ज्यांनी मोदी सत्तेवर यावेत, देशाला ‘अच्छे दिन’ यावेत म्हणून मोदी हवेत असे सांगितले ते सर्व लोक हजार-पाचशेच्या चितेवर जणू सती गेले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी एका रात्रीत हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द केल्या त्यामुळे बसलेल्या धक्क्यातून देश अद्यापि सावरलेला दिसत नाही. इंदिरा गांधी यांनी एका रात्रीत बँकांचे राष्ट्रीयीकरण केले तेव्हा जितकी खळबळ माजली नाही त्यापेक्षा जास्त खळबळ मोदी यांच्या निर्णयाने माजली आहे. पाचशे व हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यास भ्रष्ट पैसा बाहेर येईल. व्यवहारात पारदर्शकता येईल, करबुडव्यांना वेसण बसेल, असे पंतप्रधानांना वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा द्याव्या लागतील. भ्रष्टाचार हा हजार-पाचशेच्या नोटांत नसून यंत्रणेत, निवडणूक पद्धतीत व माणसाच्या मनात आहे. ५००-१००० च्या नोटा आज बाद केल्या, पण चलनातून १०० च्या, ५० च्या नोटा सरकारी निर्णयाशिवाय आधीच बाद झाल्याच होत्या व आता अंबानीपासून अदानीपर्यंत व टाटांपासून बिर्लांपर्यंत सगळेजण शंभर रुपयांच्या नोटांसाठी हात पसरत आहेत असे चित्र निर्माण झाले आहे! मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करावेच लागेल. कारण हा निर्णय जनतेच्या व राष्ट्रीय हितासाठी घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले व देशाची जनता राष्ट्रभक्त आहे. चिल्लर एका रात्रीत हिंदुस्थानच्या बंद्या रुपयाची चिल्लर झाली. सामान्य शेतकरी व मजूरवर्गही खिशात हजार-पाचशेची श्रीमंती घेऊन फिरत होता तो पुन्हा शंभराच्या नोटेसाठी धावाधाव करू लागला. गेल्या चार दिवसांपासून बाजार, दुकाने, हॉटेल्समध्ये ‘सामसूम’ अशी की जणू आर्थिक आणीबाणीच लागल्याचे चित्र दिसत आहे. हे चित्र हळूहळू बदलेल असे भविष्य दाखवले जात आहे. ‘१०००-५००’च्या नोटांची बंडले ही ज्यांना राजकीय ताकद व श्रीमंती वाटत होती त्यांचा एका रात्रीत कचरा झाला हे मान्य करायला हवे. ‘‘ज्यांना आज शांतपणे झोप लागेल तेच खरे श्रीमंत’’ असे मॅसेज त्या रात्री सोशल मीडियावर फिरू लागले. पण हे श्रीमंत कोण? तर ज्यांनी नरेंद्र मोदी यांना सत्तेवर आणण्यासाठी सगळ्यात जास्त हात सैल सोडला व थैल्या मोकळ्या सोडल्या त्यांचीच झोप मोदी यांनी उडवली व ते एका अर्थाने बरे झाले. पैशांचे राजकारण करणार्या व्यापारी वृत्तीच्या लोकांचे कंबरडे शेवटी मोदी यांनी मोडले. मोदी हे नेहमी म्हणत की, मी गुजरातच्या भूमीतून आलो आहे. त्यामुळे माझ्या रक्तात व्यापार आहे. मोदी यांच्या निर्णयाने व्यापार कोलमडला. व्यापारी हवालदिल झाले. तरी एक विशिष्ट वर्ग आज तरी खुशीत आहे. मोदी यांच्या निर्णयाची आज चेष्टा होत आहे. पण शेवटी देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. निवडणुकांचे काय? विदेशी बँकांत ‘हिंदुस्थानी’ श्रीमंतांचा काळा पैसा पडला आहे. तो सर्व पैसा सत्तेवर येताच परत आणू, ही निवडणुकीतली घोषणा होती. विदेशातील काळा पैसा इतका प्रचंड आहे की हा पैसा परत आला तर प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख जमा होतील, असे जोरदार स्वप्न तेव्हा दाखवले, त्याचे पुढे काय झाले? पण काळा पैसा परदेशातून आलाच नाही व तो राजकीय टीकेचा विषय झाला. निवडणूक हीच भ्रष्टाचाराची व काळ्या पैशाची गंगोत्री आहे व सर्वच सत्ताधारी निवडणुकीत पैशाचा धूर सोडतात. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत चार्टर विमाने भरून कसा पैसा आला ते पाहिले आहे. कारण सत्तेतून पैसा, पैशातून पुन: पुन्हा सत्ता हीच आपली लोकशाही आहे. निवडणुकीत गांधीबाबा चालतो. तो चालवला जातो. मतदारांना विकत घेण्यासाठी कधी शंभर रुपये, नंतर पाचशे, हजार रुपयांच्या नोटा वापरल्या गेल्या. आता २००० रुपयांच्या नव्या नोटा येत आहेत. उत्तर प्रदेश-पंजाबच्या निवडणुकीत २००० रुपयांच्या नोटा ‘प्रयोग’ म्हणून वापरल्या जाऊ नयेत. तसे झाले तर पंतप्रधानांच्या चांगल्या निर्णयाचे हसे होईल व भ्रष्टाचाराची पत वाढली असे बोलले जाईल. ते सर्व टाळायला हवे! विनोदच विनोद प्रथमच असे घडले आहे की, ज्याच्याजवळ पैसे आहेत ते रडत आहेत. ज्याच्याजवळ नाहीत ते आनंदाने हसत आहेत. हे सर्व हजार-पाचशेच्या नोटा रद्द केल्याने घडले असले तरी ही स्थिती किती काळ राहणार! या सर्व निर्णयांची सोशल मीडियावर कशी ‘मजा’ केली तो सवर्र् प्रकार ‘मनोरंजन’ करणारा आहे. – पुण्यातील एका मंदिरातील पाटी : दानपेटीत पाचशे-हजाराच्या नोटा टाकू नयेत. देवाचा कोप होईल! – ‘मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बॅलेंस है, तुम्हारे पास क्या है?’ ‘मेरे पास १००, ५०, २० और १० के नोट है.’ ‘भावा, माझं चुकलं. जरा मला पण चिल्लर दे की!’ – ‘इसिलिये बोला था, चाय वाले को प्रधानमंत्री मत बनाओ. ५, १० रुपये के नोट के अलावा और कुछ समझ मे नही आता उसको.’ – राहुल गांधी - See more at: http://www.saamana.com/utsav/rokhthok-ani-shrimantancha-kachra-zala#sthash.4Op0rc4F.dpuf
No comments:
Post a Comment