Total Pageviews

Saturday, 10 February 2018

मराठा लाइट इन्फंट्रीच्या गौरवशाली इतिहासाला ४ फेब्रुवारी २०१८ला २५० वर्षे पूर्ण झाली

मराठा लाइट इन्फंट्रीच्या गौरवशाली इतिहासाला ४ फेब्रुवारी २०१८ला २५० वर्षे पूर्ण झाली. लष्करामध्ये मराठा लाइट इन्फंट्रीला वेगळाच सन्मान आहे. तो मराठ्य़ांनी आपल्या परंपरागत अतुलनीय शौर्य, कडक शिस्त आणि कार्यकुशलता आणि व्यावसायिकतेच्या जोरावर मिळवला आणि टिकवलाही आहे. मराठा लाइट इन्फंट्री आज देशाच्या सर्व सीमा सांभाळण्यात आघाडीवर आहे आणि यापुढेही राहील.
हिंदुस्थानी लष्करात मराठा लाइट इन्फंट्रीचे एक वेगळे स्थान आहे. या बटालियनने स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत आपल्या शौर्यशाली आणि देदीप्यमान कामगिरीने इतिहास घडवला आहे. मराठा बटालियनने दुसऱ्या महायुद्धातही आपल्या पराक्रमाची चमक दाखवली. आफ्रिका खंडातील पहाडांपासून ते वाळवंटांपर्यंत सर्व प्रकारच्या युद्धभूमीवर मराठा बटालियनने शौर्य गाजवून सर्व लढाया जिंकल्या. या युद्धात मराठा रेजिमेंटच्या सर्व बटालियन या उत्तर आफ्रिका, युरोप, ब्रह्मदेश येथे लढल्या आणि आपल्या मर्दुमकीचा ठसा त्या भूप्रदेशावर उमटवला. याच युद्धातील असीम शौर्याबद्दल मराठा बटालियनच्या नामदेव जाधव आणि यशवंत घाडगे यांना खास ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ने इटलीत सन्मानित करण्यात आले.
स्वातंत्र्यानंतर गोवा मुक्ती संग्रामावेळी आदेश मिळताच बेळगावमधील मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे सैनिक बेळगाव, वेंगुर्ल्यामागे गोव्यात पायी गेले आणि त्यांनी पोर्तुगीजांना पराभूत करीत माघारी जाण्यास भाग पाडले. तसाच पराक्रम त्यांनी दमण, दीव येथेही गाजवला. १९६२च्या युद्धात सिक्कीममध्ये ‘मराठा’ची तुकडी आघाडीवर होती. मराठा लाइट इन्फंट्रीमधील सहा ‘मराठा’बटालियनना चीनबरोबरच्या युद्धात सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील तिबेट सीमेवर कामगिरी केली. १९६५ आणि १९७१च्या पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धातही ही बटालियन आघाडीवर होती. १९६५च्या युद्धात अमृतसर-वाघा येथून पाकिस्तानी हद्दीतील बुर्ज नावाच्या ठाण्यावर कब्जा करणारी तुकडी ‘मराठा’चीच होती. पुण्यात ज्यांच्या नावाने साळुंके विहार हा परिसर ओळखला जातो, त्या शिपाई पांडुरंग साळुंके यांना याच लढाईसाठी महावीरचक्र मिळाले होते. केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेर युद्ध करण्याची आणि ते जिंकण्याची परंपरा मराठा बटालियननी आजही जिवंत ठेवली आहे. स्वतंत्र हिंदुस्थानी सरकारने जवानांच्या पराक्रमासाठी ‘अशोकचक्र’ देण्यास सुरुवात केल्यानंतर पहिले अशोकचक्र ‘दोन मराठा बटालियन’चे कॅप्टन एरिक ठक्कर यांनी मिळवले. पुण्यातील हडपसरमधील लष्करी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचा परिसर असलेला टक्कर विहार हा परिसर त्यांच्याच नावे ओळखला जातो. त्यांनी मिझोराम, नागालँडमध्ये बंडखोरांशी लढताना गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना अशोकचक्राने सन्मानित करण्यात आले होते. १९७१च्या युद्धात तत्कालीन पूर्व पाकिस्तानात मराठा लाइटच्या सैनिकांनी आपल्या पराक्रमाने सर्वांना थक्क केले. मेजर नांबियार आणि लेफ्टनंट कर्नल ब्रार यांना ढाक्काच्या लढाईसाठी वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील कर्नल संभाजी पाटील यांच्या २२ मराठाच्या तुकडीने असामान्य धैर्य दाखवत हिली प्रांत ताब्यात घेतला.
