अभय नायक नावाच्या व स्वत:ला मुक्त पत्रकार म्हणविणाऱ्या तरूणाला छत्तीसगड पोलीसांनी केलेली अटक अनेकांना विचार करायला लावणारी आहे. ही बाब गंभीर असली, तरी ती नवीन मात्र नक्कीच नाही. अभय नायक मूळचा बंगळुरुचा. २०१७ साली त्याला आक्षेपार्ह साहित्यासह स्फोटके घेऊन, अटक करण्यात आले होते. त्याने २०१७ मध्ये बेल्जियम, फ्रान्स, मेक्सिको, बोलिविया, सिंगापूर, इंडोनेशिया, रशिया आणि नेपाळ अशा राष्ट्रांमध्ये प्रवास केला आहे. स्वत:ला मुक्त पत्रकार म्हणविणारा अभय त्यानंतर बस्तरला आला आहे. मुळात मुक्त पत्रकाराला इतका मुक्तपणे विश्वसंचार कसा करता येतो आणि त्याची आर्थिक तजवीज कोण करतं हा मोठा प्रश्न आहे.
अभय आता पुढील काही महिने तुरूंगात सडेल यात काही शंका नाही, पण आधी म्हटल्याप्रमाणे ही काही पहिली घटना नाही. हा एक जागतिक ट्रेंडच मानावा लागेल. स्वत:ला विचारवंत समजणाऱ्या व्यक्ती आणि संस्थादेखील मार्क्सच्या विचारांनी प्रेरित होऊन, असेच काहीतरी करीत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. युरोपमधून चालणारी आणि जागतिक मान्यता असलेली कितीतरी विद्यापीठे डाव्या विचारांच्या प्रभावातून चालविली जातात. इथले शिक्षक, प्राध्यापक, जगभरातून प्रवास करून, विद्यापीठांमध्ये येणारे पाहुणे अध्यापकदेखील अशाच प्रकारचे विचार घेऊन, जगभर प्रवास करतात. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टींची चिंता वाटते तो ‘ग्लोबल फिनोमेना’ आहे. आता उरला प्रश्न भारतातला; तर आता कुठे हे हिमनग आपल्याला दिसून यायला लागले आहे. भीमा कोरेगावला जी दंगल घडली, त्यात आरोपी असलेल्या रोना विल्सन आणि शोमा सेन यांच्याशीदेखील त्यांचा नियमित संवाद असल्याचे पोलीस सांगत आहेत. दिल्ली विद्यापीठातील प्रा. साईबाबा यांनाही अशाच प्रकारे अटक करण्यात आली होती. विद्यापीठे ही या सगळ्याच मंडळींसाठी महत्त्वाची केंद्रे आहेत. नव्या रक्ताचे, नव्या दमाचे कॉम्रेड्स मिळविणे, आपल्या कारवाया पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे यासाठी विद्यापीठे उपयुक्त ठरतात. आपण काही क्रांतिकार्य करीत आहोत, अशा नशेत ही मंडळी काम करीत असतात. सहानुभूतिदार निर्माण करण्याचे मूळ कामही इथून होताना दिसते. मुळात विद्यापीठेच का? आणि स्वत:ला विचारवंत म्हणविणारेच या लाल जाळ्यात का ओढले जातात, या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहीजेत.
