Total Pageviews

Thursday, 28 June 2018

सुषमा स्वराज आणि शेफाली वैद्य महा एमटीबी 29-Jun-2018-ही कहाणी आहे बेगम सादिया व मोहम्मद अनस सिद्दिकी या जोडप्याची

ही कहाणी आहे बेगम सादिया व मोहम्मद अनस सिद्दिकी या जोडप्याची. सादियाला नवीन पासपोर्ट तयार करायचा होता आणि मोहम्मदला त्याच्या पासपोर्टचे नूतनीकरण. लखनौ पासपोर्ट कार्यालयात यांचा अर्ज पोहोचल्यावर तिथला अधिकारी विकास मिश्र यांनी, सादिया यांच्या अर्जावर काही त्रुटींवरून आक्षेप घेतले. सादिया पूर्वाश्रमीची तन्वी सेठ होती. लग्नानंतर तिच्या निकाहनाम्यात तिचे नाव सादिया असे लिहिले होते. अशा या सादियाला तन्वी सेठच्या नावाने पासपोर्ट हवा होता. विकास मिश्र यांचे म्हणणे होते की, निकाहनाम्यावर सादिया असे नाव असताना तुम्हाला तन्वी सेठ या नावाने पासपोर्ट मिळू शकत नाही. या नकारानंतर सादिया व विकास मिश्र यांच्यात वादावादी झाली. पासपोर्ट मिळत नाही असे बघताच, सादियाने कांगावा करणे सुरू केले. तिने परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना टि्‌वट करून, विकास मिश्र यांनी आमचा अपमान केला आणि माझ्या नवर्‍याला हिंदू धर्म स्वीकार म्हणून दबाव आणला, असा थयथयाट केला. मी आंतरधर्मीय लग्न केले म्हणून मला पासपोर्ट देत नसल्याचेही तिने सांगितले. झाले! सोशल मीडियावर या टि्‌वटने गदारोळ सुरू झाला. एक हिंदू स्त्री स्वखुशीने मुस्लिम धर्म स्वीकारून एक मुसलमान व्यक्तीशी लग्न करते आणि तरीही तिला ‘विकास मिश्र’ नावाचा (म्हणजे एक कट्टर हिंदू) अधिकारी पासपोर्ट मंजूर करत नाही, म्हणजे काय! असा आशय घेऊन, लोकांनी भाजपा, संघ, हिंदू धर्म, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आगपाखड करणे सुरू केले.
 
हा गदारोळ झाल्यावर, दुसर्‍या दिवशी पासपोर्ट कार्यालयाने सादिया व मोहम्मद यांना कार्यालयात बोलावून मोठ्या सन्मानाने पासपोर्ट बहाल केला. एवढेच नाही तर, सानियाच्या तक्रारीवर विश्वास ठेवून विकास मिश्र यांची लखनौहून गोरखपूरला बदली करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात विकास मिश्र यांचा काहीही दोष नसताना, त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागले म्हणून, पुन्हा एकदा टि्‌वटरवर शाब्दिक युद्ध छेडले गेले. संताप व्यक्त होऊ लागला. कथित भाजपासमर्थक म्हणविणार्‍यांनी या प्रकरणावर परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना दूषणे दिलीत. काही जणांनी सुषमा स्वराज यांच्यावर व्यक्तिगत आरोप केलेत. अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन त्यांच्यावर चिखलफेक केली. सादियाला सन्मानपूर्वक, एका दिवसातच दिलेला पासपोर्ट रद्द करावा आणि विकास मिश्र यांची बदली रद्द करावी, अशी मागणी या लोकांची होती. परदेशातून भारतात आल्यावर सुषमा स्वराज यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून, नियमबाह्य पद्धतीने सादियाला दिलेला पासपोर्ट रद्द केला आणि तिच्यावर दंडही ठोठावला. पासपोर्टवर जो पत्ता द्यायचा असतो, त्या पत्त्यावर ती व्यक्ती कमीतकमी एक वर्ष निवासाला हवी, असा नियम आहे. सादियाने आपल्या अर्जात दिलेल्या माहितीची शहानिशा करताना पासपोर्ट अधिकार्‍यांच्या लक्षात आले होते की, सादियाने जो लखनौचा पत्ता दिला आहे, तिथे ती राहातच नाही.
 
