आज सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा स्मृतिदिन. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सरसेनापती. ‘सात दौडती, सात दौडती। अधीर वेडे सात दौडती। मरणावरती कराया स्वारी। सात दौडती, सात दौडती।’ या गीतात ज्यांची कहाणी सांगितली आहे, असे हे प्रतापराव. उमराणी येथे बहलोलखानचा पराभव करून त्यांनी त्याला जीवदान दिले. महाराजांनी ‘सला काय म्हणोन केला?’ असा प्रश्न करीत ‘बहलोलखानास मारल्याशिवाय रायगडी तोंड दाखवू नये’ असा खलिता पाठविला. बहलोलखान निपाणीकडून स्वराज्यावर चाल करून आला. गडहिंग्लजजवळ नेसरी येथे आल्याची खबर लागताच चिडलेले प्रतावराव आपल्या सहा सहाका-यांनिशी त्याच्यावर तुटून पडले. मागून कुमक येण्यापूर्वीच पंधरा हजार विरुद्ध सात अशी इतिहासातील पहिलीच लढाई सुरू झाली. परिणामी ‘कोसळल्या उल्का जळत सात दरियात.. खग सात जळाले अभिमान वणव्यात!’ आपल्या सहा सहका-यांनिशी दि. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी महाशिवरात्रीस प्रतापराव मारले गेले. कविवर्य कुसुमाग्रजांनी या प्रसंगावर लिहिलंय, ‘वेडात मराठे वीर दौडले सात.. अद्याप विराणी कुणी वा-यावर गात.. वेडात मराठे वीर दौडले सात.’ आज त्या सरसेनापती प्रतापराव गुजरांचा स्मृतिदिन.
No comments:
Post a Comment