Total Pageviews

Friday, 11 November 2016

काळा मंगळवार! अशुभ मंगळवार!!काही भारतीयांच्या मेहनतीवर मंगळवारने पाणी सोडले आहे. भारताच्या इतिहासात मंगळवारचा दिवस `काळा दिवस’ म्हणून पाळला जाईल. टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांचं सोडा पटवारी, ट्रफिक हवालदार, कचेरीतल्या शिपायालासुध्दा या दिवसाने सोडलं नाही. एवढंच नव्हे तर, नवर्याच्या खिशातून गुपचूप पाचशे-हजाराची नोट काढणार्या बायकांच्या मेहनतीवरसुध्दा मंगळवारची वक्रदृष्टी पडली… बरं एवढं सगळं घडलं ते फक्त एका माणसामुळे… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेवंदना बर्वे.-


काळा मंगळवार! अशुभ मंगळवार!! गेल्या मंगळवारचा सूर्य पोटात कपट घेवून उगवला. सव्वाशे कोटी नाही; मात्र, हे ईश्वरा।़।़।़ नरेंद्र मोदी नावाच्या माणसाला बनवताना झोपी गेला होतास का? तुझ्या हातून एक खूप मोठी अक्षम्य चूक झाली आहे. कळतंय का तुला? म्हणे, ईश्वर कधीच चुकत नाही. चुकतो तो माणूस. माय फूट! आता तू सुध्दा माणसाच्या श्रेणीत आला आहेस. आलंय का तुझ्या लक्षात. मागच्या मंगळवारी रात्री आठ वाजता आम्ही टीव्हीसमोर बसलो नसतो तर तुझा घोळ आमच्या लक्षात कधीच आला नसता. अरे! नरेंद्र मोदी नावाच्या माणसाला घडविताना काळीज, हृदय, मन यासारखे अवयव टाकायला विसरला आहेत तू. सोमरस प्यायला होतास की काय तू? त्यांना आमच्यासारखं हाडामासाचं बनविलंस; पण त्यांना अद्भुत क्षमता दिलीस. हिंमत दिलीस आणि आम्हाला काय दिलंस? मन, हृदय, काळीज आणि संवेदनशीलता! तू आमच्यावर अन्याय केला आहेस. आमच्याशी भेदभाव केला आहेस. अरे! तुझ्या एका चुकीची शिक्षा आम्हाला भोगावी लागली आहे. तुझ्या लाडक्या नरेंद्रने काय केलंय ठाऊक आहे का तुला? अरे! पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद केल्या आहेत. इन्कम टॅक्सच्या माणसांची नजर वाचवून या नोटा जमविल्या होत्या. हे सगळं करताना आम्ही किती श्रम घेतलेत हे बघितलं असशीलच तू! टाटा, बिर्ला आणि अदानी, अंबानींसारख्या उद्योगपतींनी किती मेहनत करून काळा पैसा जमविला होता. आधी शंभरच्या नोटा जमविल्या होत्या. पण पैसा जास्त झाला आणि जागा अपुरी पडू लागली. म्हणून आम्ही पाचशे आणि हजाराच्या नोटा गोळा केल्या. या नोटा गादीमध्ये लपविल्या. टॉयलेट, भींत, सोफा कुठे-कुठे लपवून ठेवाव्या लागल्यात. कचेरीतला चपराशी आणि ट्रफिक हवालदाराने उन्हा-तान्हात उभं राहून पैसा जमविला होता. तालुका-जिल्ह्यातला कारकून, तहसीलदार यासारख्या कितीतरी तळागळातील माणसांनी मेहनतीने पाचशे-हजारांच्या नोटा कमाविल्या होत्या. एवढा पैसा कुठून आणला? या प्रश्नाचं उत्तर सरकारला देता येत नव्हतं म्हणून आम्ही सर्वांनी या नोटा लपवून ठेवल्या होत्या. एकदा सीमेचे रक्षण करणार्या सैनिकाचं काम करणं सोप. मात्र, सरकार, इन्कम टॅक्स अधिकार्यांची नजर चुकवून नोटा लपवून ठेवणं किती अवघड कार्य आहे? हे कार्य आम्ही केलं. आणि, या नरेंद्र मोदी नावाच्या माणसानं अर्ध्या तासास आमच्या मेहनतीवर पाणी फेरलं! टीव्हीवर आले आणि पाचशे-हजारांच्या नोटा बंद, एवढं बोलून निघून गेले. त्यानंतर आमची काय अवस्था झाली? याचा तुला आभासही व्हायचा नाही. अरे! आमचं जावू दे! मात्र, आपलं संपूर्ण जीवन समाजाच्या सेवेत अर्पण करणार्या राजकारण्यांचा तरी विचार करायला हवा होता. काँग्रेसच्या मिडीया विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला आणि काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांचा चेहरा किती कोमेजल्यासारखा झाला होता! मोदीजींच्या संदेशानंतर प्रतिक्रिया द्यायला टीव्हीवर आले तेव्हा आम्ही बघितला त्यांचा चेहरा. तुझ्या स्वर्गात टीव्ही नसेलच आणि असला तरी जुन्या काळाचा असेल. ऍटेनावाला. एचडी चॅनेलवर आम्ही सारं स्पष्ट बघितलं! अरे! काँग्रेसवाल्यांचं सोड! त्यांनी घरात नव्हे परदेशात व्यवस्था केली आहे. मात्र, भाजपवाल्यांचं काय? एवढय़ा वर्षांच्या संघर्षानंतर केंद्रात आणि काही राज्यांत सत्ता मिळाली होती. भुकेल्याप्रमाणे पैसा खात होते. नरेंद्र मोदी यांनी त्यांनाही नाही सोडलं. 2018 मध्ये स्वीस बँकेत खातं उघडू अशी सर्वांची योजना होती. पण मोदींनी 2016 मध्येच गेम केला. किमान पुर्वसूचना तरी द्यायला हवी होती. 8 नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजता अचानक टीव्हीवर आले आणि दिली घोषणा करून. त्या रात्रीपासून कुणाच्या डोळ्याला डोळा लागला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा टीव्हीवर आले. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या या निर्णयाचे त्यांनी मनापासून स्वागत केले. पण चेहरा पडला होता. तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर टीव्हीवर बघ. लक्षात येईल तुझ्या. एचडी चॅनेलवर बघ. डोळे पाणावतील तुझे!

No comments:

Post a Comment