Total Pageviews

Monday, 25 June 2018

सैफुद्दीन सोझ-गुलाम नबी आझाद-ज्या नेत्यांची भक्ती या राष्ट्रावर नाही, ज्यांची सारी सहानुभूती पाकिस्तानला जोडलेली आहे, अशा वृत्ती या अराष्ट्रीयच आहे व त्यांचा सर्व थरातून निषेध झाला पाहिजे.


काँग्रेसी वाचाळवीर 

TARUN BHARAT BELGAUM-
अवघे ऐंशी वयोमान! काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांना सध्या म्हातारचळ लागलेला आहे. काश्मिरच्या बाबतीत गेल्या 48 तासात काँग्रेसच्या नेत्यांनी जी वादग्रस्त विधाने केली ती पाहता या नेत्यांचा आत्मा भारतात नसून पाकिस्तानात आहे असे वाटते. सैफुद्दीन सोझ हे काँग्रेसचे अत्यंत जबाबदार नेते मात्र बेजबाबदार निवेदने करण्यात माहीर. शुक्रवारी त्यांनी पत्रकारांशी बोलताना काश्मिरी जनतेला स्वातंत्र्य हवे आहे, अशी मुक्ताफळे उधळली आणि हवाला दिला पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांचा. मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असताना काश्मिरींना स्वातंत्र्य हवे, त्यांना पाकिस्तानात सहभागी होण्यात फारसा रस नाही किंवा स्वारस्य नाही, असे निवेदन करून भारतात आणि पाकिस्तानमध्ये देखील बरीच खळबळ माजवून दिली होती. गेले दोन दिवस काश्मिरमध्ये राज्यपाल शासन लागू झाल्यानंतर सैफुद्दीन सोझ यांचे पित्त खवळले. भारत सरकारने मोठय़ा प्रमाणात सुरक्षारक्षक काश्मिरात तैनात केल्याने सोझ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी तर भारतीय लष्कर हे काश्मिरवासियांची कत्तल करण्यासाठी आले आहे, अशा प्रकारचे भडक विधान करून देशद्रोहच केलेला आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर इतर सात राज्यांचे भारतात विलीनीकरण झाले. काश्मिरचेही भारतात विलीनीकरण झाले. तथापि, 1949मध्ये काश्मिरसाठी स्वतंत्र राज्यघटना तयार झाली. भारतीय राज्यघटनेबरोबरच काश्मिर राज्याची स्वतंत्र घटना तयार झाली. काश्मिरमधील मुस्लिम नेते फारुक अब्दुल्ला यांच्या वडिलांनी (शेख अब्दुल्ला) जवाहरलाल नेहरू यांना हाताशी धरून कलम 370 चा समावेश करून घेतला आणि काश्मिरसाठी स्वतंत्र दर्जाही प्राप्त करून घेतला. भारतीय राज्यघटनेतील सर्वच नियम काश्मिरला लागू नाहीत. या 370व्या कलमानुसार काश्मिरमधील कोणतीही व्यक्ती संपूर्ण देशभरात कुठेही जाऊन राहू शकते परंतु भारतातील कोणतीही व्यक्ती काश्मिरमध्ये ना स्थायिक होऊ शकत ना तेथील मालमत्ता विकत घेऊ शकते. एवढेच नव्हे. जर काश्मिरातील एखाद्याचा देशातील इतर भागातील व्यक्मतीशी विवाह झाला तर आपसूकच त्या व्यक्तीचा काश्मिरातील मालमत्तेचा हक्क जातो. या उलट काश्मिरातील एखाद्या व्यक्तीचा पाकिस्तानच्या व्यक्तीशी विवाह झाला तरीदेखील त्याचा मालमत्तेवरील हक्क जात नाही. अशा या विचित्र कायद्याने काश्मिरी जनतेला फार मोठे संरक्षण तर दिलेले आहेच शिवाय स्वतंत्र दर्जा असल्याने भारतातून त्यांच्यासाठी रसद पुरविली जाते. काश्मिरचे कायदे वेगळे आहेत. दिवसाकाठी कोटय़ावधीची मदत काश्मिरला पोहोचविल्यानंतर देखील काश्मिरातील बहुतांश जनता आजही पाकिस्तानचे समर्थन करून भारत सरकारवर तसेच त्यांचे रक्षण