Total Pageviews

Tuesday 1 November 2016

ड्रॅगनला हादरा!-देशभरात स्वदेशी अभियान चालविल्यामुळे चिनी वस्तूंच्या विक्रीत ६० टक्के घट आली.-लोकांनी दोन पैसे जास्त देऊन ‘मेड इन इंडिया’ वस्तू खरेदी केल्या अन् चिनी उत्पादने नाकारली.


November 1, 2016 केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे…’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. प्रत्येक म्हणीमागे कुठला ना कुठला मथितार्थ लपला असतो, हे सजग वाचकांना सांगण्याची गरज नाही. या म्हणीमागेदेखील जो भावार्थ आहे, तो सरळ आणि स्पष्ट आहे. आज ही म्हण आठवायची पाळी यासाठी आली की, देशभरात गेल्या महिनाभर चिनी फटाके आणि चिनी वस्तूंच्या विरोधात आंदोलन छेडले गेले होते. सोशल मीडियावर पेटलेल्या या आंदोलनात तरुण भारत आणि स्वदेशी जागरण मंच, नागपूरनेही आपल्या समिधा टाकल्या. एक जाहीर आवाहन करून जनताजनादर्नाच्या हृदयाला हात घालून, चिनी वस्तूंवर बहिष्कार आणि स्वदेशीचा पुरस्कार करण्याचे आवाहन करण्यात आले. पण, तभाच्या आंदोलनाला काही लोकांनी विरोध सुरू केला, नाक मुरडायला आणि तोंडदेखील वेंगाडायला सुरुवात केली. तभाच्या एवढ्याशा विरोधाने काय साध्य होणार? लोक स्वस्त चिनी फटाके, शोभेच्या चिनी वस्तू, विजेच्या चिनी बनावटीच्या माळा, चिनी बनावटीच्या देवी-देवतांच्या मूर्ती खरेदी करणे थोडेच थांबवणार? असे प्रश्‍न उपस्थित केले गेले. दुसरीकडे, प्रश्‍न राज्यकर्त्यांनाही विचारले गेले. एकीकडे तुम्ही चिनी वस्तू नाकारता आणि तंत्रज्ञान मात्र चीनचे स्वीकारता. स्मार्ट सिटी उभारण्याची कंत्राटं चिनी कंपन्यांना देता, देशात सुपरफास्ट मेट्रोचे लोखंडी डबे तयार करण्याचे काम चिनी कंपन्यांना देता, त्यांचे महागडे मोबाइल्स खरेदी करता, त्यांचे संगणक आणि त्यांचे सॉफ्टवेअर्स खरेदी करता. शिवाय या देशाच्या नेत्यांसोबत एका मंचावर येऊन चर्चादेखील करता. मग या बहिष्काराचा काय उपयोग? असा विरोधकांचा सवाल होता. चिनी फटाक्यांवर बंदी घालून तळहातावर जिणे जगणार्‍यांच्या हातची रोजी-रोटी का हिसकावता, असा सवालही विरोधक उपस्थित करीत होते. पण, अशा मंडळींच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करणेच सोयिस्कर असते. ही मंडळी स्वतःही काही करीत नाही आणि दुसर्‍याने काही केलेले यांना आवडत नाही. त्यामुळे असे नकारात्मक बुडबुडे धुडकावून देशभरात चिनी वस्तूंच्या बहिष्काराची चळवळ सुरू होती. भारतातील उरीस्थित लष्करी तळावर हल्ला करून पाकिस्तानने, झोपेत असलेल्या १८ भारतीय जवानांची हत्या केल्याने समाजमन संतप्त होते. त्यातच पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत संयुक्त राष्ट्रसंघात मोर्चेबांधणी करीत होता. पण, चीनने ‘व्हेटो पॉवर’ वापरून भारताचे हे प्रयत्न हाणून पाडतानाच भारताचा शत्रुदेश पाकचे हात मजबूत केले, त्याच्या बाजूने आपले पारडे झुकविले. पाकिस्तानच्या दहशतवादी चेहर्‍याचा बुरखा फाडण्यासाठी जनमतजागृती करण्याची आपली मोहीम सुरू असताना, चीन पाकिस्तानला लष्करी सामुग्री देऊन मोकळा झाला. एकीकडे भारताशी मैत्री करायची आणि दुसरीकडे भारतविरोधी पाकला मदत करायची, ही बाब काही देशवासीयांना पटली नाही. त्यांनी मनात ठरवले आणि सरकार काय म्हणेल याचा विचार न कराता स्वदेशीचा पुरस्कार व चिनी वस्तूंच्या बहिष्काराचे आंदोलन सुरू केले. देशातील जनतेत राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग चेतविले गेले. अगदी नागपूरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि वर जम्मूृ-काश्मीर, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, पश्‍चिम बंगाल आदी सर्वच राज्यांमध्ये चिनी वस्तूंविरुद्ध आंदोलन