आपला पैसा काळा होतोय्…
November 16, 2016
0
52
अर्थचिंतन
८ नोव्हेंबर २०१६ ला भारत सरकारने ५०० व १००० रु.च्या नोटा बंद करून, काळ्या पैशाचे चलन काही प्रमाणात कमी करण्याच्या दिशेने एक पाऊल निश्चितच उचलले आहे. १९७८ मध्ये तत्कालीन सरकारने १०००, ५००० व १०,००० च्या नोटांवर बंदी आणून असाच एक प्रयत्न केला होता. परंतु, काळ्या पैशाचे चलन थांबवण्यात तेव्हाचे व त्यानंतरची सगळी सरकारे अपयशीच ठरली आहेत. विद्यमान सरकारनेही २००० रु. च्या नोटा चलनात आणून मागील अपयशावरून बोध घेतला नसल्याचेच जाणवते. वरील निर्णयाने काळा बाजारी पूर्णपणे बंद होण्याची शक्यता कमीच आहे. आज देशात अत्याधिक काळा पैसा हा अवैध रीत्या घेतलेल्या जमिनीच्या व सोन्याच्या स्वरूपात आहे. या व्यतिरिक्त खूप मोठ्या प्रमाणात तो विदेशी चलनाच्या रूपात विदेशी बँकांमध्येदेखील आहे. पण, जुन्या मोठ्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे रोख काळा पैसा, थोड्या प्रमाणात का होईना, चलनातून बाहेर जाण्याची शक्यता आहे.
एकदा बाजारात आलेला काळा पैसा पुढच्या काळ्या पैशांचा ओघ कैक पटींनी वाढवतो. याकरिता आपण सर्वसाधारणपणे नेत्यांना (राजकीय, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक इ.) नावे ठेवतो, पण त्याची छोटीशी सुरुवात ही आम जनतेच्या अज्ञानामुळे होत असते. त्यामुळे काळा पैसा नव्यानं बाजारात येणे काही प्रमाणात आपणही थांबवू शकतो.
सरकारने छापलेल्या नोटा हा तर मुळात काळा पैसा नसतो. तो आम जनतेपर्यंत बँकांच्या माध्यमातूनच पोहोचतो. म्हणजे आपल्याकडे पैसा येतो तो काळा पैसा नसतो. आपण तो पैसा कुठे आणि कसा खर्च करतो, यावर तो पांढरा राहणार की काळा होणार, हे अवलंबून असते. आपल्या जबाबदारीची सुरुवात इथूनच होते.
आपल्या रोजच्या छोट्याछोट्या गरजेच्या वस्तू दुकानांमधून आपण घेऊन येतो. अत्याधिक वेळा याची बिले आपण घेत नाही. म्हणजे आपल्याकडील वैध पैसा अशा अघोषित व्यवहारांतून काळा होऊ शकतो.
रेल्वेप्रवासात आरक्षण नाही म्हणून, कुठेही मोठी रांग असते म्हणून, सरकारी कार्यालयातील आपली कामे व्हावीत किंवा त्वरित व्हावीत म्हणून संबंधित प्रतिनिधीस आपण रोख पैसा देतो. म्हणजेच लाच देऊन आपले काम करून घेतो. इथे पांढरा पैसा काळा होतो. आपण गावा-शहरांत जमीन, शेतजमीन, फ्लॅट विकत घेताना खरेदीच्या व्यवहारात रोख पैसा देतो. आपण देवस्थानांना निनावी रोख देणग्या देतो. अशा अघोषित व्यवहारांतून काळा पैसा निर्माण होतो. आपण आपल्या खर्चाचे योग्य व्यवस्थापन केले, तर हा नव्यानं आलेला पांढरा पैसा काळा होण्यापासून वाचू शकतो. आपला महिन्याचा किराणा वा भाजी वा सातत्याने एकाच व्यापार्याकडून महिनाभर होणार्या व्यवहारात आपण रोजचा रोख व्यवहार न करता त्याच्याकडे चेकने वा बँकेच्या माध्यमातून आगाऊ रक्कम देऊन ठेवू शकतो. अथवा महिनाअखेर हा व्यवहार करू शकतो. काही अगदी छोटे व्यवहार रोखीत करणे आवश्यक ठरते. परंतु, त्याची सीमा प्रत्येकाने ठरवून घेतली, तर कितीतरी रोख व्यवहार टाळता येतील. कुठल्याही खरेदीमागे वैध बिल असूनदेखील रोख पैसा दिला असल्यास विक्रेता ते बिल शासनाकडे जमा न करता त्यावरील कर वाचवू शकतो व आपला पैसा काळा होतो. प्रत्येक रोख व्यवहार काळ्या पैशाला जन्म देतो, असे नाही. परंतु, ते जितके कमी करता येतील तिथे तिथे काळा पैसा निर्माण होण्याची शक्यता कमी होईल.
जमीन, सोने वा तत्सम कुठल्याही खरेदीच्या व्यवहारात विशेष जागरूक राहून यात होणारा रोख व्यवहार पूर्णतः टाळला पाहिजे. ज्याच्याकडून आपण हे विकत घेतो त्याने हे त्याच्याकडील काळ्या पैशातून कमावलेले वा विकत घेतलेले नसावे, याची खबरदारी घ्यायलाच हवी. कुठल्याही व्यवहारातून आपल्याकडे येणारा रोख पैसा आपण त्वरित बँकेत जमा केला पाहिजे. तसेच रोख पैसा देणार्यास त्या रकमेची, त्याचा पॅन नंबर लिहिलेली वैध पावती दिली पाहिजे. याची एक प्रत आपल्याकडे ठेवली पाहिजे.
सामान्य जनतेने आजवर नकळत चालू असलेल्या, आपल्या या रोख व्यवहारांबाबत थोडी जरी सजगता दाखवली, तर काळा पैसा निर्माण होण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. घरभाडे, दुकानभाडे, वस्तूखरेदी इ. रोख न देता बँकेच्या माध्यमातूनच देण्यात यावे. कुठल्याही व्यवहारात चेक हा नेहमी अकाऊंट पेयी असावा, बेअरर नसावा. बेअरर चेक म्हणजे रोखच असते. कॉम्प्युटर वा मोबाईल वापरणार्या जनतेने तर आपले जास्तीत जास्त व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून करावे.
५०० व २००० रु.च्या नव्या नोटा बाजारात आल्या आहेत. त्याचे परावर्तन काळ्या पैशात होऊ नये, याची जबाबदारी आज आपण घेतली नाही, तर आपण केवळ सरकारच्या नावाने खडे फोडत राहू
No comments:
Post a Comment