भारता आम्ही तुलाच देव मानतो |
हाच महाराष्ट्र धर्म आम्ही एक जाणतो ।।
राखतो महान आमची परंपरा |
रक्त शिंपुनी पवित्र ठेवितो धरा ।। मराठा स्पुरथी गित...
वरील शब्द आहेत आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकरांचे. त्यांनी ते लिहिले आहेत भारतीय सैन्यदलातील मराठा रेजिमेंटसाठी. या शब्दांना सुरांचा साज चढवला बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांनी. या चार ओळी मराठा रेजिमेंटमध्ये रोज सामुदायिकपणे म्हटल्या जाणार्या स्फूर्तीगीतातील आहे. संपूर्ण स्फूर्तीगीतच गदिमांचे आहे. मराठा बटालियननी दुसर्या महायुद्धातही आपल्या पराक्रमाची चमक दाखवली. आफ्रिका खंडातील डोंगरांपासून ते वाळवंटांपर्यंत सर्व प्रकारच्या युद्धभूमीवर मराठा बटालियनने शौर्य गाजवून सर्व लढाया जिंकल्या. या युद्धात मराठा रेजिमेंटच्या सर्व बटालियन या उत्तर आफ्रिका, युरोप, ब्रह्मदेश येथे लढल्या आणि आपल्या मर्दुमकीचा ठसा त्या भूप्रदेशावर उमटवला. याच युद्धातील असीम शौर्याबद्दल मराठा बटालियनच्या नामदेव जाधव आणि यशवंत घाडगे यांना खास व्हिक्टोरिया क्रॉसने इटलीत सन्मानित करण्यात आले.
स्वातंत्र्यानंतरचा इतिहास :
स्वातंत्र्यानंतर गोवा मुक्ती संग्रामावेळी आदेश मिळताच बेळगावमधील ‘मराठा लाईट इन्फन्ट्री’ रेजिमेंटचे सैनिक बेळगाव, वेंगुर्लामागे गोव्यात पायी गेले आणि त्यांनी पोर्तुगीजांना पराभूत करत माघारी जाण्यास भाग पाडले. तसाच पराक्रम त्यांनी दमण-दीव येथेही गाजवला. १९६२ च्या युद्धात सिक्कीममध्ये मराठाची तुकडी आघाडीवर होती. ‘मराठा लाईट इन्फन्ट्री’मधील ६ मराठा बटालियनला चीनबरोबरच्या युद्धात सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील तिबेट सीमेवर कामगिरी केली. १९६५ आणि १९७१च्या पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धातही ही बटालियन आघाडीवर होती. १९६५च्या युद्धात अमृतसर वाघा येथून आत प्रवेश करत पाकिस्तानी हद्दीतील बुर्ज नावाच्या ठाण्यावर कब्जा करणारी तुकडी मराठाचीच होती. पुण्यात ज्यांच्या नावाने साळुंके विहार (जिथे मी रहातो) हा परिसर ओळखला जातो, त्या सिपायी पांडुरंग साळुंके यांना याच लढाईसाठी महावीर चक्र मिळाले होते. केवळ देशातच नव्हे, तर देशाबाहेर युद्ध करण्याची आणि ते जिंकण्याची परंपरा मराठा बटालियन्सनी आजही जिवंत ठेवली आहे. स्वतंत्र हिंदुस्थानच्या सरकारने जवानांच्या पराक्रमासाठी अशोकचक्र देण्यास सुरुवात केल्यानंतर पहिले अशोकचक्र ‘२ मराठा बटालियन’चे कॅप्टन एरिक ठक्कर यांनी मिळवले. हडपसरमधील लष्करी अधिकार्यांच्या निवासस्थानांचा परिसर असलेला टक्कर विहार हा परिसर त्यांच्या नावे ओळखला जातो, त्यांनी मिझोराम-नागालँडमध्ये बंडखोरांशी लढताना गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना अशोकचक्राने सन्मानित करण्यात आले होते. १९७१च्या युद्धात तत्कालीन पूर्व पाकिस्तानात ‘मराठा लाईट’च्या सैनिकांनी आपल्या पराक्रमाने सर्वांना थक्क केले. मेजर नांबियार आणि लेफ्टनंट कर्नल ब्रार यांना ढाकाच्या लढाईसाठी वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील कर्नल संभाजी पाटील यांच्या ‘२२ मराठा’च्या तुकडीने असामान्य धैर्य दाखवत हिली प्रांत ताब्यात घेतला ढाक्यावर कब्जा केला. या विजयाचे श्रेय या तुकडीलाच जाते. पूर्व पाकिस्तानातच ‘७ मराठा लाईट इन्फन्ट्री’च्या तुकडीने (माझी बटालियन) पाचागड व कांतानगर येथील महत्त्वाच्या ठिकाणांवर कब्जा केला होता.त्याचवेळी लाहोरकडे जाणार्या रेल्वेमार्गावरील नैनाकोट हे पाकिस्तानातील अत्यंत मोक्याचे ठाणे ‘मराठा’च्याच तुकडीने आपल्या विलक्षण पराक्रमाच्या जोरावर ताब्यात घेतले. या लढाईसाठी पुण्यातील कर्नल सदानंद साळुंके यांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आले.
