Total Pageviews

Saturday 12 November 2016

हजार पाचशेच्या चिल्लर गोष्टी गजू तायडे

हजार पाचशेच्या चिल्लर गोष्टी मोदी सरकारने पाचशे आणि एक हजाराच्या नोटा तडकाफडकी रद्द काय केल्या, ‘देश में हडकंप मच गया...’ अर्थात या उलथापालथीत कुणी दुखावले, कुणी जाम सुखावले... : अरे, हे तुझ्याकडून उसने घेतलेले पंचवीस हजार रुपये परत करतोय, बरं का. : पण या तर हजाराच्या नोटा आहेत. : मग काय झालं? बँकेतून बदलून घे की! : एवढे झटके कोण घेत बसणार? किती कटकट असते ती! रांगा लावा, रोज चार हजारांच्याच नोटा बदलून घ्या. त्यापेक्षा, तू मला शंभरच्याच नोटा दे बघू. : हे बघ, उसने देताना तूसुद्धा हजारच्याच नोटा दिल्या होत्यास ना? मग? लॉजिकली पाहता तुला हजारच्याच नोटा परत घ्याव्या लागतील. : अरे पण- : ते काही नाही. तत्त्व म्हणजे तत्त्व! ------------------------ : ढंप्या, ती बघ प्रेतयात्रा निघालीय, स्मशानाच्या रस्त्यानं. प्रेतावर पैसे उधळताहेत बघ. चल चल. आपण गोळा करू पैसे. : छ्या झंप्या, काही अर्थ नाही त्यात. गेले पाच-सात दिवस प्रेतांवरून नाणी उधळणं बंद केलंय लोकांनी. नोटा उधळू लागलेत आता. : मग काय झालं? नोटा तर नोटा. आपल्याला पैशाशी मतलब. : पण ते हजार अन् पाचशेच्या नोटा उधळताहेत ना! : हलकट साले! मागे पंचवीस पैशाची नाणी बंद झाली होती, तेव्हा पंचवीस पैशाची नाणी उधळायचे लोक. : तर! हे चीटिंग आहे. मृतात्म्यांना सद्गती नाही लाभणार अशानं. ------------------------ : भाई भाई, अब क्या करनेका? : क्या हुआ रे टकलू खोटा? परेशान दिसतोस! : इंडिया गव्हर्नमेंटनं हजार अन् पाचशेच्या नोटा बंद केल्यायत. तडकाफडकी! आता आपण छापलेल्या एवढ्या मोठ्या गोडाउनभर नोटांचं काय करायचं? : अरे इसकी मांकी…! ये तो बडा प्रॉब्लेम हो गया! किती रकमेच्या नोटा आहेत एकूण गोडाउनमध्ये? : पन्नासेक लाख कोटी तरी पडून असतील! शिवाय सर्क्युलेशनमध्ये असलेल्या वेगळ्याच. : हं… कागदाच्या रद्दीचा भाव काय सुरू आहे, हल्ली कराचीत? : साडेसात रुपये किलो! : बेच डालो! जे काही पैसे मिळतील, त्यातच समाधान मानायचं आता. ‘सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम् त्यजति पण्डितः’ असं म्हणतात ना! : म्हणजे काय भाई? माझ्या डोक्यावरून गेलं हे… : इसका मतलब है, ‘जेव्हा सर्वनाश जवळ येतो, तेव्हा पंडित लोक अर्ध्याचा त्याग करतात आणि अर्धं वाचवतात.’ : फिर तो भाई तुम महापंडित है… : वो क्या है ना टकलू, मै आजकल फावले वेळ में संस्कृत पढता हूं. : संस्कृतबद्दल नाही म्हटलं मी. त्यागाबद्दल बोलतोय. तुम्ही अर्धं कुठं, एक टक्काही वाचवत नाही आहात. प्रिंटिंग कॉस्टपण वसूल होणार नाहीये रद्दीच्या पैशातून. : चलताय रे बाबा. या इंडियन गव्हर्नमेंटचा हल्ली भरोसाच राहिला नाही. यापुढं आपण फक्त यूएस डॉलरच छापत जाऊ या. : आता अमेरिकेवर पण भरोसा ठेवता येणार नाहीये भाई! : वो क्यूं? : तिथं डोनाल्डभाई निवडून आलेत ना! ------------------------ : अहो उठा! उठा पटकन!! : अं? काय झालं…? : चोर शिरलेत घरात! उठा बघू! : चोर? हा हा हा हा हा!... : हसताय काय वेड्यासारखं! ते