१८ जानेवारी २०१८ रोजीचा ‘साैदी अरबमध्ये आधुनिकतेचे वारे’ हा लेख शेवटचा ठरला. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच ढासळत गेली आणि महाशिवरात्रीच्या सायंकाळी त्यांनी या एेहिक जगाचा निरोप घेतला. ट्रिपल तलाक, संविधानातील चित्रांतून व्यक्त झालाय हिंदुत्वाचा आत्मा, जग हिंदू होऊ लागले आहे काय? असे अनेक लेख ‘दिव्य मराठी’च्या वाचकांच्या स्मरणात आजही असतील. सुमारे साडेपाच दशके सरस्वतीची मनोभावे आराधना करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार मुजफ्फर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ज्येष्ठ पत्रकार, पद्मश्री, प्रभावी वक्ता, परखड विचारवंत, जगातील प्रमुख धर्मांचे साक्षेपी अभ्यासक, मध्य पूर्वेतील घडामोडींचे विश्लेषक, लेखक, प्रवाहाविरुद्ध निग्रहाने वाटचाल करणारा निर्भय, अभ्यासू आणि योद्धा पत्रकार ही सारी विशेषणे सार्थ करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मुजफ्फर हुसेन. परंतु या सर्व विशेषणांहून अधिक यथार्थ वर्णन ‘हिंदुत्वाचा मुस्लिम भाष्यकार’ या शब्दावलीने करणे योग्य होईल. २००४ ते २०१८ अशी १४ वर्षे त्यांच्या “मुस्लिम जगत’ या लोकप्रिय साप्ताहिक स्तंभाचा अनुवाद करण्याची संधी मला आधी तरुण भारत आणि नंतर दिव्य मराठीमुळे मिळाली. त्यांच्याशी एक स्नेहबंध जुळला. गेल्या सहा महिन्यांत ते खूपच हळवे झाले होते. अनेकदा फोनवरून अर्धा - अर्धा तास संवाद करायचे. या काळात त्यांच्या जीवनाचे आणि चिंतनाचे अनेक पैलू समजून घेता आले.
१९४० च्या सुमारास जन्मलेले मुजफ्फर हुसेन हे मागील ६ दशकांपासून पत्रकारितेत सक्रिय होते. वयाच्या १५ व्या वर्षांपासूनच त्यांनी वृत्तपत्रीय लेखनाला सुरुवात केली. त्या काळी मध्य प्रदेशातील नीमच येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक संकेत आणि इंदूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक लेखाजोखामधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असे. रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि पाचवे सरसंघचालक के. पी. सुदर्शन यांच्यावर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती. अर्थातच यामागे एक रंजक कारण होते. हुसेन हे साधारण १५ वर्षांचे असतील तेव्हाची ही घटना. नीमच येथे गोळवलकर गुरुजी यांचे बौद्धिक होणार होते. हुसेन यांचे शिक्षक गौड हे संघाचे कट्टर विरोधक होते. त्यांनी गुरुजींच्या विरोधात पत्रिकांचे वाटप करण्याची योजना केली होती. या पत्रिका गुरुजींच्या सभेत वाटायच्या होत्या. पत्रिका सभेत जागोजागी जमिनीवर ठेवून तेथून निसटायचे असा बेत होता. ज्या मुलांवर ही जबाबदारी होती त्यात छोटा मुजफ्फरही होता. पण हे करताना कोणीतरी त्याला पकडले. एक थप्पड लगावली आणि धरून ठेवले. सभा संपल्यावर गुरुजींसमोर त्याला उभे केले. गुरुजींनी मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याच्याकडून रसखानच्या कविता ऐकल्या आणि पाठ थोपटून सोडून दिले. ही घटना हुसेन यांच्या शेवटपर्यंत स्मरणात राहिली.
“आपल्या लेखन, वाणी आणि कृती यातून आपल्या देशाचे कधीही नुकसान होणार नाही, आपल्यासाठी राष्ट्र अग्रस्थानी’ हा के. पी. सुदर्शन यांनी सांगितलेला विचार तरुण मुजफ्फरसाठी जीवनाचा मंत्र बनला. राष्ट्र प्रथम हेच त्यांच्या पत्रकारितेचे ब्रीद बनले. तरुण भारत आणि सामना या वृत्तपत्रांतून ‘मुस्लिम जगत’ या नावाने ते स्तंभलेखन करत. एक मुस्लिम लेखक जिहादी मानसिकतेवर प्रहार करतो आणि हिंदुत्वाची अभ्यासपूर्ण बाजू मांडतो यावर अनेकांचा विश्वास बसत नसे. कुणीतरी हिंदू लेखक नाव बदलून लिहीत असावा असेही काहींना वाटे. हुसेन हे देशभर व्याख्यानांसाठी फिरू लागले तेव्हा कुठे अनेकांचा भ्रम दूर झाला.
