| Publish Date: Nov 12 2016 5:26PM | Updated Date: Nov 12 2016 5:26PM
ही अॅप्स, प्रत्येकाकडे असावीत!
प्रदीपकुमार माने
मोबाईल अॅप्स ही एका दृष्टीने आजच्या काळात आपल्याला अडीनडीला मदत करणारी साधने बनली आहेत. आपल्याला कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल, तेव्हा आपण गुगल किंवा विकिपिडियाकडे वळतो. त्याप्रमाणेच कोणत्याही व्यवहारोपयोगी कौशल्यासाठी आपण अॅपकडे वळतो. याचा फायदा असा आहे की, ठराविक विषयाच्या अनुषंगाने माहिती मिळविण्यासाठी किंवा आवश्यक ती कृती करण्यासाठी मदत मिळते. या अॅप्समधील काही अॅप्स तर इतकी महत्त्वपूर्ण असतात की, दैनंदिन जीवनात त्याची गरज पडतेच. या अशा प्रत्येकाकडे असाव्यात अशा अॅपना आज आपण जाणून घेणार आहोत.
1) एम्प्लॉयमेंट न्यूज इन इंडिया (Employment news in India)
हे, या नावाचे भारत सरकारचे रोजगारविषयक माहिती देणारे साप्ताहिक आहे याची आपणा सर्वांना कल्पना आहेच. या साप्ताहिकाच्या आधारेच भारत सरकारने हे अॅप बनविले आहे. या अॅपमध्ये साप्ताहिकाप्रमाणे भारतभर असणार्या विविध रोजगाराच्या संधीची माहिती मिळते. भारत सरकार, राज्य सरकार आणि विविध शासकीय आणि निमशासकीय संस्थांच्या रोजगारविषयक संधी एका ठिकाणी मिळणे ही दुर्मीळ गोष्ट आहे; पण या अॅपमुळे ही गोष्ट आपणास शक्य होते. विविध पद्धतीच्या कॅटेगरीतून आपणास ही माहिती मिळू शकते. या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या आवडीच्या क्षेत्रांची माहिती नोंद केल्यानंतर ती प्रत्येकवेळी अपडेटेड स्वरूपात आपल्या ई-मेलवर आणि मोबाईलवर मिळत राहते. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि आवड क्षेत्रानुसार ही माहिती आपणाला मिळत राहते.
2) जस्ट डायल (Just dial)
आजच्या काळी उपलब्ध असणार्या अॅपमधील प्रत्येक माणसाला उपयोगी पडणारे असे हे अॅप आहे. इतकंच नव्हे, तर हे अॅप प्रत्येकाकडे संग्रही असायलाच पाहिजे. याचं कारण म्हणजे हे अॅप देत असलेली माहिती. या अॅपमध्ये विविध संस्था, कंपन्या, व्यक्ती यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आणि त्यांचे पत्ते दिलेले असतात. हे क्षणार्धातच आपणाला मिळू शकतात. एखादी सेवा शोधायची असो किंवा आपण राहतो त्या ठिकाणाजवळचा पत्ता या अॅपमुळे तो शोधणे लगेचच शक्य होते. जसं की, आपणाला एखाद्या कंपनीची हार्डडिस्क विकत घ्यावयाची असेल, तर आपण लगेचच त्या कंपनीचे नाव त्या अॅपमध्ये शोधायला टाकायचे. येणार्या रिझल्टमधील आपल्या जवळचा किंवा आपल्याला साजेसा असा पत्ता आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळतो. अशाप्रकारे क्षणर्धातच माहिती मिळत असल्याने आपला वेळ आणि ऊर्जा दोन्हीही वाचते. जस्ट डायल हे अॅप प्रत्येकाने संग्रही ठेवलेच पाहिजे, असे अॅप आहे.