बघा कपाट फोडताहेत! : फोडू देत! हा हा हा हा हा!... : बाई बाई! कम्माल झाली! घरात चोरी होतेय अन् तुम्ही खदाखदा हसताय! : हा हा हा हा हा!... : अहो, ते बघा! गोण्या भरून निघालेत ते परत! पोलिसांना फोन लावा ना! : हा हा हा हा हा हा हा! : आता हसणं थांबवता की हाणू टाळक्यात लाटणं? : अगं… हा हा हा हा! खुशाल नेऊ देत त्या चोरांना पैसे. पस्तावतील ते! तू झोप बघू गुपचुप! सगळ्या हजार अन् पाचशेच्याच नोटा होत्या त्या कपाटात! हा हा हा हा… ------------------------ : टेन्शनमध्ये दिसताय दादा आज. : हो ना! काल सोनाराकडे गेलो होतो, नवं ब्रेसलेट घ्यायला. साला हजाराच्या अन् पाचशेच्या नोटा घेणार नाही, म्हणाला. आता काय करावं बरं? : च्च च्च! हे वाईट झालं. ‘तालुक्याचा गोल्डनमॅन’ अशी तुमची ख्याती आहे. तुमच्या अंगावर किलो-किलो दागिने असतात. ब्रेसलेट्स, कडी, सलकडी, गोफ, अंगठ्या, तोडे, कंबरपट्टे. शिवाय तुमचा शर्टच काय, पँट आणि आतली चड्डी पण सोन्याची असते! : छ्या बुवा! गुंठामंत्र्यांना एवढे वाईट दिवस कधीच आले नव्हते. नाव खराब होणार आता माझं अख्ख्या तालुक्यात. काही सुचेनासं झालंय. : हं… एक आयडिया आहे दादा. : सांग बघू काय आयडिया आहे, ती! : दादा, तुम्ही अंगावर एवढं सोनं कशासाठी घालता? : कशासाठी म्हणजे? आमची संपत्ती, आमचं ऐश्वर्य लोकांना दिसायला नको? लोकांवर वचक कसा राहणार नाहीतर? : बरोब्बर! आणि तुमच्याकडे हजार आणि पाचशेच्या नोटांची खोकीच्या खोकी पडून आहेत. सगळा पैसा बेहिशेबी असल्यानं तुम्हाला त्या नोटा बदलूनही घेता येणार नाहीत. : खराय. सगळी पंचाईत झालीय! : मग तुम्ही आता असं करा. त्या नोटांचे हार करा आणि अंगावर घाला. : कायच्या काय! : अहो त्यात काय? निवडणुकांच्या वेळी पुढारी लोक नाही घालत का नोटांचे हार? तुम्ही पण घाला. शेवटी संपत्तीचं प्रदर्शन महत्त्वाचं. तसंही गावगन्ना गोल्डन मॅन उगवलेत हल्ली. आउट ऑफ फॅशन होतंय सोनं आता. : ते पण बरोबरच आहे म्हणा… : शिवाय तुम्ही त्या नोटांचे शर्ट, पँटी, चड्ड्या वगैरेपण शिवून घालू शकता. कसं हटके वाटेल ना ते! : हां… ही खरंच मस्त आयडिया आहे. लाव! त्या न्यू मॉडर्न टेलरला फोन लाव. दादांची मापं घ्यायला ये म्हणावं. : आता कसं? गिनीज बुकातपण नाव येईल बघा, तुमचं! ------------------------ : गरिबाला दानधरम करा मायबाप. लेकराबाळांचं भलं होईल तुमच्या... : पैसे नाहीत रे सुट्टे. नाहीतर दिले असते… : बघा मालक. असेल एखादी दहा-वीसची नोट कुठंतरी. : नाही रे. सगळ्या हजाराच्या अन् पाचशेच्याच नोटा आहेत. हल्ली भिकारीपण घेत नाहीत त्या. : मग खर्च कसा चालवता मालक? : हेच आपलं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड… : डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आहे ना? मग नो प्रॉब्लेम मालक. माझ्याकडे स्वाइप मशीन आहे! चलताय रे बाबा. या इंडियन गव्हर्नमेंटचा हल्ली भरोसाच राहिला नाही. यापुढं आपण फक्त यूएस डॉलरच छापत जाऊ या. आता अमेरिकेवर पण भरोसा ठेवता येणार नाहीये भाई! वो क्यूं? तिथं डोनाल्डभाई निवडून आलेत ना

No comments:

Post a Comment