Total Pageviews

Friday, 1 June 2018

ममता सरकार बरखास्त करा! महा एमटीबी 02-Jun-2018

बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यकर्त्यांच्या ज्या प्रकारे सातत्याने हत्या होत आहेत, त्यांच्यावर जीवघेणे हल्ले होत आहेत, त्यावरून या राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, असेच म्हणावे लागेल. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, राष्ट्रीय मीडिया व पत्रकार यावर मौन बाळगून आहेत. आत्ता परवा, भाजपाचा कार्यकर्ता त्रिलोचन महातो याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याला ठार केल्यानंतर त्याच्या टीशर्टवर संदेशाचा कागद टाचलेला होता. त्यात लिहिले होते- ‘भाजपाकडून राजकारण केल्याचे हे परिणाम आहेत. तुला पंचायत निवडणुकांपासूनच मारायचे होते, पण अयशस्वी झालो. आज तू मेला आहेस.’ किती भयंकर प्रकार आहे हा! अंगावर शहारे येतात. परंतु, हा त्रिलोचन ‘जातीयवादी’ भाजपाचा आहे आणि त्याला ठार करणारे ‘सेक्युलर’ तृणमूल कॉंग्रेसचे आहेत, म्हणून तर मीडिया तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले नसावेत ना?
कुण्या एखाद्या मुसलमानाची हत्या झाली, तर जणूकाही आपल्या घरचाच एखादा सदस्य मरण पावला, अशा शोकातिवेगाने ही मंडळी ऊर बडवू लागतात. परंतु, कुण्या हिंदूची हत्या करण्यात आली, तर तो जणूकाही या भूतलावरचाच नाही आहे, इतक्या परकेपणाने संवेदनहीन होतात. खरेतर, कुणाचाही जीव जाणे किंवा घेतला जाणे, अतिशय वेदनादायी असते. त्याच्या कुटुंबीयांवर, आप्तस्वकीयांवर दु:खाचा जो पहाड कोसळतो, त्याची तर आपण कल्पनाही करू शकत नाही. एका आत्मीय नात्यातून आपण आपल्या शोकसंवेदना प्रकट करत असतो. ही माणुसकी असते, जी सर्वसामान्यांच्या रक्तातच भिनली आहे. परंतु, जी मंडळी भारताच्या बौद्धिक क्षेत्राचे नेतृत्व करू पाहतात, जी मंडळी लोकशाहीचे पहारेदार म्हणून मिरवत असतात, त्या मंडळींची ही अशी निवडक संवेदनशीलता, मनात आक्रोश निर्माण करणारी आहे. कर्नाटकात एकाच दिवशी विधानसभेसाठी मतदान झाले. कुठेही हिंसाचार झाला नाही. परंतु, बंगालमध्ये पंचायत निवडणुकीत प्रचंड हिंसाचार झाला. मतपेट्या फेकण्यात आल्या. मतदान अधिकारी भीतीने पळून गेले. मतपत्रिकांची नासधूस करण्यात आली. अशा प्रकारे पंचायत निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसने आपला विजय साजरा केला. मीडियाने त्याला साथ दिली. ही लाजिरवाणी बाब आहे.
या प्रकारानंतर कुणालाच लोकशाहीची चिंता वाटली नाही. परंतु, कर्नाटकात सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण मिळताच, मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले गेले. सर्वोच्च न्यायालयानेही मध्यरात्री सुनावणी घेतली. कर्नाटकात जर लोकशाहीची हत्या झाली होती, तर मग बंगालमध्ये हे जे सुरू आहे, ती काय लोकशाहीची आरती सुरू आहे का? पण, सर्व चूप आहेत. निवडणूक आयोग शांत आहे. बर्‍याच प्रकरणात स्वत:हून पुढाकार घेणारे सर्वोच्च न्यायालय मौन आहे. ‘झोला छाप’ सामाजिक कार्यकर्ते शहामृग बनले आहेत. एरवी दिवस-रात्र चर्चेचा कर्कश रतीब घालणारे चतुर्थ-स्तंभी वाहिनी पत्रकार, दुसर्‍या कुठल्या तरी विषयांवर चर्चा घडवीत आहेत. कुणालाच बंगालची चिंता नाही, असे दिसते. भाजपासमर्थित वकील, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनादेखील बंगालमधील त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या हत्या गांभीर्याने घेतल्याचे जाणवत नाही.
 