अजूनही काही त्रुटी सादियाच्या अर्जात होत्या. असे असताना सादियाला, तिने हिंदू-मुस्लिम वादाचा कांगावा केल्यानंतर, एका दिवसात कसा काय पासपोर्ट देण्यात आला, हा सर्वांच्या मनात प्रश्न होता. सुषमा स्वराज यांनी अजूनही विकास मिश्र यांची बदली रद्द केलेली नाही आहे. हा सर्व प्रकार भाजपासमर्थकांना व्यथित करणारा होता. काहींनी तर आतापर्यंत आपण भाजपाला समर्थन दिले, याचा पश्चात्तापही व्यक्त केला. पासपोर्ट कार्यालयाच्या मूर्खपणाच्या गदारोळात, सुषमा स्वराज यांनी, त्यांना शिवीगाळ करणार्‍या, हीन दर्जाच्या टि्‌वट पुन:प्रकाशित करून, आपली व्यथा मांडली. हेही लोकांना अपेक्षित नव्हते. त्यातील काही, जे भाजपाचे अत्यंत प्रामाणिक समर्थक होते आणि त्यांनी सभ्यपणे सुषमा स्वराज यांच्यावर टीका केली होती, त्यांनाही स्वराज यांनी दोष दिला. सुषमा स्वराज यांच्यावर कथित भाजपासमर्थकच टीका करीत असल्याचे पाहून, सेक्युलर मीडियावाले, कॉंग्रेस पक्षाचे समर्थक यांनी सुषमा स्वराज यांना पाठिंबा देणे सुरू केले. ‘पाहा, भाजपाचे समर्थक तुमच्यावर कसे तुटून पडले आहेत!’ अशा आशयाचे टि्‌वट येऊ लागले. या सर्व मंडळींना एकदमच सुषमा स्वराज यांचा पुळका आला होता. त्या किती थोर आहेत, कर्तव्यदक्ष आहेत, मोदी सरकारमध्ये एकमेव कर्तृत्ववान मंत्री आहेत इत्यादी स्तुतिसुमने उधळली जाऊ लागली.
 
अजूनही हे प्रकरण शांत झालेले नाही.
या प्रकरणाचा शांतपणे विचार केला तर असे लक्षात येते की, तन्वी सेठ ऊर्फ सादिया हिने अत्यंत चतुराईने ही खेळी खेळली आहे. लग्नानंतर नाव बदलले असताना, हिंदू नावाने तिला पासपोर्ट का हवा होता? ती ज्या घरी राहातच नाही, तिथला पत्ता तिने अर्जात का लिहिला? या सर्व गोष्टी सादियाच्या हेतूबद्दल शंका उत्पन्न करणार्‍या आहेत. असे असताना व पासपोर्ट अधिकारी विकास मिश्र आपले कर्तव्य चोखपणे बजावत असताना, त्याच्यावर का कारवाई करण्यात आली? तिच्या अर्जात गंभीर त्रुटी असतानाही तिला एका दिवसात, पासपोर्ट कार्यालयात बोलावून सन्मानाने पासपोर्ट का देण्यात आला? सुषमा स्वराज तरी या प्रकरणात न्याय करतील, अशी आशा असताना, त्यांनी घोर निराशा केली आहे.
 