काश्मीर असो वा अरूणाचल, राजस्थान असो वा सियाचिन अशी एकही सीमा नाही, जिथे ‘मराठा’ची तुकडी तैनात नाही. अगदी संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेतही ‘मराठा’ची कामगिरी अत्यंत उजवी राहिली आहे. गरिबी, मागासलेपणा, भ्रष्टाचार याचा जवळून अनुभव घेतलेले आपले सैनिक अशा ठिकाणी अन्य परकीय सैन्याच्या तुलनेत उत्तम कामगिरी करतात, याची दखल संयुक्त राष्ट्रांनीही घेतली आहे.
भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्येही ‘मराठा रेजिमेंट’च्या सैनिकांचा समावेश आहे. ‘सेकंड पॅरा’च्या तुकडीनेही उत्तम काम केले आहे. म्यानमारमधील ‘सर्जिकल स्ट्राईक’सारख्या अत्यंत अभिमानास्पद कारवाईतही मराठाच्या सैनिकांचा समावेश होताच. कर्नल व्हि. बी. शिंदे यांनीच पहिली स्पेशल फोर्सेस बटालियन सुरू केली.
मराठा रेजिमेंटची परंपरा,
रक्त शिंपुनी पवित्र ठेवती घरा...
‘मराठा रेजिमेंट’ लढते आपल्या रेजिमेंटच्या नाव, परंपरा, अभिमान आणि निष्ठेसाठी. मराठा सैनिक गरीब कुटुंबातून आले असले तरी ते अत्यंत काटक, चपळ, कुशल, तगडे आणि कुठल्याही कामगिरीसाठी सदैव तयार असलेले आणि शिस्तीचे भोक्ते असतात. म्हणूनच रणांगणावर त्यांच्या शौर्याला धार चढते. आधुनिक काळातील कोणतेही तंत्रज्ञान व डावपेच ते सहज आत्मसात करतात. ‘मराठा लाईट इन्फन्ट्री’ने स्वातंत्र्यानंतर देशाच्या रक्षणार्थ दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. प्रत्येक युद्धात मराठे आघाडीवर होते. त्यासाठी वेळोवेळी महावीर चक्र, अशोक चक्र, वीर चक्र आदी सन्मान देऊन लष्कराने त्यांची जाणीव ठेवली. आतापर्यंत ‘मराठा रेजिमेंट’ला ६५० हून जास्त शौर्य पुरस्कार मिळाले आहेत. ‘मराठा रेजिमेंट’चा इतिहास हा तर ’Valour Enshrined Part 1 & 2’ या पुस्तकात देण्यात आला आहे. त्यांचे शौर्य हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
लष्करामध्ये ‘मराठा लाईट इन्फन्ट्री’ला वेगळाच सन्मान आहे. तो मराठ्यांनी आपल्या परंपरागत अतुलनीय शौर्य, कडक शिस्त आणि कार्यकुशलता आणि व्यावसायिकतेच्या जोरावर मिळवला आणि टिकवलाही आहे. म्हणूनच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील किंवा धोकादायक सीमांवर लढण्यासाठी ‘मराठा’च्याच तुकडीची वारंवार निवड केली जाते. काश्मीर किंवा ईशान्य भारतात दहशतवादी, बंडखोरांशी लढताना दर्शविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल रेजिमेंटच्या अधिकार्यांना अशोक चक्र मिळाले. पहिल्या व दुसर्या महायुद्धातील व्हिक्टोरिया क्रॉस, महावीर चक्राचा इतिहास व इतर सर्व युद्धांमध्ये मराठ्यांनी गाजवलेला पराक्रम सर्वश्रुत आहेच. मराठा ही लढवय्या जात आहे, त्यामुळेच सर्वच आघाड्यांवर मराठ्यांची नेमणूक झाल्याचे दिसते. त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.
