सुगरणीसारखा पक्षी जे घरटं बांधतो, त्यामागचे कौशल्य चकित करणारे असते. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लृप्त्या, पिल्लं सुरक्षित ठेवण्यासाठीचा आटापिटा, यातून एका विशिष्ट प्रकारच्या बुद्धीचीच झलक दिसते. मानवातील अशाच उपजत आणि बहुविध बुद्धिमत्तेविषयीची ही मालिका सुरू करत आहोत…
समाजात घडणाऱ्या अनेक घटना, आपसातील, नातेसंबंधातील वाढते ताणतणाव, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हिंसेच्या घटना, अतिरेकी कारवाया, देशादेशांतले युद्ध परिस्थितीपर्यंत येऊन ठेपलेले संबंध, जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाचा ऱ्हास हे सगळे विषय आपल्याला अस्वस्थ करून टाकतात. सगळीकडे एकप्रकारची अस्थिरता, असुरक्षितता भरून राहिल्याचे जाणवते. खून, बलात्कारासारख्या, गॅंगरेपसारख्या घटना, त्यातला अल्पवयीन मुलांचा जाणवेल इतका वाढलेला सहभाग, एकतर्फी प्रेमातून, ऑनर किलिंगच्या माथेफिरूपणातून मारून टाकणं, Acid हल्ला करणं, अश्लिल व्हिडीओ क्लीप्स, फोटो काढणे, मेसेज पाठवणे, सोशल मीडियावर टाकणे यासारख्या लैंगिक विकृती, सायबर गुन्हे, आर्थिक फसवणुकींचे वाढते प्रकार, याच्या बातम्या नाहीत, असा एकही दिवस जात नाही.
माणूस झाला आहे बेदरकार
एक प्रकारचा बेदरकारपणा आज माणसात आला आहे. ड्रग्ज, दारू आणि इतर व्यसनांच्या आहारी जाऊन स्वत:ची, कुटुंबाची धूळदाण ही तर अगदीच सामान्य गोष्ट झाली आहे. आता मोबाइल किंवा इंटरनेट ऍडिक्शन, पोकिमान-गो, ब्ल्यू व्हेलसारख्या गेम्सच्या आहारी जाऊन केलेल्या आत्महत्त्या, चालत्या रेल्वेच्या दारात उभे राहून किंवा धरणाच्या भिंतीवर अथवा पाण्यात उभे राहून किंवा कड्याच्या टोकावर उभे राहून सेल्फी काढण्याच्या वेडापायी गमावलेले जीव, हा आता चिंतेचा विषय आहे. कधी कुणाच्या बोलण्याचा काय विपर्यास होईल, कुठे खुट्ट होऊन दंगलीला सुरुवात होईल, गाड्या, इमारती आगीत जळून खाक होतील सांगता येत नाही.
राष्ट्रपुरुष, राजकीय नेते यांच्याविषयी सतत मानहानिकारक, मजकूर, फोटो, क्लीप्सचा भडीमार तर कसा थांबवावा हा प्रश्नच आहे. स्वत:च्या पालकांविषयी, एकूण समाजाविषयी, राष्ट्राविषयीची अनास्था हाही गंभीर विषय आहे. नकारात्मक गोष्टींचे प्रमाण वाढले आहे; वाढते आहे. आपण म्हणतो योग्य संस्कार केले नाहीत, म्हणून असे झाले पण चांगल्या शिक्षित, सुसंस्कारित कुटुंबातही अशा विकृत व्यक्ती निपजतात. कधी आपण सिनेमा, इंटरनेट, मोबाइल, वाईट संगत अशा गोष्टींवर खापर फोडतो. पण ही तर डिजिटल युगातली अपरिहार्य साधने आहेत.
असं सगळं का घडतंय आणि थांबायचं कसं हा प्रश्न प्रत्येक सूज्ञ व्यक्तीला पडतो. त्यावर चर्चा झडतात पण निष्कर्ष निघत नाही, उपाय सापडत नाही. या सद्यस्थितीकडे, सार्वत्रिक-जागतिक समस्येकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहाता येईल का? या समस्येकडे खरंच वेगळ्या अँगलने पाहाता येऊ शकतं. या सार्वत्रिक समस्येचं निराकरण करण्यासाठी उत्तरही मिळू शकतं. मनुष्य हा इतर सजीवांपेक्षा, प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. या वेगळेपणातली ठळक गोष्ट म्हणजे माणसाला असणारी उपजत, जन्मजात बुद्धी. सर्वच सजीवांना, प्राण्यांना, पक्ष्यांना, वनस्पतींना बुद्धी काही ना काही प्रमाणात असतेच.
