रयतेला परक्यांच्या आक्रमणातून मुक्त करून स्वराज्याचे स्वप्न साकारणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन. शिवजयंतीला जेवढे महत्त्व आहे तेवढेच आजच्या या दिवसालाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासातील स्थान अढळ आहे. ते अतिशय असामान्य, कर्तृत्ववान, कर्तबगार, शूर आणि धोरणी राजे होते. त्यांचे लढाईचे नैपुण्य, दूरदृष्टी, शक्ती आणि युक्ती यांचा वापर जगप्रसिद्ध आहे. ते सर्वसामान्यांचे कैवारी, कार्यकुशल, शासनकर्ते होते. त्यांचे नेतृत्व जागतिक दर्जाचे होते. ते जाणता राजा होते. त्यांनी सर्वसामान्यांची हृदये जिंकली होती. असामान्य बुद्धिमत्ता, युद्धशास्त्राचे कौशल्य यांच्या आधारावर महाराजांनी तत्कालीन परिस्थितीला साजेशी युद्धयंत्रणा तयार केली होती.
अत्याचाराने दबलेल्या जनतेच्या मनात त्यांनी स्वराज्याची ज्योत निर्माण केली होती. 17 व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूला नामोहरम करून पराजित केले आणि त्यानंतर पुढची शेकडो वर्षे मराठ्यांनी ते साम्राज्य टिकवले. शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूचे आव्हान बहुआयामी होते. एकच शत्रू अशी परिस्थिती नव्हती. तसेच शत्रू समतुल्य नव्हता, तर सैन्य, धनदौलत अशा सर्वच बाजूंनी सशक्त होता. मात्र, अशा शत्रूला महाराजांनी अत्यंत चाणाक्षपणाने, मुत्सद्दीपणाने आणि युद्धनीतीचा अचूक वापर करत पराभूत केले आणि स्वराज्याची उभारणी केली. यामध्ये गनिमी काव्याचा वापर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी ठरला. गनिमी काव्याच्या डावपेचात शत्रूच्या रसद पुरवणार्या मार्गावर हल्ला केला जात असे, ज्यात स्थानिकांची मदत मिळत असे.
सह्याद्रीचा डोंगराळ परिसर हा गनिमीकाव्यासाठी योग्य होता, तर महाराष्ट्राची जनताच महाराजांचे सैनिक होती. स्वराज्यातील शेतकरी गरज पडली तर मदत करणारे सैनिक होते. अनेक शेतकरी युद्धाप्रसंगी हातातील नांगर सोडून तलवार घेत होते. त्यांचा प्रत्येक नागरिक हा प्रथम सैनिक आणि गुप्तहेर असा होता. छत्रपतींनी त्या वेळच्या मराठी जनतेचा अभ्यास करून त्यांच्यामध्ये असलेल्या गुणावर आपले सैन्य उभारले होते. त्यावेळचे मोगलशाही, आदिलशाही, कुतुबशाही हे महाराजांचे मुख्य शत्रू होते. महाराजांनी मोगल सैन्याचा आणि त्यांच्या युद्धाच्या डावपेचांचा चांगला अभ्यास केला होता. त्याला योग्य प्रत्युत्तर म्हणून आपले सैन्य, युद्धाचे डावपेच, गुप्तहेर जाळे व नेतृत्व तयार केले होते. शिवाजी महाराज हे पहिले राज्यकर्ते होते. त्यांनी समुद्री किल्ल्यांच्या मदतीने समुद्रातही स्वराज्य निर्माण केले होते. अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी छत्रपतींनी अनेक किल्ले बांधले.
