Total Pageviews

Saturday 10 February 2018

पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा?फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे (निवृत्त)



किस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे हे आता जगजाहीर झालेले आहे. येणार्‍या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याला सहभागी व्हायचे आहे. हाफिज हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे आणि मुंबईवरील 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने त्याला पकडण्यासाठी 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केलेले आहे. हाफिज सईद याच्याविरोधात अनेक पुरावे भारताकडेही आहेत आणि युट्युुबसारख्या इंटरनेट माध्यमावर त्याची भडकाऊ भाषणेही आहेत. असे असूनही या दहशतवाद्याला अमेरिकेच्या मताविरोधात जाऊन पाकिस्तानने नजरकैदेतून मुक्त केले. त्यानंतर त्याने राजकीय पक्षही स्थापन केला. पाकिस्तानचे हे वागणे एखाद्या नाठाळ मुलासारखे आहे. आजवर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे बंद करा, त्यांना आर्थिक मदत देणे बंद करा, त्यांना शस्त्रास्त्रे पुरवणे बंद करा, अशा सूचना अनेकदा केल्या आहेत. तरीही पाकिस्तान न जुमानता वागत आहे. याचे कारण पाकिस्तानमधील सरकार लोकनियुक्त असले, तरी तेथे खर्‍या अर्थाने राज्य करते ते लष्कर आणि आयएसआय. 
मुळातच, आताचे पाकिस्तानमधील सरकार हे लोकप्रिय नाहीये. या सरकारमधील परराष्ट्रमंत्री हाफिज सईदच्या विरोधात बोलतात. टीव्ही चॅनेलवर पाकिस्तानचे निवृत्त लष्करी अधिकारी पाकिस्तान सरकारविरोधी बोलतात, धोरणांना विरोध करतात. आपण दहशतवाद्यांना पाठिंबा देणे बंद केले नाही, तर देशाचा विकास होणार नाही, असे सांगतात; पण प्रत्यक्षात स्थिती उलटी दिसते. त्यामुळे आजघडीला पाकिस्तानमधील राजकीय परिस्थिती वाईट आहे. पाकिस्तानचे लष्कर कधीही तेथील सरकार उलथवून टाकू शकते.  अलीकडील काळात पाकिस्तानकडून होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन, दहशतवाद्यांची घुसखोरी, सीमेवरील हल्ले हे सर्व तेथील सरकारच्या संमतीने होत आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, पाकिस्तानचे लष्कर कोणालाही जुमानत नाही. पाकिस्तानात लष्करप्रमुख सुप्रीमो आहेत. त्यांच्या आदेशाने, पाठिंब्यानेच या सर्व कारवाया चालतात.  त्यामुळे पाकिस्तान सरकार या सर्व घटनांचा इन्कार करते आहे.
पाकिस्तानमधील वझिरीस्तान या भागामध्ये दहशतवाद्यांनी भूसुरुंग पेरले आहेत. पाकिस्तानी लष्कराने ते काढून टाकणे अपेक्षित आहे; मात्र लष्कर त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे तिथे भूसुरुंगावर पाय पडून अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. वझिरीस्तानमधील सरकारने हे भूसुरुंग काढण्याची मागणी केली आहे; मात्र पाकिस्तानचे लष्कर तेथील नागरिकांची सुरक्षा करण्याऐवजी त्यांच्या जीवाशी खेळत आहे. याचे कारण पाकिस्तान आर्मीचे एक लक्ष्य आहे, ते म्हणजे भारताचा पराभव करणे आणि काश्मीर बळकावणे.
शस्त्रसंधीचे उल्लंघन
अलीकडील काळात पाकिस्तानकडून होणार्‍या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे भारतीय जवान आणि निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. भारतीय सैन्य या हल्ल्यांना जशास तसे उत्तर देत आहे; मात्र हे हल्ले थांबलेले नाहीत. अलीकडेच पाकिस्तानी सैन्याकडून अँटी टाईम गायडेड मिसाईलचा (एटीजीएम) वापर करण्यात आला. वास्तविक, एटीजीएमचा वापर शत्रूचे बंकर्स उद्ध्वस्त करण्यासाठी केला जातो. जे लक्ष्य ठरवले आहे, तिथे एटीजीएम अचूक मारा करते. पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर डागलेल्या एटीजीएममुळे आपले चार जवान शहीद झाले आहेत. 
 एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन तेव्हाच करतो, जेव्हा त्यांना दहशतवाद्यांना सीमापार भारतात घुसवायचे असते. त्यांना संरक्षण देण्यासाठी कव्हर फायरिंग केले जाते. या माध्यमातून भारतीय सैन्याचे लक्ष शस्त्रसंधीच्या उल्लंघनाकडे वळवायचे आणि दहशतवादी भारतात पाठवायचे, अशी ही नीती असते. 
उपाययोजनांची दिशा
आपण संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याबाबत इतर राष्ट्रांना आवाहन करतो आहोत; मात्र आपल्याच संसदेमध्ये पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र आहे, असा ठराव का पारित केला जात नाही? पाकिस्तानशी असणारे आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक आणि अन्य सर्व संबंध का तोडून टाकले जात नाहीत? आपण हे पाऊल उचलल्यास बाकीचे देशही त्याचे अनुकरण करतील आणि तेव्हा संयुक्त राष्ट्र संघालाही ही गोष्ट गंभीर असल्याची जाणीव होऊन पाकिस्तानवर कारवाईची दाट शक्यता निर्माण होईल. आज अमेरिका, इस्राईल, सार्कमधील देश, आसियान देश,  रशिया या सर्वांशी भारताचे संबंध सुधारत आहेत. हे देश आपल्यासोबत आहेत. अशा वेळी पाकिस्तानविरुद्ध प्रथम आपल्याला काही ठोस पावले उचलावी लागतील. पाकिस्तानची सद्यःस्थिती पाहता, इतर देशांनी त्यांची मदत रोखल्यास पाकिस्तानची खूप मोठी कोंडी होईल. 
तिसरी गोष्ट म्हणजे, पाकिस्तानच्या लष्कराला धडा शिकवण्याची आज नितांत गरज आहे. यासाठी सीमाभागात पाकिस्तानच्या ज्या चौक्या आहेत, त्यावर थेट हल्ले केले पाहिजेत. जेणेकरून भारत हा हिंमतवान देश आहे आणि भारतालाही चोख प्रत्युत्तर देता येते, याची जाणीव पाकिस्तानला होईल.  
पाकिस्तानविरोधात आक्रमक धोरण स्वीकारताना आपल्याला  अनेक देशांचा पाठिंबा लागणार आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या विविध कारवाया आपण जगासमोर आणल्या पाहिजेत. अफगाणिस्तानच्या सीमेवरील हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानातच प्रशिक्षण दिले जाते   आणि हक्कानी नेटवर्क हे आज लेबनान आणि अन्य देशांतही दहशतवादी कारवायांत गुंतले आहे. या बाबी भारताने जगापुढे मांडल्या पाहिजेत.  त्याआधारे इतर देशांचा विश्‍वास मिळवून त्यांना पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यास भाग पाडून पाकिस्तानविरोधात निर्बंध जारी केले पाहिजेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन डावपेचात्मक खेळी आणि लष्करी कारवाई अशा दोन्ही पातळ्यांवर भारताला कारवाई करावी लागेल. तसे झाल्यास निष्कर्ष उत्तम असतील, हे नक्की

No comments:

Post a Comment