मार्क्सची दोनशेवी जयंती साजरी होत असताना भारतात अशा कारवायांना उत येत आहे. हा निव्वळ योगायोग नाही. जगभरातील मार्क्सवादी चळवळ कमालीच्या अपयशाकडे सरकत आहे. आपल्या जलशात हे लोक काहीही सांगत असले, तरीही वस्तुस्थिती मात्र पूर्णपणे निराळी आहे. त्यामुळे आपला डावा रंग दडवून सगळे उद्योग सुरु आहेत. युरोपातले बरेचसे डावे पर्यावरणवादी झाले. भारतात असे प्रयोग झालेले नाहीत असे मुळीच नाही. पश्चिम घाटाच्या बाबत जे अहवाल सुरुवातीला आले, त्यात पुढे असलेले लोक कोण होते, याचे बारकाईने निरीक्षण केले, तर हा सगळाच मामला नीट लक्षात येईल, मात्र त्याला म्हणावे तसे यश मिळू शकले नाही. याचे मुख्य कारण भारतातली पर्यावरणाची चळवळच तशी नवी आहे आणि मुद्द्यांवर भांडण्यापेक्षा काही कृतिरूप करण्याकडे लोकांचा भर आहे. डाव्यांच्या अशा कुठल्याही उपलब्धी आपल्याला आज तरी सांगता येणार नाहीत. त्यामुळे गेले काही दिवस दलित समाजातील तरुणांकडे डाव्या चळवळीने आपला मोर्चा वळविला आहे. ‘जय भीम, लाल सलाम’ ही त्यातूनच आलेली घोषणा. वस्तुत: बाबासाहेबांची कितीतरी भाषणे त्यांचा डाव्यांविषयीचा दृष्टिकोन सुस्पष्टपणे विषद करतात. मात्र तरीसुद्धा प्रकाश आंबडेकरांसारख्यांना हाताशी धरून, बुद्धिभेदाचे उद्योग सुरुच आहेत. यातून काय सिद्ध होईल, ते येणारा काळच ठरवेल.
औद्योगिक क्रांतीनंतर सुरू झालेले संपत्तीचे केंद्रीकरण व कामगारांचे शोेषण हे कुठल्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारेच होते. मार्क्सच्या आधी व समकालीन विचारवंतांनीदेखील यावर निरनिराळ्या प्रकारे भाष्य केले होते. हे भाष्य खरोखरच योग्य आहे व आजही त्या प्रश्नाचे सर्वोत्कृष्ट आकलन म्हणूनच पाहिले जाते. मार्क्ससारख्या विचारवंताचे हे योगदान नाकारता येत नाही, मात्र हे आकलन म्हणजेच उत्तर मानण्याचा प्रमाद मार्क्सच्या अनुयायांनी चालविला आहे. एखाद्या आजाराचे निदान म्हणजेच औषधोपचार मानण्याइतके हे विचित्र आहे. तरुणांना अशी स्वप्ने दाखविणे सोपे असते, कारण सळसळत्या रक्ताच्या वयात पथनाट्ये, जलसे, गाणी, पोवाडे यातून दीर्घकालीन परिवर्तन घडून येऊ शकते, असे वाटते जरुर! पण तसे काही होत मात्र नाही. ही अफू नंतर स्वत:ची नोकरी शोधायची वेळ येते, तेव्हा उतरते. काहींची उतरते काहींची मुळीच उतरत नाही. व्यवस्था उद्ध्वस्त करायला निघालेले यातले बरेचसे व्यवस्थेची सगळी फळे चाखतच हे उद्योग करीत असतात. स्वत:च्या हेक्यासाठी तावातावाने पुढे येणारे हे लोक यापुढे नक्षल्याकंडून बळी पडणारे निमलष्करी दलाचे जवान, पोलीस व खबरी ठरवून, मारल्या गेलेल्या वनवासींबाबत कुठलेही भाष्य करताना दिसत नाहीत. सगळीकडे शोषित विरुद्ध शोषक असे दोनच वर्ग समजले आणि या दोनच वर्गांच्या आधाराने वर्गसंघर्ष सोडविण्याचा केविलवाणा प्रयत्न गेली अनेक वर्षे सुरूच आहे. मार्क्स ते लेनिन आणि लेनिन ते माओ या प्रवासाने जगाला काय दिले याचा विचार करायला डावे कधीच तयार होत नाहीत. त्यामुळे भारतातील डावी चळवळ आपल्याकडे विद्वेष पसरविण्याशिवाय काहीही करू शकत नाही.
No comments:
Post a Comment