Total Pageviews

1,056,122

Friday, 11 November 2016

एका चहावाल्याचा 'सर्जिकल स्ट्राइक' - संतोष धायबर

गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016 - पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेले ‘सर्जिकल स्ट्राइक‘ व काळ्या पैशांना लगाम घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला ऐतिहासिक धाडसी निर्णयाची चर्चा सुरू झाली अन् मोदी पुन्हा एकदा जगभरात चर्चेत आले... मंगळवार (ता. 9) हा दिवस इतर दिवसांप्रमाणेच एक. संध्याकाळी आठच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला अन् अनेकांच्या पायाखालची जमीनच हादरली. काही सेकंदात नोटांवर बंदीबाबतचा निर्णय सोशल नेटवर्किंगवरून फिरू लागला. सुरवातीला (टीव्ही न पाहणारे सोडून) कोणाचाच यावर विश्वास बसत नव्हता. परंतु, मोदींनी काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी 500 व 1000 रुपयांच्या नोटांवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक‘ने अनेकांची धावपळ उडाली. सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेले फेसबुक व व्हॉट्सऍपवरून मोदींना शुभेच्छा देणारे मेसेजेस फिरू लागले. चौका-चौकातील पान टपरीपासून ते जगातल्या कोपऱया-कोपऱयात बसलेले नेटिझन्स मोदी व बंदी घालण्यात आलेल्या नोटांवर चर्चा करू लागले. टीव्ही चॅनेलवरून फायदे-तोट्यांबाबतची माहिती सुरू झाली अन् प्रत्येकजण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला. एटीएम केंद्र व पेट्रोल भरण्यासाठी एकच धावपळ उडाली. अनेकांची झोप उडाली.... पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीचा निर्णय घेतल्यानंतर खऱया अर्थाने काळा पैसा जमवून ठेवणाऱ्यांची झोपच उडाली आहे. कोट्यावधी रुपयांचे करायचे काय हा प्रश्न निर्माण झाला. झोपेची गोळी घेऊनही झोप लागली नसेल तर दुसऱया बाजूला सर्वसामान्य नागरिक शांत झोपले होते. कारण, अगोदरच डोक्यावरच कर्जाचा डोंगर असल्यामुळे त्यांच्याकडे 500, 1000 रुपयांच्या नोटा असणारच कोठून? निवडणूक अन् राजकीय नेत्यांचे काय? विविध राज्यांमध्ये स्थानिक पासून ते विधानसभा निवडणूका होऊ घातल्या आहेत. निवडणूका म्हटल्या की पैसा आलाच हे एक समीकरणच झाले आहे. यामुळे अनेकांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पैसा साठवून ठेवल्याने या पैशाचे काय करायचे काय या विचारानेच अनेकांची झोप उडाली आहे. काळ्या पैशाला नक्कीच आळा बसणार... पंतप्रधानांच्या निर्णयामुळे नक्कीच काळ्या पैशाला आळा बसेल. सर्वसामान्य नागरिकांनाही दोन घास मिळविण्यासाठी रोज करावी लागणारी धडपड काही प्रमाणात तरी कमी होईल. एका बाजूला अति श्रीमंत नागरिक तर दुसऱया बाजूला महिनोन महिने पाचशे रुपयांची नोट न पाहणारे नागरिक असे चित्र पहायला मिळत होते. दोन कुटुंबांमध्ये मोठी आर्थिक दरी निर्माण झाली होती. काळा पैसा काही प्रमाणात बंद झाल्यास सर्वसामान्य नागरिकांनाही सुखाचे दिवस नक्कीच पहायला मिळतील. दहशतवादाला लगाम पाकिस्तानमधून घुसखोरी करून भारतात प्रवेश केलेल्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हजार व पाचशेच्या नोटा असल्याने त्यांची मोठी अडचण होणार. शिवाय, पाकिस्तानमध्ये बनावट करण्यात आलेल्या नोटांचे करायचे काय? हा प्रश्न नक्कीच त्यांच्यापुढे पडणार असणार. नोटांवरील बंदीमुळे दहशतवादाला सुद्धा लगाम बसणार यात शंका नाही. चहावाल्याचा धाडसी निर्णय गरिबी काय असते हे पाहिलेले अन् चहा विक्रीचे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा धाडसी निर्णय असल्याची चर्चा सोशल नेटवर्किंगवर सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर मोदी पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले. मोदींच्या निर्णयाचे जगभरातून स्वागत जगभरातील विविध दैनिकांनी मोदींच्या निर्णयाबाबाच्या बातम्या लावल्या आहेत. पाकिस्तानमधील ‘डॉन‘ या दैनिकाने केलेल्या बातमीवर पाकिस्तानी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. अनेकांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. भारताची प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे अस्लम शेख याने म्हटले आहे. पाकिस्तानला मोदींसारख्या नेत्याची गरज असल्याचे समी याने म्हटले आहे. मोदींची चाल योग्य रितीने सुरू असल्याचे चौधरीने म्हटले आहे. मोदी सरकारची वाटचाल जबरदस्त असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी नोंदविल्या आहेत. भ्रष्ट्राचाराला आळा घालण्यासाठी मोठ्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय अशा आशयाखाली न्यूयॉर्क टाईम्सने वृत्त प्रसारित केले आहे. ‘द टेलिग्राफ‘ या संकेतस्थळावरूनही अनेकांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मोदींना किती गुण द्याल? नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयाला तुम्ही 1 ते 10 पैकी किती गुण द्याल. किंवा मोदींच्या निर्णयाबद्दल फायदे अथवा तोट्यांबद्दल तुम्हाला काय वाटते हे सुद्धा प्रतिक्रियांच्या माध्यमातून जरूर लिहा.

No comments:

Post a Comment