3) आय.आर.सी.टी.सी. कनेक्ट (IRCTC Connect)
भारतीय रेल्वचे प्रवासविषयी माहिती देणारे, रिझर्वेशन करणे आणि ते कॅन्सल करणे या गोष्टींसाठी वापर करावयाचे अधिकृत असे अॅप आहे. आय.आर.सी.टी.सी. या भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटचे हे अॅप म्हणजे मोबाईल रूप आहे. या अॅपमध्ये नियमित ट्रेनच्या प्रवासाची माहिती, तिचे बुकिंग, याबरोबर नियमित स्वरूपाचे रेग्युलर जर्नी अॅलर्टस्ही दिले जातात. या अॅपमध्ये नियमित स्वरूपाचे रेग्युलर जर्नी अॅलर्टस्ही दिले जातात, या अॅपमध्ये पॅसेंजरची माहिती सेव्ह होत असल्यामुळे प्रत्येकवेळी बुकिंग करताना ती प्रत्येकवेळी भरायची गरज लागत नाही.
4) इनक्रेडिबल इंडिया (Incredible India)
ङ्गइनक्रेडिबल इंडियाफ हे भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचा पर्यटनविषयक प्रोत्साहन देणारा प्रकल्प आहे. याची अॅड विविध ठिकाणी आपण पाहत असतो. पर्यटन सेवा आणि पर्यटनस्थळे यांची माहिती देणारे हे अॅप आहे. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे, प्रत्येक भारतीयाबरोबर विदेशी पर्यटकांनीही आपल्याबरोबर ठेवले पाहिजे, असे हे अॅप आहे. वापरकर्त्याच्या लोकेशनचा संदर्भ घेऊन हे अॅप जवळचे टूर ऑपरेटर्स, टुरिस्ट गाईडस्, हॉटेल आणि पर्यटन सेवा यांची माहिती देते. या सर्व सुविधांबरोबर ठराविक ठिकाण आणि त्याच्या आसपासच्या ठिकाणातील ङ्गबेस्ट स्पॉटस्फ सांगण्याबाबतही हे अॅप मार्गदर्शन करते.
4) कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया (Constitution of India)
आपण भारतीय नागरिक आहोत; पण फारच कमीजणांना राज्यघटना माहीत असते. असे जरी असले तरी दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणी घटनेतील कितीतरी तत्त्वांचा परिचय आपणाला होत असतो. वर्तमानपत्रे, दूरदर्शनवर कितीतरी चर्चांमध्ये या तत्त्वांवर चर्चा होत असते; पण आपणाला ती तत्त्वे जाणून घ्यावीत, असे मनात येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे, ती जाणून घेण्यासाठी आपल्याकडे साधनेही नसतात आणि राज्यघटनेसंबंधी असणार्या बाबी किचकट असतात हा एक दुसरा समज. या दोन्हीही बाबींना या अॅपने फाटा दिलेला आहे. घटनेतील तत्त्वे, तिचे नियम आणि त्यासंबंधित असणारी माहिती अत्यंत सुलभरीत्या आणि युजरफ्रेंडली पद्धतीने या अॅपमध्ये दिली गेली आहे. त्यामुळे हे अॅप हाताळायला अत्यंत सोपे आहे. या अॅपमध्ये भारताची संपूर्ण राज्यघटना कव्हर केलेली आहे. त्यामुळे तिचा समग्ररीत्या परिचय आपणाला होऊ शकतो.
5) होम रेमेडिज + नॅचरल क्युअर्स (Home Remedies + Natural Cures)
ङ्गआजीबाईचा बटवाफ ही गोष्ट आपणा सर्वांना परिचयाची आहे. या आजीबाईच्या बटव्यामध्ये अशा कितीतरी घरगुती गोष्टी असतात जिचा वापर करून दैनंदिन जीवनातील गोष्टींचा इलाज करू शकतो. कित्येक प्रथमोपचार तत्त्वे, कित्येक रोगांचे घरगुती इलाज, आयुर्वेदिक वस्तूंचे गुण आणि उपचार या गोष्टींचा या बटव्यात समावेश असतो. या आजीबाईच्या बटव्याचे मोबाईल अॅप रूप म्हणजे हे अॅप होय. यामध्ये विविध रोगांवरील उपचार दिलेले आहेत. या अॅपमध्ये आपल्याला हवी असणारी गोष्ट नसेल तर आपण त्यासंबंधी प्रश्न विचारू शकतो ज्याचे उतर आपणाला मिळते. इतर लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहता येत असल्याने त्यातूनही आपणास मार्गदर्शन मिळू शकते
No comments:
Post a Comment