Total Pageviews

1,114,476

Tuesday, 13 February 2018

बँकेची नोकरी सोडून शहीद-पत्नी सैन्यात दाखल

डेहराडून येथील शिशिर मल्ल यांना देशासाठी लढताना वीरमरण आलं. पण त्यांच्या पत्नीने धीर सोडला नाही. उलट या दु:खातून बाहेर येत लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. संगीता मल्ल या आता सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू होणार आहेत. विशेष म्हणजे बँक आणि सैन्य अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या संगीताने सैन्यात जाण्याचा पर्याय निवडला. 

संगीताचे वडीलदेखील सैन्यात होते. सासरे सुरेश मल्ल देखील ऑनररी कॅप्टन होते तर पती शिशिर मल्ल रायफलमॅन होते. २०१५ मध्ये २१ मार्चला संगीताचे सासरे सुरेश मल्ल यांचं निधन झालं. त्यानंतर ६ महिन्यांतच २ सप्टेंबरला जम्मू-काश्मीरमध्ये बारामुल्ला क्षेत्रात 'ऑपरेशन रक्षक' सुरू असताना शिशिर शहीद झाले. शिशिरची या ऑपरेशनदरम्यानची कामगिरी पाहून सरकारने त्यांना मरणोत्तर सेवा पदकही दिलं आहे. बापलेकांच्या मृत्यूने मल्ल परिवार दु:खात बुडाला होता. 

सासूला सावरण्यासाठी संगीता आधी या दु:खातून बाहेर पडल्या. पोस्टग्रॅज्युएट असणाऱ्या संगीता यांना त्यांच्या वडिलांनी सैन्यात दाखल होण्यासाठी प्रोत्साहित केले. सासूनेही त्यांना पाठिंबा दिला. शिक्षिकेच्या कामाचा अनुभव असणाऱ्या संगीता यांनी बँक आणि सैन्य दोहोंसाठी परीक्षा दिली आणि दोन्ही परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. देशातल्या एका मोठ्या बँकेच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नईसाठी त्यांची निवड झाली होती, पण संगीता यांनी लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

No comments:

Post a Comment