Total Pageviews

Thursday, 1 February 2018

भारताची सौरझेप- महा एमटीबी-MUST READ


गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत उद्घाटनपर भाषण केले. या भाषणात पंतप्रधानांनी अन्य अनेक विषयांबरोबरच भारताच्या सौरऊर्जा निर्मिती व वापराच्या योजनांबद्दल जागतिक समुदायाला माहिती दिली, तर आजच हरितऊर्जा बाजाराचे निरीक्षण करणार्‍या मर्कोमकॅपिटलने आपल्या संशोधन अहवालातून भारताने यंदा २० हजार मेगावॅट सौरऊर्जा वापराचा पल्ला गाठल्याची आकडेवारी जाहीर केली. भारताने गाठलेला हा टप्पा फार मोठा असून २००९ मधील सहा हजार गिगावॅट क्षमतेपासून नऊ वर्षांत मोठी झेप घेतल्याचे दिसते. २०२२ सालापर्यंत भारताने राष्ट्रीय सौर मिशन अंतर्गत १ लाख मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने भारताची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचेच या आकडेवारीतून स्पष्ट होते.

कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचे इंजिन म्हणजे ऊर्जा. घरगुती वापरापासून ते शेती, औद्योगिक प्रगतीसाठी ऊर्जा आवश्यकच असते. अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाने आणि जीडीपी वाढीने भारत आगामी काळात महासत्ता होईल, असा आशावाद निरनिराळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत असतात. पण, यासाठी ऊर्जेची उपलब्धता अत्यावश्यक असून त्यात सौरऊर्जा महत्त्वाची भूमिका निभावू शकेल. सौरऊर्जा ही सूर्यापासून थेट मिळवता येणारी ऊर्जा तर आहेच, पण तो भविष्यातील अक्षय्य ऊर्जेचा स्त्रोत सिद्ध होणार आहे. सौरऊर्जेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, वर्षातले पावसाळी दिवस वगळता इतरवेळी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारा प्रखर सूर्यप्रकाश. तेव्हा असा हा ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत असलेलल्या सौरऊर्जेमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. सौरऊर्जा हा अक्षुण्ण ऊर्जेचा प्रकार आहे. सौरऊर्जेचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येऊ शकतो. जसे की, उष्णतेसाठी, वाळवण्यासाठी, खाद्यपदार्थ शिजवण्यासाठी आणि विजेच्या रुपात. सौरऊर्जेचा उपयोग कार, विमाने, जहाजे, उपग्रह, कॅलक्युलेटर, पथदिवे आणि अन्य उपकरणांतही अगदी सहज करता येतो. सौरऊर्जेची उपकरणे कोणत्याही ठिकाणी लावता येतात. अगदी घरांत, छतांवरदेखील सौरऊर्जेचा वापर करता येईल. या वैशिष्ट्यांमुळे सौरऊर्जा अधिकाधिक कशी वापरता येईल याचा विचार करण्यास सर्वांनीच सुरुवात केली आहे.

भारताचा विचार करता, संपूर्ण देशाच्या भूभागावर सुमारे पाच हजार ट्रिलियन किलोवॅट तास प्रति वर्ग मीटर सौरऊर्जा मिळवता येऊ शकते; जी जगाच्या एकूण वापरापैकी कित्येक पटींनी अधिक आहे. स्वच्छ ऊन असलेल्या काळात दर दिवसाला ४ ते ७ किलोवॅट तास प्रतिवर्ग मीटरपर्यंत सौरऊर्जा मिळते. देशात जवळपास २५० ते ३०० दिवस असे असतात, ज्यावेळी सूर्याचा प्रकाश संपूर्ण दिवसभर उपलब्ध असतो. त्यामुळे भारतात सौरऊर्जा निर्मितीसाठी उत्कृष्ट स्थिती असल्याचे कळते. भारतातील राजस्थान, गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सर्वाधिक सौरऊर्जा निर्मितीची क्षमता आहे. केंद्र सरकारने भारताच्या याच क्षमतेचा वापर करत पुनर्वापरायोग्य ऊर्जा संसाधनांत सौरऊर्जा निर्मितीवर जास्त भर दिला आहे. भारतात आतापर्यंत ४ लाख ४२ हजार ९३६ सौर पथदिवे लावण्यात आले आहेत, तर १३ लाख ९६ हजार ३६ घरगुती सौरऊर्जेवरील दिवे देशभरात लावले गेले आहेत. हे प्रमाण नक्कीच उत्साहवर्धक आहे.

सौरऊर्जा वापराचे जागतिक प्रमाण पाहता, जर्मनी प्रथम क्रमांकावर आहे, तर भारत सहाव्या स्थानी आहे. या यादीत आणखी पुढे जाण्याची क्षमता भौगोलिक आणि वातावरणीय वैशिष्ट्यांमुळे भारतात अधिक आहे. आज जगातील विविध कंपन्या भारताकडे सौरऊर्जा क्षेत्रातील एक प्रमुख भागीदार म्हणून पाहत आहेत. कारण, भारताची लोकसंख्या ही जगातील क्रमांक दोनची असून ऊर्जेची गरजही प्रचंड आहे. आजही भारतातील कित्येक ठिकाणी वीज पूर्णपणे पोहोचलेली नाही. तेव्हा, ऊर्जेची ही तूट सूर्यप्रकाशातून पूर्ण करता येऊ शकेल. त्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरण, संचांची निर्मिती, विक्री भारतात करता येईल. त्यातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होईल.

भारताच्या शेतीक्षेत्राला नेहमीच विजेची गरज भासते आणि ती व्यवस्थित, नियमित भागवली जात नाही, अशी तक्रारही नेहमीच समोर येते. शेतीला पाणी देण्यासाठी, मोटारच्या उपयोगासाठी विजेची सारखी गरज असते. ती सौरऊर्जेवरील मोटारींच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकते. याचसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सौरपंप योजनाही राबवली. आता मोकळी जमीन, माळरान, पडीक जमीन या क्षेत्रावर सौरऊर्जा निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठीही काही उपाययोजना करता येतील. या ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती संच तर लावता येतीलच, पण यासाठी अंतर्गोल आरसे, एअर टर्बाईन हे नवीन प्रकारही वापरता येतील. सौरऊर्जेबाबत घेतला जाणारा आक्षेप म्हणजे तिच्या निर्मितीसाठी, उपकरणांसाठी अधिक खर्च येतो आणि मिळणारी वीज मात्र कमी असते. पण, अंतर्गोल आरसे, एअर टर्बाईनच्या वापराने सौरऊर्जानिर्मितीच्या खर्चात बचत करता येईल, असे या क्षेत्रातील अभ्यासक सांगतात.

सौरऊर्जेसाठी भारताने जागतिक पातळीवर इंटरनॅशनल सोलार अलायन्सच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या अलायन्सच्या स्थापनेमध्ये सिंहाचा वाटा होता. २०१६ साली स्थापन करण्यात आलेल्या या अलायन्सचे आतापर्यंत १२१ देश सदस्य झाले आहेत. या अलायन्सने जागतिक बँकेला सौरऊर्जेच्या निर्मिती आणि वापराच्या दृष्टीने अर्थपुरवठा करण्याची मागणी केली आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे सौरऊर्जेची व्यापकता आणि वापर वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी २०३० सालापर्यंत १००० बिलियन अमेरिकन डॉलरच्या एकूण गुंतवणुकीपैकी अधिकाधिक रक्कम उभी करण्यात जागतिक बँक महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. हे भारताच्या आणि जगाच्या दृष्टीने आश्वासक पाऊल म्हणायला हवे.


No comments:

Post a Comment