Total Pageviews

Sunday, 20 November 2016

नवचैतन्याचे संकेत विवेक मराठी 19-Nov-2016 मोठया मूल्यांच्या नोटा चलनातून बाद झाल्या आणि या दहशतवादी चळवळीला होणारा ऑक्सिजनचा पुरवठाच जणू थांबला. गेले 8 दिवस काश्मीरच्या खोऱ्यात दगडफेक नाही,


संपादकीय WhatsApp     गेली काही वर्षे अशांत असलेल्या काश्मीरच्या खोऱ्यात नवचैतन्याची पहाट होत असल्याचे संकेत गेल्या काही दिवसांतल्या घडामोडींवरून मिळत आहेत. अर्थात, ताबडतोब असा ठोस निष्कर्ष काढण्याची गरज नसली, तरी या सकारात्मक घडामोडींमधून प्रतीत होणारा अर्थ, बदलांच्या वाऱ्याची दिसणारी दिशा ही सुखावह आहे हे नक्की. निसर्गसौंदर्याची लयलूट असलेल्या काश्मीरवर पाकिस्तान आपल्या निर्मितीपासून डोळा ठेवून आहे. जे स्वत:चा देश सांभाळू शकले नाहीत, गेल्या 70 वर्षांत त्याला आर्थिक ओढगस्तीतून बाहेर काढू शकले नाहीत, त्यांनी कायमच काश्मीरवर डोळा ठेवला. तिथे सतत अशांतता कशी राहील याचीच सदैव काळजी घेतली. त्यातून काश्मिरी जनतेला काय मिळालं? तर दिवसरात्र वेढून राहिलेली अशांतता, त्यातून जन्मलेली आर्थिक विपन्नावस्था, शिक्षणापासून अनेकांची झालेली वंचना... भारतासारख्या विकसनशील राष्ट्राचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरच्या वाटयाला हे भोग आले ते शेजारी देशांच्या कुटिलतेमुळे. त्यात होरपळ तर झालीच, त्याचबरोबर शतकानुशतकं एकत्र राहिलेल्या काश्मिरी जनतेतही धर्माच्या नावावर उभी फूट पाडली गेली. काश्मिरी पंडितांवर तर बेघर होण्याची वेळ आली. अलीकडच्या काळातला काश्मीरचा हा अस्वस्थ करणारा इतिहास. बेरोजगारीच्या वणव्यात होरपळत असलेल्या युवकांना आपल्या जाळयात ओढायचं, अतिशय नापाक कामासाठी त्यांना जिहाद पत्करायला उद्युक्त करायचं आणि त्या मोबदल्यात भरमसाठ पैशांचं आमिष दाखवायचं... गरिबीत खंगत चाललेला, इस्लामचा अंधानुयायी याकडे आकर्षित न होता तरच नवल. यात गेल्या काही दशकांतल्या पिढयाच्या पिढया बरबाद झाल्या. हिरव्यागार निसर्गाने वेढलेलं काश्मीर हे लष्करी छावण्यांनी वेढलेलं काश्मीर होऊन गेलं. जेव्हा शत्रू आपल्यापेक्षा बलाढय असतो, त्या वेळी त्याला सामोरं जाऊन भिडण्यापेक्षा पाठीमागून कुरापती काढण्याची बहादुरी दाखवली जाते. पाकिस्तानने इतकी वर्षं हेच उद्योग आरंभले आहेत. जो स्वत:चा देश सांभाळू शकत नाही, तो भोळयाभाबडया काश्मिरी जनतेला मात्र भारतापासून अलग होण्यासाठी सतत उचकावतो आहे. सारासार विचारशक्ती क्षीण झाल्याने काश्मिरी जनता - विशेषत: युवक त्यांच्या भूलथापांना बळी पडत आहेत, हे अगदी आताआतापर्यंतचं चित्र. या चित्राचे रंग आता फिके पडत आहेत. हा सुखावणारा बदल घडायला कोणतंही एकच कारण नाही, हे नक्की. तसा कोणाचा दावाही नाही. काश्मिरी जनतेसाठी चालू असलेल्या अनेक चांगल्या कामांचा तो परिपाक आहे. सद्हेतूने काम करणाऱ्या सामाजिक संघटना, नैसर्गिक आपत्तीत दिवसरात्र मदत करणारं आणि तिथल्या दहशतवादी चळवळीचा बीमोड करण्यासाठी सज्ज असलेलं भारतीय लष्कर आणि राज्यातली बदललेली राजकीय समीकरणं या बदलांना कारणीभूत