‘मी परदेशात असल्यामुळे इथे भारतात काय घडले याबाबत अनभिज्ञ होते’ हा स्वराज यांचा युक्तिवादही लोकांना मान्य नाही. स्वराज यांच्या संमतीशिवाय नियम डावलून पासपोर्ट मंजूर होऊच शकत नाही, यावर लोकांचा ठाम विश्वास आहे. मग आपली सोज्वळ, मदतीला त्वरित धावून जाणारी, सेक्युलर प्रतिमा सांभाळण्यासाठी सुषमा स्वराज धडपडत आहेत का? आज सुषमा स्वराज यांच्यामुळे, सोशल मीडियावर भाजपाचे कडाडून समर्थन करणार्‍या लोकांची फजिती झाली आहे. आधीच या लोकांवर अत्यंत हीन दर्जाचे (ज्यांचे वर्णनही सभ्य व्यक्ती कधीच करू शकणार नाही असे) कॉमेन्ट्‌स होत असतात. केवळ देशाच्या आणि भाजपाच्या प्रेमापोटी ही मंडळी, ही चिखलफेक सहन करीत असतात. ही मंडळी निश्चितच देशप्रेमी आहेत, भाजपाप्रेमी आहेत; परंतु, भाजपाची अंधभक्त नाहीत. कुणी चुकत असेल, तर त्याच्यावर टीका करायलाही ते मागेपुढे बघत नाहीत. यात त्यांचे काय चुकले? तुमच्या प्रतिमेला धक्का बसला म्हणून जर का तुम्ही या मंडळींना ‘अन्‌फॉलो’, ‘ब्लॉक’ करत असाल आणि वाह्यात, हीन दर्जाच्या, देशद्रोही, असभ्य सेक्युलर लोकांपुढे, एखाद्या कोकराला लांडग्यापुढे फेकावे तसे, फेकून देत असाल, तर ते कसे सहन करायचे?
प्रसिद्ध स्तंभलेखिका व सोशल मीडियावर 2012 पासून सक्रिय असलेल्या, तसेच अत्यंत प्रभावी व सडेतोड युक्तिवादामुळे सेक्युलर मीडियाने धास्ती घेतलेल्या शेफाली वैद्य यांनी ही व्यथा एका लेखाद्वारे मांडली आहे. हिंदुत्वाचे समर्थन करतो म्हणून, किती गलिच्छ आरोपांना सामोरे जावे लागते, खून करण्याच्या तसेच बलात्कार करण्याच्या किती धमक्या सहन कराव्या लागतात, वेगवेगळे फोटो एकत्र करून कितीतरी वेळा चारित्र्यहनन करण्यात येते व त्यामुळे कुटुंबाला किती मानसिक ताण सहन करावा लागतो, याचे वर्णन शेफाली वैद्य यांनी या लेखातून केले आहे. केवळ देशासाठी आणि हिंदुत्वासाठी त्या व त्यांचे कुटुंबीय हे सर्व सहन करतात. अशात जर सुषमा स्वराज त्यांना ‘ब्लॉक’ करीत असतील, तर ही व्यथा शेफाली यांनी कुठे मांडावी? निर्भीडपणे सत्य मांडले म्हणून जर कुणी मला ‘ट्रोल’ (सोशल मीडियावरील दुष्ट हेतूच्या व्यक्तीसाठी वापरण्यात येणारे विशेषण) करत असेल तरी बेहत्तर! मी त्या पक्षाला समर्थन देत असले तरी, त्या पक्षाच्या एखाद्या मंत्र्याची चूक उघड केली म्हणून मी ट्रोल होत असेल तरी बेहत्तर! सत्य बोलले म्हणून शत्रू माझे वाभाडे काढत असले आणि ‘मित्र’ मला हिणवत असले तरी बेहत्तर! अशी भूमिका शेफाली वैद्य यांनी घेतली आहे. शेवटी काय, सेक्युलर मीडियाची वाहवाह मिळावी म्हणून आपल्या समर्थकांना वेदनेच्या गर्तेत ढकलणार्‍या सुषमा स्वराज, शेख चिल्लीहून वेगळ्या नाहीत, असेच मानावे काय?

No comments:

Post a Comment