काय आहे आजचे सामना संपादकीय?
हिंदुस्थानच्या लष्करप्रमुखांनी एक वक्तव्य केले व त्यावर आता वादळ उठले आहे. आसाम आणि ईशान्य हिंदुस्थानातील परिस्थिती गंभीर होत असून त्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे, असे मत लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी मांडले आहे. आसाममध्ये ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ हा पक्ष वाढत आहे व ही परिस्थिती चिंताजनक आहे, असे लष्करप्रमुखांना वाटते. लष्करप्रमुखांनी केलेले हे वक्तव्य राष्ट्रहित व सुरक्षा यास धरून होते, पण ‘फ्रंट’चे प्रमुख खासदार मोहम्मद बद्रुद्दीन अजमल यांनी रावत यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. लष्करप्रमुखांना इतक्या टोकाचे का बोलावे लागले? व त्यानंतर असदुद्दीन ओवेसी आणि बद्रुद्दीन अजमलसारख्या लोकांचा तीळपापड का झाला? याचे उत्तर एका वाक्यात द्यायचे तर लष्करप्रमुख रावत यांनी वर्मावरच घाव घातला आहे. आसामचे सीमावर्ती जिल्हे हे ‘बांगलादेशी’ घुसखोरांनी व्यापले आहेत व हे लोक ‘हुजी’सारख्या हिंदुस्थानविरोधी दहशतवादी संघटनांना मदत करीत आहेत. बद्रुद्दीन अजमल यांचा आसामातील पक्ष याच घुसखोर बांगलादेशींचे प्रतिनिधित्व करीत असेल तर ते गंभीरच आहे. लष्करप्रमुखांनी अत्यंत टोकदार विधान केले व त्यामुळे एकाच दगडात चार-पाच पक्षी मरून पडले आहेत.
पश्चिम बंगाल व आसामातील जिल्हे हे जणू प्रति बांगलादेश झाले आहेत. ईशान्येतील मेघालयासह अनेक राज्यांत बांगलादेशी मोठ्य़ा प्रमाणावर घुसले आहेत. या घुसखोर बांगलादेशींकडे फक्त मुसलमान म्हणून पाहता येणार नाही, तर ते बेकायदेशीर नागरिक व देशात येऊन अशांतता निर्माण करणारे लोक म्हणून पाहायला हवे. प्रामुख्याने आसाम आणि परकीय नागरिकत्वाचा वाद ही जुनीच समस्या आहे. दोन-अडीच दशकांपूर्वी याच वादामुळे आसाम पेटले होते. या प्रश्नावर रान उठविणारी ‘ऑल आसाम स्टुडंटस् युनियन’ म्हणजे ‘आसू’ ही विद्यार्थी संघटना नंतर तेथे सत्तेवर आली होती. मात्र पुढे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि आज घुसखोरांच्या प्रचंड लोंढ्य़ांनी आसाममधील अनेक जिल्हे मुस्लिमबहुल झाले आहेत. एवढे की त्याठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा-लोकसभेपर्यंत मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक ठरते. लष्करप्रमुख रावत यांनी ज्या ‘एआययूडीएफ’ या पक्षाबद्दल वक्तव्य केले आहे त्या पक्षाचे पहिल्याच निवडणुकीत १० आमदार निवडून येण्यामागे बहुधा हेच ‘गणित’ असावे. या पक्षाचे खासदार अजमल आणि ‘एमआयएम’चे असदुद्दीन ओवेसी यांना भलेही लष्करप्रमुखांचे वक्तव्य ‘राजकीय’ वाटत असेल पण ते जे बोलले ती वस्तुस्थितीच आहे ना!
खरे म्हणजे ओवेसी व अजमलसारखे पुढारी या प्रकरणास मुसलमानी राजकारणाचा रंग देतात हे सर्वस्वी चुकीचे आहे. घुसखोरांनी देशाच्या सीमा कुरतडल्या आहेत व त्यांचे हे कुरतडणे मुंबई-नवी मुंबई व दिल्लीसारख्या शहरांपर्यंत पोहोचले आहे. चीन व पाकिस्तानसारखी राष्ट्रे या कुरतडण्यास बळ देत आहेत व लष्करप्रमुखांनी नेमके तेच सांगितले आहे. एखादी भूमिका राष्ट्रहिताची असेल, राष्ट्रीय सुरक्षेबाबत असेल तर लष्करप्रमुखांनी ती मांडण्यात काहीच चुकीचे नाही. बांगलादेशी घुसखोरांविरुद्धची मोहीम शिवसेनेनेही सुरू केलीच होती व आजही आम्ही त्याच भूमिकेवर ठाम आहोत. हिंदुस्थानात साधारण अडीच ते तीन कोटी बांगलादेशी घुसले आहेत. मुंबई-ठाणे, मुंब्रा-नवी मुंबई परिसरातील ३५ लाखांच्या आसपास घुसखोर बांगलादेशी आहेत. मग आसाम किंवा ईशान्येतील राज्यात ते किती संख्येने असतील याची कल्पनाही करता येणार नाही. लष्करप्रमुखांनी सीमा भागातील घुसखोरीबाबत केलेले विधान योग्य आहे. आज कश्मीर खोऱ्यात जे सुरू आहे तेच उद्या आसाम व ईशान्येकडील राज्यात घडू नये असे वाटत असेल तर जनरल बिपिन रावत यांचे विधान गांभीर्याने घ्यायलाच हवे. जनरल रावत यांचा बार फुसका नसून त्यांनी केलेला हा जोरदार हल्ला आहे. त्यांचे अभिनंदन