Total Pageviews

Thursday, 14 June 2018

मोबाईल ही काळाची गरज असली, तरीही तो आपल्याबरोबरच समोरच्याच्या मृत्यूचे कारणही ठरू शकतो-डॉ. जयदेवी पवार-PUDHARI


वाहन चालवताना मोबाईवर बोलणे हा नियमभंग आहे, हे माहीत असूनही ही सवय काही केल्या कमी होताना दिसत नाही; मात्र अलीकडील काळात वाहतूक पोलिस याबाबत चांगलेच दक्ष झाले आहेत. त्यामुळेच अशा प्रकारे मोबाईलवर बोलत गाडी चालवणार्‍यांना दंड करण्यात येत आहे. एकट्या पुण्यामध्ये एप्रिल 2017 ते मार्च 2018 या काळात 779 जणांचे लायसेन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. मोबाईल ही जीवनावश्यक वस्तू झाली आहे. परस्पर संवादाचे आधुनिक आणि सुलभ साधन म्हणजे मोबाईल, ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही; पण ज्ञान, संवाद, मनोरंजन यांचे माध्यम असणारा मोबाईल मृत्यूचेही कारण ठरतो आहे. मोबाईलवर बोलत गाडी चालवल्यामुळे घडणार्‍या अपघातांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी  रेल्वे ओव्हरब्रिजवर तीन युवक रेल्वेखाली सापडून मरण पावले. राजस्थानात जयपूरमध्ये एका आमदार पुत्राचा मोबाईलमुळेच रेल्वेला धडकून मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात मुलांच्या व्हॅनचाही रेल्वेच्या धडकेमुळे अपघात झाला आणि विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याचे कारण म्हणजे, चालक गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलत होता आणि त्याच्या दुर्लक्षापायी निरपराध पोरे मृत्यूच्या दाढेत गेली. पालकांना आक्रंदन करण्याव्यतिरिक्त काहीच हाती शिल्लक राहिले नाही. ही सर्व उदाहरणे मोबाईलमुळे मृत्यू होणे आता सर्वसामान्य झाले असल्याचे दर्शवतात. 
सरकार आणि न्यायव्यवस्था यांनाही याची खबर नाही, असे नाही. अलीकडेच न्यायालयाने मोबाईल बोलत जाणार्‍या व्यक्तीचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. मोबाईलमुळे सतत घडणार्‍या दुर्घटनांच्या बातम्या पाहूनही गाडी चालवताना इअरफोन्स कानांत घालून जाताना लोक दिसतातच. रेल्वे रूळ ओलांडताना कानांत हेडफोन्स असल्याने रेल्वेचा आवाज ऐकायला येत नाही. एके काळी घरी बसून रेडिओ, टीव्ही यांच्यावर बातम्या पाहिल्या जात किंवा ट्रान्झीस्टर घेऊन लोक फिरत फिरत गाणी ऐकत असत. आता मात्र मोबाईलची नवी नवी रूपे बाजारात रोजच्या रोज येतात. त्यात जगभराचे ज्ञान देणार्‍या अनेक गोष्टी असतात. आपल्या हाती जगातील ज्ञान येते आहे, मनोरंजनही उपलब्ध आहे, ही एका अर्थी चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे कोणतीही बातमी तत्क्षणी कळते; पण या माहिती पुरवणार्‍या माध्यमाचा अवेळी आणि अयोग्य ठिकाणी केलेला वापर मृत्यूला आमंत्रण देतो आहे. 

एकमेकांशी संवाद साधणे, गेम खेळणे यासाठी वापरला जाणारा मोबाईल जसजसा प्रगती करत गेला, तसतसे त्यामध्ये विविध अ‍ॅप्स आले. विशेषतः अँड्रॉईड फोन आल्यानंतर त्यातील विविध गोष्टींमुळे सुविधा झाली. त्यातूनच मोबाईलचा अतिवापर वाढला. हीच बाब दुर्घटना घडण्यास कारणीभूत ठरू लागली आहे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, गाणी ऐकणे, व्हिडीओ पाहणे किंवा व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज वाचणे या सर्व गोष्टी नक्कीच जिवाशी खेळणार्‍या आहेत. अलीकडील काळात रस्ता दुर्घटनांमध्ये सर्वात महत्त्वाचे आणि मोठे कारण म्हणजे मोबाईल होऊ लागले आहे. गाडी चालवणारेच नाही, तर रस्त्यावरून चालणार्‍या व्यक्तीदेखील कानांत इअरफोन्सवर गाणी ऐकत चालतात, रस्ते रेल्वे रूळ ओलांडतात. त्यामुळेही या दुर्घटना होण्याचे प्रमाण अधिक आहे. वाहन चालवताना मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे घडणार्‍या दुर्घटनांमुळे चिंताग्रस्त झालेल्या न्यायालयाने वाहन चालवताना मोबाईल वापरणार्‍यांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. आज देशात जवळपास दर 15 ते 20 दिवसांनी रेल्वेच्या रुळांवर रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची बातमी वर्तमानपत्रांत वाचायला मिळते. त्यात कानांत इअरफोन्स घातल्यामुळे रेल्वे येत असल्याचे न कळल्याने हे अपघात होतात. देशातील लहान ठिकाणी किंवा मोठ्या ठिकाणी कुठेही अशाच प्रकारच्या घटना घडतच आहेत. काही लोक दिखाऊपणा करण्याच्या प्रयत्नात बळी पडतात. थोडक्यात, लोक स्वतःच अपघाताला निमंत्रण देत आहेत. 
मोबाईल ही काळाची गरज असली, तरीही तो आपल्याबरोबरच समोरच्याच्या मृत्यूचे कारणही ठरू शकतो, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. समाज म्हणून जोपर्यंत आपली मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत कितीही कायदे निर्माण केले, तरी ते व्यर्थ आहेत. लाचलुचपत, वशिला हे सर्व प्रकार बंद होत नाहीत, तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणार नाही

No comments:

Post a Comment