Total Pageviews

Monday, 12 February 2018

चोख प्रत्युत्तर केव्हा? प्रभात वृत्तसेवा


 -
·          

पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या जैश-ए-महंमदया दहशतवादी संघटनेने शनिवारी लष्करी तळावर हल्ला केला. त्यात 2 जवांनाचा बळी गेला. गेल्या काही दिवसातील ही कितवी घटना आहे, हे काही मोजायची गरज नाही. कारण आता पाकिस्तानकडून दररोजच सीमेवर शस्त्रसंधीचा भंग केला जात आहे आणि दुसरीकडे काश्‍मीरातल्या दहशतवादी संघटनाही हल्ले करीत आहेत. गेल्या आठवड्यात राजौरी जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने केलेल्या तोफांच्या माऱ्यांत भारतीय लष्करातील कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या या आगळिकीला सडेतोड आणि चोख प्रत्युत्तर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत भारतीय लष्कराने दिले होते. पाकिस्तानला यापुढे प्रत्युत्तर दिलेच जाणार आहे. आमच्या कृतीमधूनच त्याची प्रचिती येईल’, असे लष्करातर्फे सांगण्यात आले होते.
सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंधन चालू असताना देशातही काही व्यक्ती आणि शक्ती वादग्रस्त विधाने आणि कारवाया करीत आहेत. काश्‍मीर विधानसभेत नॅशनल कॉन्फरन्सच्या एका आमदाराचे पाकिस्तान झिंदाबाद असे म्हणण्याचे धाडस होते. त्यामागेही एखादा कट असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वीच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांनी सीमेवर गोळीबार दोन्ही बाजूने होतो, असे विधान करुन एक प्रकारे पाकिस्तानची पाठराखण केली होती.
सीमेवर भारताशी अप्रत्यक्ष युध्द छेडतानाच दुसरीकडे इतर मार्गानीही भारताला अडचणीत आणण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून केले जात आहे. भारतातील सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांना हॅनी ट्रॅपमध्ये अडकवून गोपनीय माहिती मिळवण्याचे कारस्थान पाकिस्तानकडून रचण्यात आले.हवाई दलातील गोपनीय माहिती पाकची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला देणाऱ्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली, हे त्याचे ताजे उदाहरण आहे.
आता पाकिस्तानने पुन्हा एकदा कुलभूषण जाधव यांच्यावर दहशतवाद पसरवल्याचे आणि तोडफोड केल्याचे आरोप नव्याने केले आहेत. तोडफोड आणि दहशतवाद प्रकरणी लवकरच कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. हेरगिरीच्या आरोपावरुन जाधव यांना आधीच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असताना आता हे नवीन प्रकरण समोर आणले जात आहे. चोराच्या उलट्या बोंबाही म्हण खरी ठरवणारी ही परिस्थिती मानावी लागेल.
एवढेच नाही, तर चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेवरील आस्थापनांवर भारत हल्ले करण्याची भीतीही पाकिस्तानने बोलून दाखवली आहे. पाकिस्तान सरकारने गिलगिट बाल्टिस्तानच्या गृह खात्याला याबाबत पाठवलेल्या पत्रात म्हटल्यानुसार, भारताने 400 मुस्लिम युवकांना प्रशिक्षणासाठी अफगाणिस्तानात पाठवले असून, त्यानंतर पाकिस्तान-चीन आर्थिक मार्गिकेवर हल्ला केला जाणार आहे. काराकोरम महामार्गासह काही मोक्‍याच्या ठिकाणी भारत हे हल्ले करणार असल्याचे, या पत्रात म्हटले आहे. भारत असे कोणतेही कृत्य करणार नाही, याची माहिती पाकिस्तानला असूनही, केवळ स्वत:ची काळी कृत्ये झाकण्यासाठीच हे प्रयत्न केले जात आहेत, हे उघड आहे. सीमेवर सतत गोळीबार करुन शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या आणि दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला आपले पितळ उघडे पडण्याची भीती वाटत असल्यानेच, दुसऱ्या बाजुला हा लबाडपणा केला जात आहे.
एवढेच नाही, तर भारतातील विद्यमान सरकार काश्‍मीरची समस्या सोडवण्यासाठी उत्सुक नाही, हे दाखवण्याची संधीही पाकिस्तान सोडत नाही, ही बाबही समोर आली आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि पाकिस्तानच्या त्यावेळच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो या दोघांनी शांततापूर्ण मार्गाने काश्‍मीर प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राजीव गांधी यांची हत्या झाल्याने हा तोडगा निघू शकला नाही’, असा दावा पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी करणे, हा त्या धोरणाचाच भाग आहे. दोन्ही देशांनी काश्‍मीर प्रश्न मैत्रीपूर्ण मार्गाने सोडवण्याचे मान्य केले होते. पण आता ते शक्‍य दिसत नाही, असे सुचवून पाकिस्तानतर्फे अप्रत्यक्षपणे घुसखोरी आणि दहशतवादाला प्रोत्साहनच दिले जात आहे.

सीमेपलिकडे हे सारे चालू असताना देशातही काही व्यक्ती आणि शक्ती वादग्रस्त विधाने आणि कारवाया करीत आहेत. काश्‍मीर विधानसभेत नॅशनल कॉन्फरन्सच्या एका आमदाराचे पाकिस्तान झिंदाबाद असे म्हणण्याचे धाडस होते. त्यामागेही एखादा कट असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वीच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांनी सीमेवर गोळीबार दोनही बाजूने होतो, असे विधान करुन एक प्रकारे पाकिस्तानची पाठराखण केली होती. ही सर्व परिस्थिती पहाता आता डोक्‍यावरुन पाणी जाण्याची वेळ आली आहे, असेच म्हणावे लागते. म्हणूनच आता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे.

No comments:

Post a Comment