मानवी जीवनात नियतीची अटळता निर्विवाद आहे. नियती माणसाचं जीवन घडवतेही आणि बिघडवतेही. क्षणात कीर्तिच्या अढळस्थानी नेऊन बसवते, तर क्षणात त्याच्या स्वप्नांचा चक्काचूरही करते. पण अशा परिस्थितीत माणसाने नियतीशरण होऊन हतबल जगण्यापेक्षा, नियतीशी धैर्याने सामना करून, तिच्यावर मात करून सकारात्मक जगणं यातच त्याच्या जीवनाची इतिकर्तव्यता असते. किंबहुना तीच त्याची अपराजितता असते. याचाच अनुभव एअर कमोडोर नितीन साठे यांनी लिहिलेल्या Born to Fly या इंग्रजी पुस्तकाचा सुनीति जैन यांनी केलेला 'अपराजित' हा अनुवाद वाचताना येतो.
अपराजित ही कहाणी आहे एमपी अनिलकुमार या फ्लाईंग ऑफिसरची. केरळमधील चिरायिंकीळ या छोट्याशा गावात पंचपाकेसन आणि एसएम कमलम्मा यांच्या पोटी जन्म घेतलेल्या या मुलाचे पूर्ण नाव मदनविला पंचपाकेसन अनिलकुमार. काकांच्या आग्रहाखातर त्याने कळकूट्टम येथील सैनिक शाळेत प्रवेश घेतला, आणि अत्यंत खडतर असे एकेक टप्पे पार करीत भारतीय वायुसेना दलात मिग २१ या विमानाचा वैमानिक झाला. हा २४ वर्षांचा प्रवास साधा सरळ नव्हताच. पण एमपीच्या स्वप्नपूर्तीचा होता. परंतु हा स्वप्नपूर्तीचा आनंद एमपीला फार काळ उपभोगता आला नाही. १९८८ मध्ये त्याच्या मोटरसायकलीला झालेल्या अपघातात त्याला कायमचे अपंगत्व आले. मिग २१ या लढाऊ विमानातून आकाशझेप घेणारे त्याचे हात आणि पाय कायमचे निकामी झाले होते. आकाशात भरारी मारणाऱ्या विमानाच्या सीटवर बसण्याऐवजी त्याच्या नशिबी कायमची 'व्हीलचेअर' आली होती. अशा परिस्थितीत नकारात्मक जाणिवांशी, नैराश्याशी संघर्ष करीत त्याने नियतीशी दोन हात केले. ऐन तारुण्यातील सारी ऊर्जा 'लेखन' या माध्यमावर वापरून आपल्या जगण्याला अर्थपूर्ण केले. लेखन करण्यासाठीही हात निरुपयोगी असताना त्याने प्रयत्नपूर्वक तोंडात लेखणी धरून, नंतर तोंडात काडी धरून संगणकावरून लेखन करीत केवळ विकलांगानाच नव्हे, तर धडधाकट माणसांनाही आदर्श वस्तुपाठ कसा घालून दिला, याचे थरारक चित्रण 'अपराजित' या पुस्तकात आले आहे.
हे पुस्तक म्हणजे एमपी अनिलकुमारचे आत्मकथन नव्हे किंवा नितीन साठे यांनी लिहिलेले एमपीचे चरित्रही नव्हे. चरित्र आणि आत्मकथन यांच्या सीमारेषेवरचं अनोखं असं पुस्तक आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमीत ( एन. डी. ए. ) मध्ये एमपी सोबत शिकत असणाऱ्या वर्गमित्राने म्हणजेच नितीन साठे यांनी परिश्रमपूर्वक साधनसामग्री गोळा करून, त्याची नीटस मांडणी करून हे लिहिलं आहे. १९८८ साली एमपीला अपघात झाल्यानंतर त्याचं उर्वरित आयुष्य, म्हणजे कर्करोगाने त्याचे निधन होईपर्यंतचं आयुष्य, खडकी येथील पॅराप्लेजिक होममध्ये गेलं. या काळात नितीन साठे सातत्याने एमपीच्या भेटीला येत असत. त्या गप्पांच्या ओघात नितीन साठे यांना एमपीच्या आयुष्याची खडान् खडा माहिती मिळाली होती. एमपीचा जीवनसंघर्ष त्यांनी अगदी जवळून पाहिला होता. हा जीवनसंघर्ष सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणारा होता, हे जाणून एमपीच्या मृत्यूनंतर एमपीने लिहिलेले लेख, एमपीच्या मित्रांनी, कुटुंबीयांनी, त्याची अहोरात्र सेवा करणाऱ्या मदतनीसांनी, त्याच्या शिक्षकांनी, वायुसेना दलातील ऑफिसर्स आणि सहकाऱ्यांनी सांगितलेल्या आठवणी, एमपीने स्वतः सांगितलेल्या आठवणी, एमपीला आलेली आणि त्याने पाठवलेली पत्रं, त्याने केलेल्या नोंदी या सर्वांची उत्तम मांडणी करून साठे यांनी एमपीचं संपूर्ण चरित्रच उभं केलं आहे.
