Total Pageviews

Sunday, 18 February 2018

छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. जनतेला शिवरायांच्या रूपाने खऱ्या अर्थाने कल्याणकारी जाणता राजा लाभला. आजच्या शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने हा लेख…

साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले राज्य हे सर्वसामान्य लोकांचं होतं. शिवराय महाप्रतापी तर होते, पण ते उत्तम प्रशासकही होते. त्यांनी सर्व धर्मांना समान वागणूक दिली. छत्रपती शिवरायांचं धर्माविषयीचं सहिष्णू धोरण एका मुस्लिम इतिहासकाराने नोंदवून ठेवलेलं आहे. शिवाजी राजे स्वतः हिंदू होते आणि धर्मश्रद्ध होते, परंतु राजा म्हणून त्यांनी धर्मावरून कधीही प्रजेत भेद केला नाही. रयतेला त्यांचा धर्म, त्यांचे रीतरिवाज पाळण्याची मुभा त्यांनी दिली होती. खरं तर शिवरायांचा काळ लक्षात घेता त्यांचे हे धोरण आणि त्यांचे विचार अनन्यसाधारण असेच होते. प्रत्येक धर्माच्या उपासनापद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सगळ्यांचा उद्देश हा एकच असतो हे महत्त्वाचं तत्त्व शिवरायांनी मांडलं होतं.
त्या काळात शत्रूंच्या आक्रमणामुळे मोठ्य़ा प्रमाणावर रयतेच्या शेतीचं, धान्याचं नुकसान होत असे. त्यामुळे या आक्रमणांपासून शेतकऱ्यांचं आणि शेतीचं संरक्षण करणं हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रशासनाचं एक प्रमुख सूत्र होतं. अदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, दिल्लीची मोगलशाही, सिद्दी, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज अशा अनेक शत्रूंशी संघर्ष करत शिवाजी महाराज आपलं स्वराज्य उभारत होते. अशा परिस्थितीत शत्रूंच्या वारंवार स्वाऱ्या होत असत. अशा आक्रमणांमध्ये सर्वात जास्त संकट रयतेवर आणि पिकांवर कोसळत असे. उभ्या पिकांमध्ये घोडदळ सोडून पीक उद्ध्वस्त केलं जात असे. तसंच भरदिवसा गावंच्या गावं लुटली जात. लहान-थोरांना ठार केलं जात असे. बालक आणि महिलांवर अत्याचार केले जात. या प्रत्येक संकटामधून शिवरायांनी रयतेला नेहमीच बाहेर काढलं आणि या क्रूर शत्रूंपासून संरक्षण दिलं. रयतेला खरं कल्याणकारी नेतृत्व जाणता राजा शिवरायांच्या रूपाने मिळाले.
तीन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. जर शिवकालीन उपाय आजच्या दुष्काळावर अमलात आणले तर नक्कीच दुष्काळाची भीषणता कमी होईल. शिवकाळात अनेकवेळा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पण जलसंधारणाचं आणि पाण्याच्या वापराचं महत्त्व महाराजांनी ओळखलं होतं. शेतीचं दुष्काळामुळे होणारं नुकसान कसं टाळता येईल, यासंबंधी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. शेतीला उपलब्ध असलेलं पाणी आणि जमिनीची प्रतवारी करण्याचे प्रयत्न शिवरायांनी केले होते. गडकिल्ल्यांसाठी पाणीसाठे निर्माण करण्याचं आणि त्याचा वापर करण्याचं तंत्र त्यांना अवगत होतं.
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा शिवराज्याभिषेक सोहळा होय. ज्या काळात आमच्यातील काही जहागीरदार यवनांनी बहाल केलेली पोकळ बिरुदे मिरवीत होते, त्या काळात स्वतंत्र सार्वभौम हिंदवी तख्ताची कल्पना छत्रपती शिवरायांना सुचावी व ती त्यांनी अमलात आणून दाखवावी ही गोष्ट अचंबा वाटावी अशीच होती. दुर्गराज रायगडावर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करवून युगानुयुगे गर्व करावा अशी असाधारण गोष्ट घडवून आणली. ही खरंच असामान्य गोष्ट होती. या सोहळ्याचा निनाद साता समुद्रापार ऐकू गेला. या सोहळ्यात मोठा दानधर्म झाला. या समारंभापासून शिवशकसुरू करण्यात आले. राजांनी या सोहळ्यापासून तांब्याची शिवराईव सोन्याचा होनहे नाणे चलनात आणले. छत्रपती शिवरायांनी राज्यव्यवहार कोशया ग्रंथाची निर्मिती करवून घेतली व अष्टप्रधान मंडळ नेमले. रयतेला राजा मिळाला. हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज छत्रपती बनले व शककर्ते झाले.
छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात गडांचं, किल्ल्यांचं महत्त्व ओळखून महाराष्ट्रात अनेक गडकोटांची निर्मिती केली. जलदुर्ग बांधून स्वराज्याचं आरमार निर्माण केलं. पण आज शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांची दुर्दशा झाली आहे. खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या तिथेच टाकल्या जातात किंवा अयोग्य वर्तन केलं जातं. हे सारं चुकीचं आहे. शिवरायांच्या या ऐतिहासिक वास्तूंचा अपमान होणार नाही, या वास्तूंचं पावित्र्य राखलं जाईल याची काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. कारण आजच्या आपल्या पिढीने या गडकिल्ल्यांचं संवर्धन केलं नाही तर आपल्या पुढच्या पिढीला हा अमूल्य ठेवा पाहताही येणार नाही. शिवरायांचे हे गड-किल्ले पुढच्या अनेक पिढ्य़ांना पराक्रमाची, ध्येयाची प्रेरणा देतील


No comments:

Post a Comment