Total Pageviews

Sunday, 18 February 2018

धक्कातंत्राचा यशस्वी अवलंब करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचे गमक काटेकोर नियोजन, अचूक निवड, वेगवान हालचाली व स्वत: आघाडीवर राहणे हेच होते.

शाहिस्तेखानास शास्त केली!
शाहिस्तेखानाची स्वारी हे मराठी स्वराज्यावरचे संकट होते. त्याच शाहिस्तेखानाची बोटे छत्रपती शिवाजी महाराजांनी छाटली. त्या घटनेस आज साडेतीनशे वर्षे झाली.
शिवछत्रपतींनी अनेक अद्भुत भासणारे पराक्रम करून आदिलशहा, कुतुबशहा मोगलांस जेरीस आणून स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांच्या या पराक्रम गाथेतील एक सुवर्णपान म्हणजे बरोबर ३५० वर्षांपूर्वी ( एप्रिल १६६३ चैत्र शु. अष्टमी, मध्यरात्री बारानंतर) महाराजांनी शाहिस्तेखानावर घातलेला छापा! बलाढ्य अफझलखानाचा अत्यंत मुत्सद्देगिरीने वध करून महाराजांनी स्वराज्याच्या शत्रूंना आश्‍चर्यचकित केले. आदिलशाही हतबल झाली तर मोगलांवरही महाराजांनी जरब बसवण्यास सुरुवात केली. पातशहा औरंगजेब चिंताग्रस्त झाला, शिवाजी महाराजांना कसे आवरावे त्याला कळेना. ‘‘शिवाजी बळाविला. विजापूरच्या अफझलखानासारखी फौज, १२ हजार स्वार बुडविले. गडकोट पातशहाचे घेत चालिला, त्याची तरतूद काय करावी?’’ (सभासद बखर) औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान, जो औरंगजेबाची दुसरी प्रतिमा म्हणून कुप्रसिद्ध होता, त्यास एक लाख सैन्य घेऊन शिवाजी राजांच्यावर स्वारी करण्यास पाठवले. त्याचे सैन्य एवढे प्रचंड होते की, सैन्याच्या तळासाठी दोन गावे लांब दीड गाव रुंद (अंदाजे १६÷१२ मैल) एवढी जागा लागत असे. आग्र्याहून निघताना ‘‘शिवाजी म्हणजे काय? त्यासी जाताचे कैद करतो, गडकोट किल्ले घेऊन फते करतो’’ अशी फुशारकी शाहिस्तेखानाने मारली.
शाहिस्तेखान स्वत: शूर होता. त्याचे किताबासह संपूर्ण नाव होते अमीर उल उमराव नवाब बहाद्दर मिर्झा अबू तालीब ऊर्फ शाहिस्ताखान. शाहिस्तेखान स्वराज्यात घुसला ( मार्च १६६०). त्यावेळेस महाराज पन्हाळगडावरती सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकले होते. महाराजांनी अतिशय धाडसाने पन्हाळ्याच्या वेढ्यातून स्वत:ची सुटका करून घेतली (१२ जुलै १६६०). शाहिस्तेखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. प्रजा त्रस्त झाली होती. शाहिस्तेखानाने पुण्यामध्ये महाराजांच्या लाल महालातच मुक्काम ठोकला होता. शाहिस्तेखानाचा पुरता बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी हालचाल करणे आवश्यक होते. अखेरीस महाराजांनी मूले कुठार:या न्यायाने शाहिस्तेखानाने तळ ठोकलेल्या लाल महालावरच हल्ला करण्याची, कल्पनेच्याही पलीकडील अशी योजना आखली. शिवरायांनी त्यांचे बालपणीचे सवंगडी बाबाजी बापूजी चिमणाजी बापूजी देशकुळकर्णी यांच्यासह काही निवडक, जीवाला जीव देणार्‍या अत्यंत शूर साथीदारांसह