श्रीनगरचे ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची ऐन रमजानच्या दिवसांत झालेल्या हत्येने काश्मिरी राजकारणाला वेगळीच कलाटणी दिली. त्यांच्या सोबतच्या एका पोलिस शिपायाचाही खून पाडला गेला होता. औरंगजेब नावाचा एक जवान सणाची सुट्टी घेऊन घरी येत असताना त्याचेही अपहरण करून मारण्यात आले. हे सर्व रमजानच्या पवित्र महिन्यात हिंसा नको म्हणून भारत सरकारने जाहीर केलेल्या एकतर्फी युद्धबंदीच्या काळात झाले. त्याचा सगळ्यांनाच इतका धक्का बसला होता, की त्यानंतर ती युद्धबंदी वाढवण्याला अजिबात अर्थ उरला नव्हता; पण स्थानिक राजकारणासाठी मुख्यमंत्री मेहबुबा युद्धबंदी वाढवण्यासाठी आग्रही होत्या आणि भाजपचा धीर सुटलेला होता. साहजिकच, पाठिंबा काढून घेतला गेला व काश्मिरातील संयुक्त सरकार कोसळले. त्याला अनेक कारणे असली, तरी शुजात बुखारींची हत्या ही उंटाच्या पाठीवरची काडी ठरली. आधीच ओझ्याने वाकलेला उंट आणखी वजन घेऊ शकत नसला, तर त्याला खाली बसवायला एका काडीचेही वजन पुरेसे असते, तशी बुखारींची हत्या होती. साहजिकच, सरकार कोसळले आणि काश्मिरात राज्यपालांची राजवट सुरू झाली. नेहमीप्रमाणे दहशतवादी हुडकून त्यांचा खात्मा करण्याची मोहीम वेगाने पुढे सरकू लागली; पण त्यात बुखारी यांचे बलिदान वाया जाऊन चालणार नव्हते. अन्य कुठल्या काश्मिरी राजकारणी वा हुर्रियतच्या नेत्यांपेक्षा बुखारी हा महत्त्वाचा मोहरा होता. मागल्या वर्षी भारत सरकारने काश्मिरी जनता व संघटनांशी संवाद साधण्यासाठी दिनेश्वर शर्मा यांची नेमणूक केली होती आणि त्याचे मनःपूर्वक स्वागत करणार्यात शुजात बुखारी आघाडीवर होते. जे कोणी अशा शांती प्रयास व प्रामाणिक प्रयासात पुढाकार घेणारे होते, ते अर्थातच पाकवादी जिहादी वा त्यांच्या अन्य साथीदारांना नकोसे होते. त्यांना शांतीची बकवास करून प्रत्यक्षात हिंसा व दहशतवादाला पाठीशी घालणारेच नाटकी लोक हवे असतात. त्यामुळेच शांतता प्रयासांना पाठिंबा देणारे व हातभार लावणार्यांचा काटा काढण्याची योजना पाकिस्तानात शिजलेली होती. त्याचा सूत्रधार अर्थातच ‘तोयबा’चा म्होरक्या हाफीज सईद होता. त्यानेच शुजात सारख्यांचा बळी घेण्यासाठी अनेक लोकांची निवड केलेली होती आणि तसा तो बळी गेलेला आहे. म्हणूनच, मग त्याला बलिदान म्हणावे लागते आणि त्यातल्या गुन्हेगारांना शोधून काढून शुजातला न्याय देण्याला प्राधान्य मिळते. आता तो शोध लागला असून, सज्जाद गुल नावाचा एक सुशिक्षित जिहादी तरुण, त्या खुनाचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्याने बंगळुरूमध्ये उच्च शिक्षण घेतलेले असूनही तो जिहादमध्ये ओढला गेला व पाकिस्तानात हिंसाचाराचे प्रदीर्घ प्रशिक्षण घेऊन भारतात आलेला होता. आज पुन्हा तो पाकिस्तानमध्ये निसटला आहे.