करावयास गेलेल्या भारतीय सैनिकांवर फुत्कार सोडत आहे. पोलिसांवर व सैनिकांवर काश्मिरातील युवावर्ग दगडफेक करीत आहे. गेल्या तीन वर्षात काश्मिरमध्ये भाजप आणि पीडीपीचे असलेले सरकार भाजपने पाठिंबा काढून घेतल्यानंतर कोसळले व तिथे राज्यपाल राजवट जारी झाली आहे. काश्मिरमध्ये गेल्या तीन वर्षात शेकडो भारतीय सैनिकांचे बळी गेले आहेत. काश्मिरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत व पाक प्रशिक्षित आतंकवादी हैदोस घालीत आहेत. आतापर्यंत या आतंकवाद्यांनी हजारो निरपराध भारतीयांची कत्तल केली आहे. ही वस्तुस्थिती माहीत असूनदेखील गुलाम नबी आझाद, सैफुद्दीन सोझ हे डोळय़ाला धर्मांधतेची पट्टी बांधून भारत सरकारच्या विरोधात जी प्रक्षोभक निवेदने करीत आहेत, ते पाहता हे दोन्ही नेते पाकिस्तान समर्थकच आहेत. या नेत्यांनी एवढी वर्षे भारत सरकारच्या सहकार्याने राजवैभव प्राप्त करून त्यांना आता पाकिस्तानबद्दल, आतंकवाद्यांबद्दल आणि फुटीर नेत्यांबद्दल पुळका आला आणि बेताल निवेदने करीत आहेत. राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाची ही नेतेमंडळी प्रक्षोभक निवेदनांनी कोणता संदेश या देशात पोहोचवू पाहात आहे? देशात राहून देशविरोधी कारवाया हा प्रकार फुटीर गट व आतंकवादी करीत होते. आता, काँग्रेसची काश्मिरमधील मंडळीदेखील तेच सूर आळवू लागली. यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. सत्तेची सारी सुखे उपभोगलेल्या या मंडळींनी काश्मिरवासियांना स्वातंत्र्य हवे, पाकिस्तानशी चर्चा करून प्रश्न सोडवा, आतंकवाद्यांबरोबर चर्चा करा, फुटीरवाद्यांना विश्वासात घ्या, असे फुकटचे संदेश व सल्ले भारत सरकारला द्यायला प्रारंभ केला आहे. काश्मिरवासियांना स्वातंत्र्य मिळत नाही हे दुर्दैव! इतपत म्हणण्याची मजल सैफुद्दीन सोझ गाठतात व काँग्रेसचा एकही नेता त्यावर बोलत नाही. मोदींच्या भीतीने राहुल गांधींकडे शरणागती पत्करलेल्या देशातील इतर राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींची तोंडे आता कोणी शिवली? वादग्रस्त निवेदने करून आपल्याकडे साऱयांचे लक्ष आकर्षित करून घेऊ पाहणाऱया या काँग्रेसच्या म्हातारचळ लागलेल्या नेत्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे. या देशात राहून देशविरोधी बेताल वक्तव्ये करणाऱया नेत्यांना त्यांची जागा आता जनतेनेच दाखवून दिली पाहिजे. दोन्ही नेत्यांनी जी विधाने केलेली आहेत, ती प्रक्षोभक आहेत. भारतीय लष्करावर टीका करणाऱया गुलाम नबी आझाद हे काश्मिरचे मुख्यमंत्री असताना त्यांचे प्राणपणाने रक्षणाचे काम हे भारतीय लष्करानेच केलेले आहे, याची साधी आठवणदेखील नसणारे काँग्रेसचे हे दोन नेते म्हणजे उपमर्द असणारी अराष्ट्रीय वृत्तीच आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये हिम्मत असेल तर या दोन्ही नेत्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. ज्या नेत्यांची भक्ती या राष्ट्रावर नाही, ज्यांची सारी सहानुभूती पाकिस्तानला जोडलेली आहे, अशा वृत्ती या अराष्ट्रीयच आहे व त्यांचा सर्व थरातून निषेध झाला पाहिजे.

No comments:

Post a Comment