लाल महालावर छापा घातला. महाराज, बाबाजी चिमणाजी यांना लाल महालाची खडान्खडा माहिती होती. त्यांनी भटारखान्यातून महालात सहज प्रवेश केला कापाकापीस सुरुवात केली. अंधाराचा फायदा घेऊन खान पळण्याच्या बेतात होता. परंतु महाराजांनी चपळाईने त्याच्यावर घाव घातला. महाराजांना वाटले खान मेला, परंतु त्याच्या हाताची तीन बोटेच तुटली, उजवा हात थोटा झाला. सर्वत्र हाहाकार उडाला. सगळीकडे मृतदेह पडले होते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खानाचे संरक्षक सैन्य गोंधळले होते. त्याचा फायदा घेऊन महाराजांच्या सवंगड्यांनी लाल महालाची दिंडी उघडली गनीम आया! गनीम आया! असा आरडाओरडा करीत सर्वजण सुखरूप पसार झाले. शाहिस्तेखान एवढा धास्तावला होता की तो हकिमास बोलावण्यासही तयार नव्हता. शाहिस्तेखान लगेच ( एप्रिल १६६३) पुण्याहून औरंगाबादेस गेला. हे वृत्त समजताच महाराज उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘शास्ताखानास शास्त केली. पातशहाने नाव ठेविले परंतु ते आपण शास्त करून रुजू केले.
शाहिस्तेखानावरील यशस्वी झडपेआधी सतत तीन वर्षे महाराजांनी अनेक संकटांना तोंड देत त्यांच्यावर विजिगीषु वृत्तीने मात केली. अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी महाराज राजगडावरून ११ जुलै १६५९ रोजी प्रतापगडाकडे जाण्यास निघाले आणि महाराजांच्या आयुष्यातील, स्वराज्याच्या उभारणीतील एका महत्त्वपूर्ण अवघड कालखंडास सुरुवात झाली. अफझलखान वधानंतर महाराजांनी त्यांच्या सहकार्‍यांनी अथक मेहनत करून स्वराज्य वाढवले. याच दरम्यान त्यांनी विलक्षण धाडसाने सिद्दी जौहरच्या वेढ्यातून आपली सुटका करून घेतली होती.
मानवी स्वभावाचा अतिसूक्ष्म अभ्यास महाराजांनी केला होता. अहंकारी, आत्ममग्न माणसे खोट्या स्तुतीला भाळतात, मोहात पडतात याचा उपयोग करून अफझलखानास त्यांनी आपल्याला सोयिस्कर अशा रणक्षेत्रात खेचून आणले. तहाचा आभास निर्माण करून सिद्दी जौहर त्याच्या सैन्याला गाफील बनवून ते पन्हाळ्यावरून निसटले. शाहिस्तेखानाला स्वराज्यातून हुसकावण्यासाठी आक्रमण हेच संरक्षणाचे उत्तम साधन असते अनपेक्षित धक्क्यांतून सावरताना बेसावध माणसाला वेळ लागतो (धक्का तंत्र) याचा यशस्वी वापर त्यांनी केला. काटेकोर नियोजन, वेळेची अचूक निवड, वेगवान हालचाली स्वत: आघाडीवर राहून योजना कार्यान्वित करणे हे त्यांच्या देदीप्यमान यशाचे सूत्र होते. बलाढ्य शत्रूंचा पराभव त्यांनी युक्तीच्या बुद्धीच्या बळावर आपल्या मर्यादित सामर्थ्याचा कौशल्याने उपयोग करून केला.
उत्तम पुरुषाची लक्षणे सांगताना समर्थ म्हणतात,
धीर उदार आणि सुंदर। शूर क्रियेसी तत्पर।
सावधपणे नृपवर। तुच्छ केले॥
महायत्न सावधपणे। समई धारिष्ट धरणे।
अद्भुतची कार्य करणे। देणे ईश्‍वराचे॥
उत्तम पुरुषाचे हे नवीन शिवछत्रपतींना तंतोतंत लागू पडते।

No comments:

Post a Comment