अधिकारपदावर आल्यापासून भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे राजकीय वादात सापडलेले आहेत. मध्यंतरी काश्मिरात मेजर गोगोई यांनी दगडफेक्याला जीपवर बांधला व शांतता प्रस्थापित केली. तेव्हा मानवाधिकारवाल्यांनी काहूर माजवले होते. अशा वेळी राजकीय शहाणपणा दाखवून रावत यांनी क्षमायाचना केली नाही. ठामपणे ते आपल्या अधिकार्याच्या पाठीशी उभे राहिले, म्हणून अनेक राजकीय पक्षनेतेही चिडलेले होते. एका बाजूला चौकशी चालू असताना रावत यांनी मेजर गोगोई याच्या प्रसंगावधान राखण्याच्या कौशल्याला सन्मानित करून दाद दिली होती. किंबहुना, तेव्हापासूनच ते राजकीय पक्षांचे लक्ष्य झालेले आहेत; पण सीमा व नियंत्रणरेषा या जागी चालू असलेल्या हिंसाचाराचा योग्य समाचार घेत असल्याने सरकारही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. कदाचित त्यामुळे असेल, जनरल रावत नेहमी राजकारण्यांची शिकार होत असतात.
कितीही टीका झाली तरी या सेनाधिकार्याने आपले प्रामाणिक मत व्यक्त करण्यात कसूर केलेली नाही आणि देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कुठलीही तडजोड करण्याचा आत्मघातकी पवित्रा त्यांनी घेतलेला नाही. एका बाजूला दहशतवाद व जिहादचा बंदोबस्त करीत असतानाच, दुसरीकडे काश्मिरातील तरुण मुले देशविरोधी कारवायांत ओढली जाऊ नयेत, म्हणून रावत यांनी विविध उपक्रमांतून काश्मिरी मुलांना विधायक विचारांकडे वळवण्याची मोहीम यशस्वीपणे राबवली आहे. त्याचे कोणी कौतुक करीत नसेल, तर त्यांच्यावर टीकाही करायचा अधिकार कोणाला उरत नाही. कारण, राजकीय कटूसत्य बोलण्याचा अधिकार नसेल, तर त्याच्याकडून कायदा सुव्यवस्था राखण्याचीही अपेक्षा बाळगता येणार नाही.
प्रामुख्याने सामाजिक सौहार्द व सामंजस्य निर्माण करण्याची ज्यांची जबाबदारी आहे, त्या राजकीय नेत्यांनी वितुष्ट वाढवणारी मुक्ताफळे उधळावी आणि सेनापतीला शहाणपण शिकवावे, हाच मुळात मर्यादाभंग आहे. कारण, या राजकीय उचापतखोरांनी केलेल्या भानगडीचे परिणाम जनतेला भोगावे लागतात आणि निस्तरण्याचे काम सैन्याला करावे लागत असते. मग ज्याला दुखते त्याने आपली वेदना बोलून दाखवली, यात गैर काय झाले? परकीय उपर्यांची घुसखोरी आणि नंतर होणारे घातपात लष्कराने निस्तरायचे, तर त्याची मीमांसाही त्यांनीच करायला हवी. म्हणूनच आसाममध्ये जी बांगलादेशी घुसखोरी चालते, त्यावर बिपीन रावत यांनी व्यक्त केलेले मत, हा कुठल्याही अर्थाने मर्यादाभंग मानता येणार नाही. ओवैसी यांच्यासारख्या निव्वळ चिथावणीखोर बकवास करणार्याला तर तशी तक्रार करण्याचा बिलकूल अधिकार असू शकत नाही
No comments:
Post a Comment