त्यासाठी अनेक ठिकाणी तटबंदी, मनोरे, खंदक तयार केले ज्यावर हल्ला करणे शत्रूंना कठीण होते. गनिमी काव्यासाठी देखील हे किल्ले वापरले जात असत. मोगल सैन्य त्यावेळचे सर्वांत प्रचंड ताकदवान सैन्य होते. हे सैन्य म्हणजे हलतेफिरते शहरच होते. त्यांचा चालण्याचा वेग दिवसाला 30-35 किलोमीटर होता. ते भारतात पसरलेले होते. मात्र, हे सैन्य भाडोत्री आणि वेगवेगळ्या विचारसरणीचे होते. त्यांचे जास्त सैन्य स्वतःचे रक्षण करण्यातच वापरले जायचे. नंतर मोगलशाही वाढली तसे ते सैन्य आळशी, अत्याचारी झाले. छत्रपतींनी आपल्या सैन्याचा पाया घोडदळावर उभा केला. छत्रपतींचे सर्वच सैन्य चपळ होते. मात्र, महाराजांच्या घोडदळाचा वेग हा मोगलांच्या वेगापेक्षा तिपटीने अधिक होता. त्यांचे पायदळ हे चपळ आणि काटक होते. लढाईमध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक सैनिक, त्यांची निष्ठा आणि त्याचे शौर्य. लढाई सैनिकांमुळे जिंकली जाते. प्रत्येक लढाईमध्ये सैनिक कसे लढतात यावर जय-पराजयाचा फैसला होतो.
महाराजांचे सैन्य म्हणजे मावळे हे पराक्रमी तर होतेच; पण त्याहून अधिक ते निष्ठावान होते. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी जाधव होते. त्यांचे खाते शत्रूविषयी माहिती देत असे. अफजलखानावरचा हल्ला, सुरतेवरचा हल्ला हा गुप्तहेर माहितीच्या आधारेच केला गेला. महाराजांचे नौदल हे जवळपास 25 ते 30 हजार एवढ्या संख्येचे होते. त्यांच्याकडे 100 हून अधिक गलबते आणि इतर लढाऊ जहाजे होती. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते. शत्रूची कमजोर बाजू ओळखून, एकावेळी एकाच शत्रूशी लढणे, शत्रू बेसावध असताना अचूकपणाने हल्ला करणे ही छत्रपतींचे वैशिष्टे होती. महाराज युद्धशास्त्राचे तज्ज्ञ होते. शत्रूवर कधी हल्ला करायचा आणि कधी त्यापासून रक्षण करायचे हे त्यांना चांगले माहीत होते. त्यांचे सैन्य सह्याद्रीच्या कड्याकपारीतून युद्धाच्या वेळी एकत्र येत असे. किल्ल्यांचा वापर सुरक्षित स्थान म्हणून केला जात असे. मोगलांवरती एकाच वेळी दोन किंवा तीन दिशेने हल्ले व्हायचे. शत्रू सैन्याच्या हालचालींवर आणि रसद पुरवणार्या मार्गावर गनिमी काव्याने हल्ला केला जायचा. मराठी सैनिक आजुबाजूच्या भागावर आपली गुजराण करायचे. त्यात स्थानिक नागरिकांची मदत व्हायची.
ब्रिटिश, पोर्तुगीज इतिहासकारांनी छत्रपतींची तुलना ज्युलिअस सीझर, अलेक्झांडर, हनीबल या महायोद्ध्यांशी केली आहे. आज सुद्धा अमेरिकन सैन्य भारताची युद्धकला शिकण्यासाठी भारतीय लष्कराकडे येतात. भारतीय सैन्याची मराठा रेजिमेंट छत्रपतींचा वारसा पुढे चालवत आहे. आज हिमालय, काश्मीर या डोंगराळ भागात युद्धविरोधी अथवा दहशतवादी विरोधी अभियाने होतात. शाहिस्तेखानावर छत्रपतींनी अचानक हल्ला केला होता तशाच प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक आपण पाकिस्तानमध्ये केला होता. पावनखिंड जशी बाजीप्रभूंनी निकराने लढवली तसाच पराक्रम भारतीय सैन्याने काश्मीरमधील हाजीपीर खिंडीत गाजवला. सिंहगडावरचा हल्ला आणि कारगिलमध्ये टायगर हिलवर झालेला हल्ला याची तुलना होऊ शकते. शिवाजी महाराजांनी आपल्या काळात 300 ते 350 किल्ले बांधले; पण त्याहून त्यांनी सर्वात महत्त्वाचे किल्ले बांधले ते म्हणजे नरदुर्ग. किल्ल्यासारखी बुलंद, शूर, निष्ठावान, पराक्रमी माणसे हीच खरी महाराजांची संपत्ती होती. महाराजांचे अनुयायी नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक, मुरारबाजी, प्रतापराव गुर्जर, हंबीरराव मोहिते यांचे इतिहासातील स्थान अढळ आहे.
No comments:
Post a Comment