सुरू झाले. धर्म, पंथ, वंश, जाती, गरीब, श्रीमंत आणि सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाभिनिवेश न बाळगता, हे आंदोलन उचलून धरले. पाहता पाहता या आंदोलनाचे लोण गावागावात पोहोचले. त्यात तभानेही खारीचा वाटा उचलला. सोशल मीडियावर तर या आंदोलनाला प्रचंड गती मिळाली. अनेक पोस्ट टाकून लोकांनी चीनचा खरा चेहरा भारतीयांना दाखविला. या देशाचा दुटप्पीपणा सांगणारे प्रसंग जगापुढे येऊ लागले, त्याने आपल्या चलनाच्या मूल्यांकनात केलेली कृत्रिम घसरण जगापुढे आली. आपला खोटा माल विदेशी बाजारपेठेत घुसवण्यासाठी योजलेल्या त्याच्या क्लृप्त्या जगजाहीर झाल्या आणि पाहता पाहता लोकांनी चिनी वस्तूंच्या होळ्या केल्या, व्यापार्‍यांनी नवी कंत्राटं घेण्याचे नाकारले, कुणी चिनी फटाके घेणे टाळले, तर कुणी शोभिवंत वस्तूंचा विरोध करून राष्ट्रभक्तीचा परिचय दिला. सरकारनेही ठिकठिकाणी अवैध फटाक्यांचे कोट्यवधींचे साठे जप्त केले. व्यापार्‍यांनीही यापुढे चिनी वस्तू न उचलण्याचा संकल्प केला. मोर्चे काढले, धरणे दिली, कॅण्डल मार्च निघाले, मानवी साखळ्या तयार झाल्या आणि आंदोलनाला गती मिळाली. चीनलाही या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. अनेक भारतीय शहरांमध्ये एकाच वेळी सुरू झालेल्या या आंदोलनामुळे चीनच्या निर्यातीला फटका बसू शकतो, हे ध्यानात घेऊन चीनने गुरकावून पाहिले. चिनी मालावर टाकलेला बहिष्कार भारताला परवडणार नाही, असे वक्तव्य करून चीनच्या विदेश मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने डोळे वटारून पाहिले. पण, आताचा भारत १९६२ चा राहिलेला नाही, ना १९७१ चा! त्याला आपले भले-बुरे कळायला लागले आहे. त्यात केंद्रातील सरकारही बोटचेपे राहिलेले नाही. त्यामुळेच नागरिकांनी मनसोक्तपणे आंदोलनात झोकून दिले. आणि काय आश्‍चर्य, आंदोलनाने काय साध्य होणार? चीनची निर्यात कोट्यवधींची आहे, तिला तुम्ही एक टाचणीसुद्धा टोचू शकणार नाही, अशी वल्गना करणार्‍यांना जबरदस्त चपराक लावणारे निष्कर्ष पुढे आले. देशभरात स्वदेशी अभियान चालविल्यामुळे चिनी वस्तूंच्या विक्रीत ६० टक्के घट आली. एखाद्या स्वयंसेवी संस्थेने पुकारलेल्या आंदोलनाला यापेक्षा दुसरे चांगले फळ कोणते असू शकते? भारतीय बाजारपेठा आणि येथील सहिष्णू नागरिकांना गृहीत धरणार्‍या चिनी उत्पादकांचे या दिवाळीने दिवाळेच काढले! लोकांनी दोन पैसे जास्त देऊन ‘मेड इन इंडिया’ वस्तू खरेदी केल्या अन् चिनी उत्पादने नाकारली. कित्येकांनी तर फटाकेच फोडले नाहीत! चिनी बनावटीच्या वस्तूंऐवजी या वर्षी दिवाळीत देशभरात कागद, मातीच्या वस्तू, चॉकलेट, सुका मेवा, मिठाई, देशी उपकरणे तसेच तामिळनाडूतील शिवकाशीमध्ये तयार करण्यात आलेल्या फटाक्यांना ग्राहकांनी पसंती दिली. मायबाप जनता, मनात आणले तर सरकारवर, त्याच्या धोरणावरही प्रभाव पाडू शकते, हे या आंदोलनाने दाखवून दिले. चीनचा एकाधिकार मोडून काढण्याचा अर्थ आपल्या सार्‍यांना माहीत आहे. यातून भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. टक्केवारीवर न जाता भारतीयांमध्ये किती सजगता आली, हेच यातून दिसून आले. आमच्या देशाविरुद्ध कट-कारस्थानं कराल, तर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील, असा कठोर संदेशच यातून पाकिस्तानला आणि त्याचा मित्र चीनला गेला आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून भारताने पाकिस्तानची झोप उडवली आहे. आता चिनी वस्तूंच्या बहिष्काराला मिळालेल्या प्रतिसादामुळे चीनची झोप उडणार आहे. चिनी ड्रॅगनला मिळालेल्या या इशार्‍याचा मथितार्थ चिनी राज्यकर्त्यांनी जाणून घ्यावा, एवढीच अपेक्षा…!

No comments:

Post a Comment