ढाक्क्यावर कब्जा केला. या विजयाचे श्रेय या तुकडीलाच जाते. पूर्व पाकिस्तानातच सात मराठा लाइट इन्फंट्रीच्या तुकडीने (माझी बटालियन) पाचागड व कांतानगर येथिल महत्त्वाच्या ठिकाणावर कब्जा केला होता. त्याचवेळी लाहोरकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील नैनाकोट हे पाकिस्तानातील अत्यंत मोक्याचे ठाणे मराठाच्याच तुकडीने आपल्या विलक्षण पराक्रमाच्या जोरावर ताब्यात घेतले. या लढाईसाठी पुण्यातील कर्नल सदानंद साळुंके यांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आले.
काश्मीर असो वा अरुणाचल, राजस्थान असो वा सियाचीन अशी एकही सीमा नाही, जिथे ‘मराठा’ची तुकडी तैनात नाही. अगदी संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैन्यातही ‘मराठा’ची कामगिरी अत्यंत उजवी राहिली आहे. गरिबी, मागासलेपणा, भ्रष्टाचार यांचा जवळून अनुभव घेतलेले आपले सैनिक अशा ठिकाणी अन्य परकीय सैन्याच्या तुलनेत उत्तम कामगिरी करतात याची दखल संयुक्त राष्ट्रांनीही घेतली आहे.
हिंदुस्थानी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्येही मराठा रेजिमेंटच्या सैनिकांचा समावेश आहे. सेकंड पॅराच्या तुकडीनेही उत्तम काम केले आहे. म्यानमारमधील सर्जिकल स्ट्राइकसारख्या अत्यंत अभिमानास्पद कारवाईतही मराठाच्या सैनिकांचा समावेश होताच. कर्नल व्ही. बी. शिंदे यांनीच पहिली स्पेशल फोर्सेस बटालियन सुरू केली.
मराठा रेजिमेंट लढते आपल्या रेजिमेंटच्या नाव, परंपरा, अभिमान आणि निष्ठsसाठी. मराठा सैनिक गरीब कुटुंबातून आले असले तरी ते अत्यंत काटक, चपळ, कुशल, तगडे आणि कुठल्याही कामगिरीसाठी सदैव तयार असलेले आणि शिस्तीचे भोत्ते असतात. म्हणूनच रणांगणावर त्यांच्या शौर्याला धार चढते. आधुनिक काळातील कोणतेही तंत्रज्ञान व डावपेच ते सहज आत्मसात करतात. मराठा लाइट इन्फंट्रीने स्वातंत्र्यानंतर देशाच्या रक्षणार्थ दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. प्रत्येक युद्धात मराठे आघाडीवर होते. त्यासाठी वेळोवेळी महावीरचक्र, अशोकचक्र, वीरचक्र आदी सन्मान देऊन लष्कराने त्यांची जाणीव ठेवली. आतापर्यंत मराठा रेजिमेंटला ६५०हून जास्त शौर्य पुरस्कार मिळाले आहेत. मराठा रेजिमेंटचा इतिहास हा “Valour Enshrined Part 1 & 2″या पुस्तकात देण्यात आला आहे. त्यांचे शौर्य हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
लष्करामध्ये मराठा लाइट इन्फंट्रीला वेगळा सन्मान आहे. तो मराठ्य़ांनी आपल्या परंपरागत अतुलनीय शौर्य, कडक शिस्त आणि कार्यकुशलता आणि व्यावसायिकतेच्या जोरावर मिळवला आणि टिकवलाही आहे. म्हणूनच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील किंवा धोकादायक सीमांवर लढण्यासाठी ‘मराठा’च्याच तुकडीची वारंवार निवड केली जाते. अलीकडे छुपे युद्ध, दहशतवादी हल्ले, बंडखोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यावेळी शिवरायांचे डावपेच, युद्धनीती, गनिमी कावा आपल्या कामी येणार आहे. हलक्या पावलांनी चालत शत्रूला बेसावध ठेवत नेमक्या वेळी नियोजनबद्ध हल्ला करत शत्रूचे शक्य तितके नुकसान करतानाच स्वतःचे नुकसान होऊ न देणे महत्त्वाचे ठरणार आहे. बदलत्या गरजांनुसार त्यांना सर्व आधुनिक प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे आधुनिक युद्धातही मराठा बटालियन कायम आघाडीवर राहतील यात शंका नाही.
कोणत्याही रेजिमेंटसाठी २५० वर्षे हा अत्यंत गौरवास्पद क्षण असतो. तो दणक्यात साजराही व्हायला हवा. गौरवशाली इतिहासाला उजाळा द्यायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानुसार वाटचाल करताना आपल्या मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा झेंडा कायम उंच फडकत राहील याची दक्षता घ्यायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज हे ‘मराठा’चे दैवत आहे. ‘बोल श्री शिवाजी महाराज की जय!’ ही या बटालियनची युद्धघोषणा आहे. मराठा लाइट इन्फंट्री आज देशाच्या सर्व सीमा सांभाळण्यात आघाडीवर आहे आणि यापुढेही राहील.

No comments:

Post a Comment