निसर्गातही असतेच उपजत बुद्धी
सुगरणीसारखा पक्षी जे घरटं बांधतो, त्यामागचे कौशल्य चकित करणारे असते. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लृप्त्या, पिल्लं सुरक्षित ठेवण्यासाठीचा आटापिटा, यातून एका विशिष्ट प्रकारच्या बुद्धीचीच झलक दिसते. भूकंप, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींची पूर्व जाणीव प्राण्या-पक्ष्यांना होते आणि त्याला अनुसरून सुरक्षित ठिकाणी जाणं वगैरे बुद्धीशिवाय होत नाही. वनस्पतींचा विचार केला तर त्याहून आश्चर्यकारक गोष्ट लक्षात येतात. वनस्पतींना भावभावना असतात. त्यावर खूप संशोधन झालेलं आहे. वनस्पतींना खोटं बोलणाऱ्या व्यक्ती आवडत नाहीत. एखादी खुनी, हिंसक व्यक्ती समोर आली तर वनस्पती ीशरलीं होतात, घाबरतात, अक्षरश: थरथरतात.
ऑलिव्ह रिडले या कासवांच्या प्रजातीच्या संवर्धनाचे कार्य, पश्चिम किनारपट्टीवर गेली काही वर्षे सातत्याने चालू आहे. कासवांची अंडी, कोल्हे, कुत्रे, पक्षीच नव्हे तर माणसेही पळवून नेतात. पिल्लं पकडून बेकायदेशीर व्यापार चालतो. म्हणून ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सुरक्षित ठिकाणी गोळा करून ठेवली जातात. त्यातून जेव्हा पिल्लं बाहेर येतात तो सोहळा अनुभवण्यासारखाच असतो. अंड्यातून बाहेर आल्याक्षणी समुद्र कोणत्या बाजूला हे त्या नवजात पिलांना कसं कळतं किंवा पहिली लाट अंगावर आल्यावर गांगरून न जाता, आपल्या हक्काच्या घरात शिरत असल्याच्या थाटात ती पिल्लं समुद्रात कशी शिरतात?
…तर ही असते उपजत बुद्धी
एकपेशीय सजीवांपासून मनुष्यापर्यंत प्रत्येकाला बुद्धी आहे; असतेही. पण प्रत्येकाच्या बुद्धीचा प्रकार किंवा स्तर वेगळा असतो. माणसाची बुद्धी हे मात्र वेगळच प्रकरण आहे. ती जन्मजात, उपजत असते. तिचा एक विशिष्ट स्तर असतो. हा स्तर वाढत नाही पण ज्ञान, अनुभव, आकलनशक्ती, शिक्षण यांच्या सहाय्याने बुद्धिमत्तेचा वापर करण्याची क्षमता मात्र वाढू शकते. नक्की वाढवता येते. प्रयत्नपूर्वक वाढवता येते. इथेच माणूस आणि इतर सजीवांच्या बुद्धिमत्तेमधला फरक दिसून येतो.
बुद्धिमत्ता या संकल्पनेत अनेक गोष्टींचा समावेश आहे. केवळ औपचारिक शिक्षण झाले असेल म्हणजे फार “बुद्धिमान’ असे अजिबात नसते, शिक्षण झालेले नसेल, तरी बुद्धीचे, बुद्धिचातुर्याचे अफाट आविष्कार घडवणाऱ्या व्यक्ती, शास्त्रज्ञ, समाजसुधारक किती तरी आहेत. म्हणजे केवळ औपचारिक शिक्षणातले घवघवीत यश म्हणजे बुद्धिमान, ही जुनाट, कालबाह्य संकल्पना आहे.
“बहुविध बुद्धिमत्ता’ काय आहे?
बुद्धिमत्ता या संकल्पनेत अनेक गोष्टींचा समावेश आहे. बुद्धिमत्तेचे अनेक प्रकार, उपप्रकार, कोन, पैलू आहेत. त्यालाच “बहुविध बुद्धिमत्ता’ – Multiple intelligence म्हणतात. या सगळ्याचा विचार, उपयोग समाजामधील अस्थिरता, असुरक्षितता आटोक्यात आणण्यासाठी करता येऊ शकतो का, सकारात्मक दिशेने वाटचाल होण्यासाठी वापर होऊ शकतो का, याचा विचार आपण करणार आहोत. डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी “बहुविध बुद्धिमत्ता’ या विषयावर मूलभूत आणि मौलिक संशोधन केलेले आहे. त्यात अनेकांनी भर घातली आहे. “बहुविध बुद्धिमत्ता’ ही संकल्पना समजून घेण्यासाठी Modalities आणि Quotients चा अर्थ समजून घेणे जरुरीचे आहे. डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्तेची संकल्पना एकूण आठ मोडॅलिटीज्च्या अंगाने मांडली. मोडॅलिटी म्हणजे (Modality) ऑक्सफर्ड डिक्शनरी प्रमाणे अर्थ आहे – a particular mode in which something exists “विशिष्ट प्रकारे अस्तित्वात असलेली – मूलत: असलेली गोष्ट.’ तर Quotients ही एक मापनपद्धती आहे. मोजण्याचे परिमाण. म्हणजे बुध्यांक, भावनांक, सहवेदनांक, संवादांक अशा प्रकारचे! त्याविषयी पुढील भागात
No comments:
Post a Comment