November 22, 20160105
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा फटका ज्यांना बसला आहे, ते काळा पैसा जमा करणारे लोक हादरून गेले आहेत. या देशातील सर्वसामान्य माणसाला त्रास जरूर होत आहे, पण त्याविरुद्ध त्यांची काहीही नाराजी नाही. बँकांसमोर आणि एटीएमसमोर लागलेल्या रांगांना भेटी द्यायच्या, रांगांमधील लोकांना होणारा त्रास जाणून घ्यायचा, टीव्हीच्या छोट्या पडद्यावर झळकायचे असला उद्योग काही लोकांनी चालविला आहे.
पैसे काढण्यासाठी, जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आज देशभरातील बँकांपुढे अजूनही रांगा लागल्या आहेत, हे सत्य आहे. पण, या रांगांमध्ये उभे असलेले लोक हे सगळेच गरीब आहेत, सगळेच गरजू आहेत, असे समजण्याचे कारण नाही. या रांगांचे वास्तव आपल्या व्यवस्थेचे वाभाडे काढणारे आहे. ज्यांनी मोठ्या प्रमाणात काळा पैसा जमा केला आहे, तो पांढरा करण्यासाठी ही मंडळी कामाला लागली आहे. वाम मार्गाचा अवलंब केला जात आहे. दिवसाला कुठे दीडशे, कुठे दोनशे, तर कुठे तीनशे रुपये रोजाने भाडोत्री माणसे रांगांमध्ये उभे करून जुन्या नोटा बदलवून घेण्याचा गोरखधंदा तेजीत आहे. त्यामुळेच सरकारने साडेचार हजार रुपयांची मर्यादा कमी करून दोन हजार रुपयांवर आणली, बोटावर शाई लावण्याचा उपाय अंमलात आणला, हे लक्षात घेतले पाहिजे. कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना रांगेतल्या लोकांची एवढीच काळजी आहे, तर त्यांनी अशा भाडोत्री लोकांना हुडकून पोलिसांच्या हवाली केले पाहिजे. ज्यांनी या भाडोत्री लोकांना रांगांमध्ये उभे केले आहे, त्यांना हुडकून काढत त्यांच्याकडील काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा करण्याच्या कामी सरकारला मदत केली पाहिजे. पण, ते तसे करणार नाहीत. कारण, काळा पैसा जमवण्यात त्यांचीही आघाडी आहे. ज्यांनी चिटफंडात मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवून घोटाळे केलेत तीच मंडळी टीका करीत आहेत, असा प्रहार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला, तो योग्यच आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मोदी सरकारने पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेऊन मोठ्या परिवर्तनाचे संकेत दिले आहेत. देशाच्या आयुष्यात असे निर्णय फार कमी वेळा घेतले जातात. कारण, अशा कठोर निर्णयामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत होते. परंतु, राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे नागरिक अशा निर्णयांनी विचलित होत नाहीत, हेही देशाने अनुभवले आहे. विचलित होणारे कोण आहेत, नोटाबंदीला विरोध करणारे कोण आहेत, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मोदी यांनी एका झटक्यात जे केले, ते आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानाला करता आले नव्हते. काळा पैसाधारकांच्या तिजोरीतला मोठा पैसा सरकारच्या तिजोरीत आणण्याचे फार मोठे राष्ट्रकार्य मोदी यांच्या हातून घडले आहे. काळ्या धनाच्या विरोधात असा ‘सर्जिकल स्ट्राईक’ यापूर्वी कधीही झाला नव्हता. ज्याच्याकडे राजकीय इच्छाशक्ती आहे आणि देशहितासाठी कोणताही त्याग करण्याची ज्याची तयारी असते, असाच नेता ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू शकतो. मोदींच्या एका निर्णयाने देशभक्त कोट्यवधी सामान्य लोकांची मान सन्मानाने उंचावली आहे. सत्तेत येण्याआधीपासून नरेंद्र मोदी काळ्या पैशांबाबत बोलत होते. सत्तेत येऊन त्यांना अडीच वर्षे झाली आहेत. सत्तेत आल्यापासून तर त्यांनी काळ्या पैशांबाबतची मोहीम तेज केली होती. पण, मोदी काय करत आहेत, हे कुणी लक्षातच घेतले नाही. राजकीय विरोधक मोदींवर टीका करीत राहिले. मोदींनी काळ्या पैशांविरुद्ध प्रक्रिया सुरू ठेवली अन् अचानक ८ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घोषित करून काळ्या पैसावाल्यांना हादरा दिला, तर सामान्यजनांना सुखद धक्का दिला. जनतेला त्रास होत असला, तरी जनतेने सरकारचा निर्णय स्वीकारला आहे. जी बाब आम आदमीला क्षणात लक्षात आली, ती त्यांच्या नेत्यांच्या पचनी पडू शकली नाही, हे या देशाचे दुर्दैवच म्हटले पाहिजे. ज्या आम आदमीच्या खिशात काहीच नाही, तो आम आदमी दोन हजार आणि चार हजारांसाठी रांगेत उभा राहून देशहितासाठी कष्ट सोसत आहे, सरकारच्या निर्णयाची प्रशंसा करीत आहे. मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे देशाची केवळ अर्थव्यवस्थाच सुधारेल असे नव्हे, तर या समाजात आणि देशातही परिवर्तन येणार आहे. आम आदमीला रांगेत उभे राहण्याच्या दु:खापेक्षा जास्त आनंद या गोष्टीचा आहे की, काळा पैसाधारकांच्या भरलेल्या तिजोरीतील धन सरकारी तिजोरीत येणार आहे आणि त्यातून देशाचा विकास होणार आहे. आपल्याकडे असलेल्या काळ्या पैशांतून आपण सरकारही खरेदी करू शकतो, असा उर्मट भाव ज्यांच्या मनात होता, त्यांना आता नोटबंदीनंतर रडायला खांदा मिळेनासा झाला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आर्थिक उदारीकरणानंतर समाजात एक नवीच संस्कृती पाय पसरवू लागली होती. लाचखोरी, करचोरी आणि अन्य चुकीच्या मार्गाने रातोरात श्रीमंत झालेले लोक आपल्या संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन करू लागले होते. त्यामुळे प्रामाणिक माणसाला अशा समाजात गुदमरल्यासारखे झाले होते. अशा प्रामाणिकांना मोदी सरकारने फार मोठा दिलासा दिला आहे.
No comments:
Post a Comment