कुठला अधिकार उरतो, राष्ट्राभिमानाने मान
उंचावण्याचा अन् आवळलेल्या मुठी आकाशात उंचावत गगनभेदी घोषणा देण्याचा? इतर देशातले लोक जे करतात त्यातले काहीच करायचे नाही अन् तरीही
आपला देश त्यांच्यासारखा नाही म्हणून कायम कडाकडा बोटं मोडत राहायचे, शिव्यांची लाखोली वाहात राहायचे, यात कुठले आले शहाणपण? अशाने कसे घडेल सर्वांना अपेक्षित असलेले परिवर्तन? त्यामुळे, लोकहो!
स्वत:च्याच देशाची खिल्ली उडवणे सोडा. जगासमोर
आपल्या देशाची नाचक्की करण्याची सवयही मोडून काढा आता. सार्वजनिक ठिकाणी रांगेत
उभे राहायला शिका. स्वच्छता पाळण्याची सवय अंगीकारा. कुठेही पचापचा थुंकण्याची सवय
द्या सोडून. वाट्याला आलेले काम इमानदारीने करा. कर्तव्यात किंचितसाही कसूर
करू नका. अन्याय सहनही करू नका आणि इतरांवर अन्याय करूही नका. कायद्याचे पालन करा.
अगदी कठोरपणे करा. जराशी कास आधुनिक तंत्रज्ञानाचीही धरा. विज्ञानाचा आधार घ्या.
विचार करायला लागा. तर्कशुद्ध बोला. आचरण बदला. कामचुकारपणा मागे टाका. मेहनतीला
पर्याय नाही, हे ध्यानात घ्या. समर्पित भावनेने काम करा... मग
बघा या देशाचे चित्र कसे भरभर बदलते. या सकारात्मक बदलातून जो समाज, जो देश साकारेल,
तो बघितल्यावर उर्वरित
जगाच्या तुलनेत आपण भिकारडे असल्याची खंत कुणाच्याही मनात असणार नाही. मग, मी भारताचा नागरिक असल्याचे सांगताना लाज वाटण्याचे कारण असणार
नाही
No comments:
Post a Comment