Total Pageviews

Sunday, 25 February 2018

त्रिपुरातला मराठी सुभेदार महाराष्ट्रातून गेलेला सुनील देवधर


दिनेश कानजी
सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी त्रिपुराच्या प्रभारीपदी सुनील देवधर यांची नियुक्ती झाली. हा प्रदेश भाजपसाठी तसा दुष्काळीच होता. संघटन नावाची चीज अस्तित्वात नव्हती. काही प्रमाणात बांगलाभाषिकांमध्ये पुसटसे अस्तित्व होते, परंतु जनजातीय क्षेत्रात पक्ष औषधालाही नव्हता. २०१३च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ १.५४ टक्के मते पडली होती. लोकसभा निवडणुकीत देशभरात घवघवीत यश मिळाले असताना त्रिपुरात मात्र दोन्ही जागांवर अनामत जप्त झाली होती.
रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असलेल्या प्रचारकांपैकी सुनील देवधर हे भाजपमधील एक नाव. एम.एस्सी. बीएड.पर्यंत शिक्षण आणि पेशाने शिक्षक असलेले देवधर मेघालयात 8 वर्षे संघाचे प्रचारक होते. प्रचारक म्हणून थांबल्यानंतर ‘माय होम इंडिया’ या संस्थेची स्थापना करून ते एक दशक ईशान्य हिंदुस्थानसाठी काम करीत आहेत. त्यामुळे ईशान्य हिंदुस्थान हा सुनील यांच्यासाठी अनोळखी प्रांत नव्हता. तेथील खासी, सिल्हेटी बांगला, थोडीफार नेपाळी, असमिया या भाषा ते अस्खलित बोलतात. याशिवाय गुजराती, हिंदी, इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. २०१२ मध्ये गुजरात निवडणुकीत दाहोद जिल्ह्याची आणि २०१४ च्या निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी देवधर यांनी समर्थपणे पेलली होती.
संघटनचातुर्य, बांगला भाषेवर प्रभुत्व, झोकून काम करण्याची वृत्ती हा त्यांचा ट्रक रेकॉर्ड पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांना माहीत होता. त्याच आधारावर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेल्या देवधर यांच्यावर त्रिपुराची सूत्रे साडेतीन वर्षांपूर्वी सोपवण्यात आली. पहिले सहा महिने देवधर यांनी दोन वेळा संपूर्ण प्रदेश पिंजून काढला. कानाकोपऱयात जाऊन समस्यांची माहिती घेतली. तेव्हा तेथे पक्ष संघटनेची स्थिती तोळामासा होती. बरेच पदाधिकारी केवळ खुर्ची उबवण्याचे काम करीत होते. सत्ताधारी माकपसोबत ‘सलोखा’ असलेलेदेखील काही होते. तेव्हा नवी टीम बनवल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही हे त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला पटवून दिले.
विप्लब देब या ताज्या दमाच्या युवकाला प्रदेशाध्यक्षपदी आणून प्रदेश भाजपची नवी टीम बनवली. ‘मुख्यमंत्री माणिक सरकार यांची प्रतिमा स्वच्छ असल्यामुळे त्यांच्या विरोधात बोलू नका, बूमरँग होईल’ असा सल्ला पक्षातल्या बुजुर्गांनी दिला होता, परंतु ज्यांच्या २० वर्षांच्या कारकीर्दीत राज्यातील दारिद्रय़रेषेखालील जनतेचा टक्का ६८ पर्यंत पोहोचला, ३७ लाख लोकसंख्येच्या राज्यात बेरोजगारांची संख्या ७ लाखांपर्यंत वाढली, महिला अत्याचार आणि भ्रष्टाचाराबाबतीत राज्याला देशात क्रमांक १ बनवले, ज्यांच्या काळात नशेचा कारभार बरकतीला आला, राजकीय हत्यांना ऊत आला त्या सरकारविरोधात गप्प बसून चालणार नाही हे देवधर यांना लक्षात आले.
‘स्वच्छ आणि साधा मुख्यमंत्री’ ही माणिक सरकार यांची उर्वरित देशात असलेली प्रतिमा हेदेखील देवधरांसमोरील एक आव्हानच होते. मात्र त्यात डाव्यांच्या प्रचारतंत्राने निर्माण केलेल्या भ्रमजालाचा भाग खूप आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी सर्वप्रथम माणिकबाबूंचा मुखवटा ओरबाडण्याचे काम सुरू केले. प्रचारसभांमध्ये माणिक सरकार यांच्या विरोधात तोफ डागल्यावर होणारा टाळय़ांचा कडकडाट ही रणनीती योग्य असल्याची साक्ष देत होता. काँग्रेसच्या काळातली लुटूपुटूची लढाई संपली असून राज्यात प्रथमच कडवा विरोध होऊ लागलाय हे माणिकबाबूंच्याही लक्षात आले. अस्खलित बांगलामधून, काही प्रमाणात जनजातीयांच्या कोकबोरोतून तासभर भाषण देणारा भाजपचा प्रभारी त्यांना अस्वस्थ करत होता. ‘भाजपने त्रिपुरा में महाराष्ट्रसे सुभेदार भेजा है’ या शब्दात माणिक सरकार यांना देवधरांची दखल घेण्याची वेळ आली. पुढे पुढे तर डाव्या नेत्यांच्या प्रत्येक भाषणात ‘सुभेदारा’बाबतचा स्वर अधिक कडवट होत गेला.
देवधर यांचा निवास असलेली आगरतळय़ातली शाम्लिमा बिल्डिंग भाजपच्या प्रचारकार्याचे केंद्र बनली. त्रिपुराच्या कानाकोपऱयात प्रवास, अखंड जनसंपर्क, जेमतेम चार तास झोप हे त्यांचे गेल्या अडीच वर्षांतले वेळापत्रक. त्रिपुराच्या खड्डेमय रस्त्यांवर चार तास प्रवास केला की मणक्याचा काटा ढिला होतो. तिथे हा गडी दिवसाचे आठ आठ तास राज्याच्या दुर्गम भागात स्कॉर्पियोमधून फिरायचा. मनरेगाअंतर्गत बनलेले कागदोपत्री रस्ते, शेततळी आणि बंधाऱयांमधील भ्रष्टाचार आणि रोझव्हॅलीसह कित्येक घोटाळय़ांचा सोशल मीडियावर सातत्याने भंडाफोड करत त्यांनी माणिक सरकारच्या तोंडचे पाणी पळवले. नेहमीप्रमाणे मग डाव्यांनी गेल्या १३ महिन्यांत भाजपच्या ११ कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करून ही वावटळ रोखण्याचा प्रयत्न केला. मारहाण, जाळपोळीचे असंख्य प्रकार करून पाहिले, परंतु देवधर आणि टीम खंबीरपणे उभी राहिली.
एकही आमदार नसलेला पक्ष निवडणुकीनंतर थेट सत्तेवर आणण्याचा चमत्कार यापूर्वी एन. टी. रामाराव यांच्या नावावर आहे. त्रिपुरामध्ये भाजप सत्तेवर आला तर तेथे या चमत्काराची पुनरावृत्ती होईल आणि महाराष्ट्रातून गेलेला सुनील देवधर हा मराठी ‘सुभेदार’ त्याचा शिल्पकार ठरेल!

No comments:

Post a Comment