आहेत. मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर भाजपा सत्तेत सहभागी झाली, त्या वेळी विरोधकांच्या टीकेला धार चढली होती. कोणाला ही स्वार्थी तडजोड वाटली, तर हा प्रयोग पूर्णपणे फसणार असल्याचं कोणी विद्वान सांगू लागले. मात्र असं काही झालं नाही. गेले 8 महिने तरी पीडीपीबरोबर राज्यकारभार करण्यात भाजपाला बऱ्यापैकी यश मिळालं आहे. भारताचं नंदनवन दहशतवाद्यांचा अड्डा बनलं आणि तिथली जनता बटीक. सतत असुरक्षिततेच्या सावटाखाली राहायची वेळ आल्याने रोजगार आणि शिक्षण यापासून सर्वसामान्य वंचित झाले. आजवर राज्यकर्त्यांनीही त्यांची आबाळ केली. विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या प्रबोधनामुळे शिक्षण हेच आपल्या प्रगतीचं महाद्वार आहे याची जाणीव इथल्या मुलांना, त्यांच्या पालकांना झाली आणि अशांत परिस्थितीतही शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्यांचं, दहावी-बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्यांचं प्रमाण वाढलं. या वर्षी तर दहावी/बारावीला 95 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी बसले, आणि सर्व केंद्रांवर सुरळीत परीक्षा झाली या बातम्या खूपच आशादायी आहेत. निसर्ग 'देता किती घेशील दो कराने' असा भरभरून देणारा, पण त्यासाठी जी दिशा मिळेल ती शिक्षणातूनच. शिक्षणच उद्याच्या रोजगाराच्या संधींची दिशा दाखवतील. आजच्या दारिद्रयावर मात करणंही शिक्षणानेच साध्य होईल. हिज्बुल मुजाहिदीनचा तरुण कमांडर, काश्मिरी युवकांच्या गळयातला ताईत बनलेला बुऱ्हाण वणी सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत ठार झाला आणि त्याला हिरो समजणाऱ्या अनेकांचे डोळे उघडले. वणीचा मार्ग हा अंतिमत: सर्व कुटुंबीयांनाच खाईत लोटणारा मार्ग आहे आणि केंद्रात तसंच राज्यात सत्तेवर असलेलं सरकार दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलत आहे, याची पुरेपूर जाणीव अनेक काश्मिरी तरुणांना झाली आहे. दगडफेक करून अशांतता माजवणाऱ्यांची गय केली जात नाही, हे हजारोंना ताब्यात घेऊन सरकारने दाखवून दिलं आहे. उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या अवमानास्पद हल्ल्याचा भारतीय लष्कराने ज्या तडफेने बदला घेतला, त्याने 'काश्मीर हातातून गेलं' अशी कोल्हेकुई करणाऱ्यांची बोलती बंद करून टाकली आहे. हा सर्जिकल स्ट्राइक म्हणजे पाकिस्तानला त्याची जागा दाखवून देणं होतंच आणि काश्मिरी जनतेला भानावर आणणंही होतंच. आणि या सगळयावर कडी ठरला तो पंतप्रधान मोदींचा नोटा रद्दीकरणाचा निर्णय. मोठया मूल्यांच्या नोटा चलनातून बाद झाल्या आणि या दहशतवादी चळवळीला होणारा ऑक्सिजनचा पुरवठाच जणू थांबला. गेले 8 दिवस काश्मीरच्या खोऱ्यात दगडफेक नाही, त्यामागे हे महत्त्वाचं कारण आहे. अशा रितीने काश्मीरमध्ये दहशतवादाचं बस्तान बसायला, तो फोफावायला जे जे घटक कारणीभूत असतात, त्या त्या घटकांची, तिथल्या प्रादेशिक पक्षाच्या मदतीने चालू असलेली नाकाबंदी काश्मीरमध्ये नवचैतन्याची पहाट घेऊन येत आहे. तिचं स्वागत करायला हवं

No comments:

Post a Comment