काश्मीरमध्ये विकासाच्या व प्रगतीच्या संधी नाहीत, अशी बोंब नेहमी ठोकली जाते. तिथे रोजगार नाही, शिक्षणाच्या संधी नाहीत, म्हणून मुले व तरुण दहशतवादाकडे खेचली जातात, आकर्षित होतात, हा नेहमीचा युक्तिवाद झालेला आहे. तो खरा मानायचा, तर सज्जाद गुल याचे काय? तो बंगळुरूमध्ये व्यवस्थापन कौशल्याची पदवी घेतलेला तरुण आहे. त्याने चांगल्या पगाराची नोकरीही केलेली असणार. इतके असूनही त्याने अशा आत्मघाती कामात उडी कशाला घ्यावी? त्याचे नुसते उत्तर शोधून चालणार नाही, तर त्याची मीमांसा केली पाहिजे. शिक्षण वा उच्च शिक्षण मनाचा विकास करीत नाही. त्यातून जगाच्या व्यवहारात तुम्हाला जगण्याच्या संधी मिळतात; पण मनाची व बुद्धीची प्रगल्भता नुसत्या शिक्षणातून येत नसते. त्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक प्रबोधनाची गरज असते. जगातील घडामोडी व आपले त्यातले स्थान, यांचा विचार माणूस करू लागतो, तेव्हाच त्याला समाजात कसे वावरावे त्याची अनुभूती येत असते; पण शिक्षण घेऊनही माणूस आपल्याच विकार, भावनांच्या अडगळीत पडून राहिला, तर त्याच्या मनाचा विकास होत नाही, की त्याच्यात प्रगल्भता येत नाही. तो कुठल्याही प्रचाराला अफवांना बळी पडू शकतो. हाच दोन काश्मिरींमधला फरक आहे. तोच शुजात व सज्जाद यांच्यातला फरक आहे. आपली अस्मिता व पाकिस्तानी कारस्थान यातला फरक शुजातला समजू शकला होता. म्हणूनच, त्याने पाकिस्तानी सापळ्यातून आपले भाईबंद मुक्त व्हावेत, अशा मध्यस्थीच्या प्रयासांना हातभार लावण्यात पुढाकार घेतला होता. तो काश्मिरी अस्मितेसाठीच प्रयत्नशील होता आणि त्यातली पाकिस्तानी रोगबाधा निर्मूलन व्हावी, म्हणून पुढे आला होता. उलट, सज्जाद त्या पाकिस्तानी रोगाची बाधा झालेला रुग्ण होता. म्हणूनच, आपले शिक्षण व बुद्धी गहाण टाकून तो पाकिस्तानी प्रचाराला बळी पडला आणि त्याने आपल्याच एका बुद्धिमान काश्मिरी बांधवाची अशी निर्घृण हत्या घडवून आणली. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, शुजात व हुर्रियत यांच्यातला फरक ओळखला पाहिजे. हुर्रियतही शांततेच्या बाता मारते; पण त्यासाठी पुढाकार घ्यायची वेळ आल्यावर माघार घेते. बाजूला राहण्याची निमित्ते शोधते. काश्मीरचा पेच सोडवताना म्हणूनच भारत सरकारने व अन्य भारतीयांनी शुजात व सज्जाद यांच्यातला फरक समजून घेतला पाहिजे. आपल्याकडून हुर्रियतसारख्या रुग्णांना कुठलीही मदत वा प्रोत्साहन मिळता कामा नये आणि शुजात यांच्यासारख्यांना आपण कायम बळ दिले पाहिजे. दुर्दैवाने तितकेच होत नाही आणि रोगाची बाधा वाढत गेलेली आहे. त्यात बाधित सुखरूप निसटतात आणि शुजात यांच्यासारखे निरोगी प्रगल्भ काश्मिरी मारले जातात. त्याचा खुनी नुसता पकडला जाता कामा नये, तर त्याचा विद्रुप चेहरा काश्मिरी जनतेला समजावण्याला प्राधान्य असले पाहिजे.
No comments:
Post a Comment