मुस्लिम समाजात राहून सुधारणावादी आणि परखड भूमिका मांडणे इतके सोपे नाही याची त्यांना जाणीव होती. समाजातील कडव्या मंडळींचा त्यांना व त्यांच्या कुटुंबाला त्रासही सहन करावा लागला. परंतु त्यांनी आपले लेखन कधीच थांबवले नाही. मुस्लिम समाजाची परखड मीमांसा करत राहिले, पण त्यांनी कधीही आततायी लेखन केले नाही. इस्लाम, कुराण आणि मोहंमद पैगंबर यांच्यावर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती. कुराण आणि पैगंबर यांच्यावर अविचल श्रद्धा ठेवूनही इस्लाममधील कालबाह्य प्रथा, जिहादी मानसिकता दूर करण्याचे कार्य करता येऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले. हिंदुत्व ही संकल्पना मुसलमानविरोधी नाही याची त्यांनी वेळोवेळी साधार मांडणी केली. ज्या काळात हिंदुत्व, हिंदू हे शब्द हिंदूंनी उच्चारणेही जातीयवादी ठरवले जात होते त्या काळात निर्भयपणे हिंदुत्व संकल्पना सातत्याने मांडत राहणे आज वाटते तितके सोपे नव्हते. ते काम मुजफ्फर हुसेन यांनी नेटाने केले. प्रसिद्धी माध्यमातील मुख्य प्रवाहाकडून त्यांची उपेक्षा होत राहिली. पण त्यांनी त्याची कधी फिकीर केली नाही. ‘आपल्या आवडीची पूजापद्धती स्वीकारावी आणि तरीही त्याच्याकडे कोणी बोट दाखवू नये असे केवळ भारतातच पाहायला मिळते. त्याच्यासाठी गीता, रामायण, वेद आणि पुराण सारी धार्मिक पुस्तके पवित्र आहेत. तो आवडेल त्या देवतेची आराधना करू शकतो. परंतु अन्य धर्मांमध्ये अशी सूट नाही. म्हणूनच भारतात जे हिंदूदर्शन आहे ते धर्माचे नव्हे, तर संस्कृतीचे प्रतीक आहे. यालाच हिंदुत्व हे नाव आहे’ अशा सोप्या शब्दांत त्यांनी हिंदुत्व मांडले. मुस्लिमांसाठी औरंगजेब, अफजलखान, बाबर, खिलजी हे धर्मांध आक्रांता आदर्श असू शकत नाहीत. दारा शुकोह, रसखान, अब्दुल हमीद, डाॅ. एपीजे कलाम हे भारतीय मुस्लिमांचे आदर्श आहेत हे आपल्या खास शैलीतून मांडत राहिले. सेक्युलॅरिझमच्या नावाखाली जिहादी मुस्लिमांना प्रतिष्ठित करण्याचे राजकारण स्वातंत्र्यानंतरही सुरूच राहिले. या लांगूलचालनामुळे देशाची फाळणी झाल्याचे दाखवून देत त्यांनी याला कडाडून विरोध केला. माझा धर्म सत्य आहे, त्याप्रमाणे इतरांचेही धर्म सत्य आहेत, असा विचार केवळ हिंदू धर्मातच आहे. हेच हिंदुत्व आहे. इतर धर्मीयांनी म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चनांनीही इतर धर्मांचे अस्तित्व स्वीकारले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. म्हणूनच त्यांचा धर्मांतराला कडाडून विरोध हाेता. मुजफ्फर हुसेन यांची पत्रकारिता ही एक चळवळ होती. सामाजिक बदल घडवून आणणारी पत्रकारिता त्यांनी केली. महाशिवरात्रीच्या सायंकाळी त्यांची लेखणी कायमची अबाेल झाली. त्यांना भावपूर्ण शब्दांजली.
-
No comments:
Post a Comment