या पुस्तकाची रचना चार टप्प्यात झाली आहे. एमपीचं बालपण, त्याचं सैनिकी प्रशिक्षण, त्याचं अपघातानंतरचं संघर्षमय जीवन आणि मृत्युनंतरही इतरांना प्रेरणादायी ठरलेले अनुभव, या साऱ्या घटकांची रचना बहुपेडी करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. बालपणापासून ते मृत्युपर्यंतचा एमपीचा संघर्षमय प्रवास लेखकाने नेमकेपणाने रेखाटला आहे. एमपीच्या आयुष्यातले संघर्षाचे टप्पे थक्क करून सोडणारे आहेत. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळण्यासाठी केलेला संघर्ष असो की अपघातानंतर तोंडाने लिहिण्यासाठी केलेला प्रयत्न असो. एनडीएत बॉक्सिंग करताना जायबंदी झालेल्या अंगठ्यामुळे डाव्या हाताने लेखन करणे असो, तोंडात काडी धरून संगणकाचा की बोर्ड वापरणे असो की अत्याधुनिक परकीय बनावटीची व्हीलचेअर नादुरुस्त झाल्यामुळे साध्या व्हीलचेअर बसून जगणं स्वीकारणं असो. हा सारा प्रवासच थरारक असल्याची जाणीव या पुस्तकाच्या पानापानातून होत राहते. आपल्या अपंगत्वावर मात करून अतिशय सकारात्मक ऊर्जेने जगणाऱ्या एमपीचा मृत्यू मात्र कॅन्सर सारख्या असाध्य रोगाने वयाच्या पन्नाशीत होतो. या साऱ्याच घटना लेखकाने अतिशय संवेदनशीलतेने टिपल्या आहेत.
अपघात होण्यापूर्वीचं एमपीचं स्वतंत्र, शिस्तबद्ध जगणं आणि विकलांग झाल्यानंतर प्रत्येक बाबतीत आलेली पराधीनता नियतीची अटळता अधोरेखित करीत जाते. आपल्या संघर्षमय जीवनाबद्दल एमपी म्हणतो, 'छात्रांना फक्त शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनवणं एवढंच काही एनडीएचं काम नाही तर कोणत्याही परिस्थितीला तोंड देता येणं आणि त्या परिस्थितीत तग धरता येणं हेही अकादमीत शिकवलं जातं. 'हाच संस्कार' एमपीच्या मनात खोलवर रुजला होता, याची साक्ष हे पुस्तक वाचताना पटत जाते.
लेखक नितीन साठे यांनी एक माणूस म्हणून, मित्र म्हणून, सैनिकी विद्यार्थी म्हणून, लढाऊ वैमानिक आणि मार्गदर्शक म्हणून एमपीचे चित्रण हृदयस्पर्शी केले आहे. कधी फ्लॅशबॅक तंत्र वापरून, कधी एमपीच्या नोंदीतील, लेखातील उतारे उद्धृत करून, तर कधी एमपीच्या मित्रमैत्रिणींनी, सहकाऱ्यांनी, कुटुंबीयांनी सांगितलेल्या आठवणींची विलक्षण गुंफण करून एमपीचं व्यक्तिमत्व त्याच्या स्वभाववैशिष्ट्यांसह नेमकेपणाने रेखाटले आहे. या पुस्तकाचा अनुवाद सुनीति जैन यांनी इतका सुलभ आणि सुघड केला आहे की आपण अनुवाद वाचत नसून स्वतंत्र साहित्यकृतीच वाचत असल्याचा अनुभव येतो.
पुस्तकाचे मूळ शीर्षक Born to Fly असे असतानाही त्याचा शब्दशः अनुवाद न करता एमपीच्या झुंजार वृत्तीला, संघर्षमय गाथेला समर्पक असे 'अपराजित' शीर्षक दिले आहे. तर या पुस्तकाचे मुखपृष्ठही तितकेच प्रभावी आहे. चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी एमपीच्या बालपणातील स्वप्नाचे प्रतीक म्हणून कागदी विमान, आकाशाचा निळा रंग, भारतीय अस्मितेचे प्रतीक असणारा तिरंगा आणि मिग फायटर विमानाची प्रतिकृती यांची सुंदर सांगड घालून मुखपृष्ठ साकारले आहे
No comments:
Post a Comment