कॉंग्रेस जर कर्नाटकातील तथाकथित लोकशाहीच्या हत्येविरुद्ध मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते, तर बंगालमधील राजकीय हिंसाचाराच्या विरोधात दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मध्यरात्री नाही, तर कमीतकमी दिवसाढवळ्या तरी जाण्यासाठी भाजपाचे हात कुणी बांधून ठेवले आहेत का? हा सर्व प्रकार उद्वेगजन्य आहे. प्रत्येक वेळी बोटचेपी भूमिका घ्यायची. कडक निंदा करायची आणि शांत बसायचे. अशाने या देशात ‘नवा भारत’ घडण्याची शक्यता नाही. हत्येला हत्येनेच उत्तर दिले पाहिजे असे नाही. बदला घेण्याचे अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. या मार्गांचा प्रभावी उपयोग जर कॉंग्रेस करू शकते, तर भाजपा का नाही? खरेतर, बंगालमधील कम्युनिस्टांच्या हिंसक राजवटीला पदच्युत करण्यात ममता बॅनर्जींना यश आल्यावर, या बाई तर एकदम लोकशाहीच्या रक्षणकर्त्याच बनल्या होत्या. परंतु, या बाईंचे आता जे रूप उघड झाले आहे ते अत्यंत क्रूर व हिडिस आहे. एखादी व्यक्ती इतकी पाताळयंत्री कशी बनू शकते? की ती मुळातच तशी होती आणि आधी तिने मानवतेचा केवळ बुरखा पांघरला होता? कदाचित हेच सत्य असावे.
 
सत्तेत कायम राहण्यासाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करणे आवश्यक असेल तर करा ना; म्हणून त्यासाठी हिंदूंच्या आणि विशेषत: भाजपा कार्यकर्त्यांच्या नरडीचा घोट का म्हणून घ्यायचा! कुणाचाही जीव इतका स्वस्त आहे का? भाजपाशासित राज्यात असले प्रकरण झाले असते, तर मीडिया भाजपावर तुटून पडला असता. परंतु, हाच किंवा याहूनही अत्यंत भयानक प्रकार भाजपाविरोधकशासित राज्यात घडला म्हणून त्याविरोधात एकही शब्द काढायचा नाही! याला नीचपणा म्हणायचा नाही तर काय? मीडियाला, सेक्युलर मंडळींना, ममता बॅनर्जी यांना, कम्युनिस्टांना असे वाटत असेल की, आपण कितीही नंगा नाच केला तरी, आपण कितीही पक्षपात केला तरी, आपण कितीही नीचपणा केला तरी, सर्वसामान्य जनता काही दिवसांत ते विसरून जाईल आणि केवळ भाजपावर आपण केलेले खोटेनाटे आरोपच जनता लक्षात ठेवील, तर तो एक जीवघेणा भ्रम ठरणार आहे, याची नोंद या लोकांनी आजच ठेवायला हवी. जनता प्रसंगी हतबल असली, तरी तिच्या मनावर उमटलेले ओरखडे ती विसरत नाही. त्याची व्याजासकट परतफेड ती करते. गेलेला जीव कुणालाही परत आणता येत नाही, हे जरी खरे असले, तरी त्याच्या मारेकर्‍यांना पुरेशी शिक्षा देऊन, न्याय तर देता येतो ना! परंतु, इथे तर तेही घडताना दिसत नाही.
 
आज बंगालची वास्तव स्थिती पाहिली, तर तिथले ममता बॅनर्जींचे रक्तपिपासू सरकार ताबडतोब बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज आहे. यासाठी आणखी किती निष्पाप बळींची वाट बघावी लागणार आहे? बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावली तर टीकेच्या भडिमाराला तोंड द्यावे लागेल, कदाचित न्यायालये मध्यरात्री दारे उघडतील... पण जे योग्य आहे, जे न्याय्य आहे त्यासाठी पावले उचलायलाच हवी. बंगालचे सरकार लोकनिर्वाचित असले, तरी त्या सरकारला विरोधकांच्या हत्या करण्याची परवानगी लोकांनी दिलेली नाही. ही बाब देशाला स्पष्टपणे सांगायची गरज आहे. पुढचा जर लोकशाही पायाखाली तुडवत असेल, तर केंद्र सरकारनेही कुठलीही भीडमुर्वत न ठेवता त्या सरकारला बरखास्त करून त्यांना त्यांची जागा दाखविण्याचे काम केले पाहिजे. हे पुण्यकर्म केंद्र सरकार केव्हा करते ते बघायचे.

No comments:

Post a Comment