‘मराठा लाईट इन्फन्ट्री’ रेजिमेंटचा झेंडा कायम उंच फडकत राहील :
अलीकडे छुपे युद्ध, दहशतवादी हल्ले, बंडखोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यावेळी शिवरायांचे डावपेच, युद्धनीती, गनिमी कावा आपल्या कामी येणार आहे. हलक्या पावलांनी चालत शत्रूला बेसावध ठेवत नेमक्या वेळी नियोजनबद्ध हल्ला करत शत्रूचे शक्य तितके नुकसान करतानाच स्वत:चे नुकसान होऊ न देणे महत्त्वाचे ठरणार आहे. बदलत्या गरजांनुसार त्यांना सर्व आधुनिक प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे आधुनिक युद्धातही ते कायम आघाडीवर राहतील, यात शंका नाही.
कोणत्याही रेजिमेंटसाठी २५० वर्षं हा अत्यंत गौरवास्पद क्षण असतो. तो दणक्यात साजराही व्हायला हवा. गौरवशाली इतिहासाला उजाळा द्यायला हवा. छत्रपती शिवाजींच्या आदर्शांवरच वाटचाल करताना आपल्या ‘मराठा लाईट इन्फन्ट्री’ रेजिमेंटचा झेंडा कायम उंच ङ्गडकत राहील, याची दक्षता घ्यायला हवी. बाकी, देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचीही आहुती द्यायचीही मराठ्यांची तयारी असणारच.
असा हा ‘मराठा लाईट इन्फन्ट्री’ रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास आहे. आपल्या पूर्वजांची ही कर्तबगारी आपल्याला माहिती हवी, आपण ती पुढच्या पिढीला सांगायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठाचे दैवत आहे. ‘बोल श्री शिवाजी महाराज की जय’ ही आमची युद्धघोषणा आहे. आपण शिवाजींचे सरदार आहोत, आपल्यामुळे त्यांच्या नावाला बट्टा लागता कामा नये, हेच ‘मराठा रेजिमेंट’मध्ये नव्याने दाखल होणार्या प्रत्येकाला शिकवले जाते. बाकी चपळता, उत्तम शरीरसंपदा, काटकपणा, गनिमी कावा आणि युद्धकौशल्य त्यांच्याकडे असतेच, त्याच्या बळावरच ‘मराठा लाईट इन्फन्ट्री’ आज देशाच्या सर्व सीमा सांभाळण्यात आघाडीवर आहे आणि यापुढेही राहील.
मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला भरे कापरे मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला भरे कापरे मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला भरे कापरे देश रक्षाया, धर्म ताराया, कोण झुंजीत मागे सरे ।। धृ ।। वादळापरी आम्ही पुढेच चालतो, जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो मराठा कधी न संगरातुनी हटे, मारुनी दहास एक मराठा कटे सिंधु ओलांडुनी, धावतो संगिनी, पाय आता न मागे सरे ।। १ ।। व्हा पुढे अम्हा धनाजी, बाजी सांगती, वीर हो उठा कडाडतात नौबती विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी, पूर्वजापरी आम्ही अजिंक्य संगरी घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी, मृत्यू अम्हा पुढे घाबरे ।। २ ।। भारता आम्ही तुलाच देव मानतो, हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो, राखतो महान आमची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवती धरा ह्याच मातीवरी प्राण गेला तरी, अमुची वीर गाथा उरे ।।
‘मराठा लाईट इन्फन्ट्री’ त्रिवार वंदन.
No comments:
Post a Comment