Nov 09, 2016,
शेतकऱ्यांच्या शेतमालाची शेअर मार्केट, निफ्टीच्या कार्यप्रणालीनुसार ऑनलाइन खरेदी-विक्री सुरू
अमरावती - विविध कंपन्यांचे समभाग खरेदी विक्री करण्याकरता देशांतर्गत असलेल्या ‘शेअर मार्केट’ आणि ‘निफ्टी’च्या कार्यप्रणालीनुसार आता शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी विक्री करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ज्या प्रमाणे शेअरची ऑनलाइन खरेदी-विक्री होते, त्या धर्तीवर शेतमालाचे व्यवहार करणे आता शक्य झाले आहे. जागतिक बँकेच्या साहाय्याने महाराष्ट्र कृषी विकास स्पर्धाक्षम प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील हिंगणघाट (वर्धा), धामणगाव (अमरावती), अकोट (अकोला), चिखली (बुलडाणा) आणि राहाता (अहमदनगर) या पाच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई-ट्रेडिंगचे व्यवहार सुरू झाले आहे. राष्ट्रीय कृषी विकास प्रकल्पा अंतर्गत पात्र असलेल्या आणखी ३० बाजार समित्यांमध्ये अशाच पद्धतीने ई-ट्रेडिंग सुरू होणार आहे. या पाच बाजार समित्यांमधील शेतमालाची खरेदी विक्री सध्या ऑनलाइन पद्धतीने झाली असून व्यवहारसुद्धा सुरू करण्यात आले आहे. तेथील व्यापारी आणि शेतकऱ्यांचा ई -ट्रेेडिंगला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तुकाराम चांभारे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. बाजार समित्यांमधील गैरव्यवहार रोकणे, शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून होणारी फसवणूक टाळणे आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला देशांतर्गत मागणी उपलब्ध करून आर्थिक लाभ मिळवून देणे याकरिता हे ई-ट्रेडिंग सुरू झाले आहे.
पुढचा टप्पा असा असेल
राज्यातील हिंगणघाट(वर्धा), धामणगाव (अमरावती), अकोट(अकोला), चिखली(बुलडाणा) आणि राहाता (अहमदनगर) या पाच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन पद्धतीने ई-ट्रेडिंग सुरू झाले आहे. राष्ट्रीय कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत राज्यात आणखी ३० बाजार समित्यांमध्ये याच पद्धतीने ई ट्रेडिंग सुरू होणार आहे.
ई-ट्रेडिंगमुळे अशी आली पारदर्शकता-हे झाले बदल
-संगणकावर नोंद झालेल्या शेतमालाची, तारीखनिहाय, शेतमालनिहाय, वजननिहाय आवक-जावकची नोंद
- ऑनलाइन नोंदणीमुळे बाजार समितीमधील नोंदवहीत हस्तलिखित नोंदी बंद झाल्या.
- हस्तलिखित नोंदीमध्ये फेरफार करण्यात येत होता. ऑनलाइन मध्ये बदल करता येत नाही.
- कर चोरी करण्याकरता सोयाबीनची खरेदी करायची आणि मूग खरेदी केला म्हणून दाखवायचे असे प्रकार घडायचे. ऑनलाईन मुळे हे बंद झाले.
- १००० किलो ची खरेदी केल्यानंतर १०० किलोची नोंद केल्या जात होती. ईृ-ट्रेडिंगमध्ये अशा व्यवहारांना वाव नाही.
- देशभरातील बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणे बंद झाले.
पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष
शेतमालाच्या ई-ट्रेडिंग व्यवस्थापनावर थेट पंतप्रधान यांच्या नवि दिल्ली येथील कार्यालयातून नियंत्रण ठेवल्या जात आहे. देशभरातील १०० बाजार समित्यामध्ये सध्या अशा पध्दतीने व्यवहार सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य दर मिळावा याकरिता पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
-किरण गित्ते , जिल्हाधिकारी अमरावती
व्यवहारामध्ये पारदर्शकता आली
या ई-ट्रेडिंगमुळे शेतमालाच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आली. कोणताही व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करू शकत नाही. देशपातळीवर सुरू असलेला शेतमालाचा योग्य दर शेतकऱ्यांना मिळतो.शेतकरी समाधानी आहेत.
-तुकाराम चांभारे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट
ई-ट्रेडिंगसाठी स्पेशल टीम
-व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे योजनेअंतर्गत आलेले संगणक साहित्य, डिस्प्ले बोर्ड, हार्डवेअर बाजार समितीत धुळखात पडले होते. आता ऑनलाईन व्यवहार सुरळीत सुरू आहेत. ईृ-ट्रेडींग करीता बाजार समितीत चौघांची स्पेशल टीम कार्यरत आहे.
-मोहन इंगळे, सभापती, बाजार समिती, धामणगाव
ऑनलाइन व्यवहाराकरिता ई-ट्रेडिंगमधील दैनंदिनी
१ बाजार समितीमध्ये येणाऱ्या सर्व शेतमालाची प्रवेशद्वारावरच नोंदणी केली जाते.
२ शेतकऱ्याचे नाव, शेतमालाचा प्रकार, अंदाजे वजन याची नोंद संगणकीय होते.
३ शेतमालाची अ, ब व क अशी श्रेणी केल्या जाते.
४ दिवसभरात किती शेतकऱ्यांच्या किती मालाची आवक झाली याची माहिती ऑनलाइन डिस्प्ले बोर्डवर दिसते.
५ शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना व्यवहाराकरिता इलेक्ट्रॉनिक्स आयडी दिले जातात.
६ लिलाव सभागृहात सर्व संबंधित व्यापाऱ्यांची बोली ‘टॅब’वर नोंदविली जाते.
७ नोंदणीकृत व्यापारी किंवा दलाल यांना ईृ-ट्रेडिंग चमू मार्फत ‘टॅब’ दिला जातो.
८ व्यापारी आणि दलाल संबंधित शेतमालाची बोली टॅबद्वारे नोंदवितो
९ ही नोंद मोठ्या स्क्रिनवर सर्व शेतकऱ्यांना दिसते.
१० व्यापाऱ्यांनी नोंदवलेली प्रस्तावित खरेदी रकमेचा आकडा सर्व व्यापारी बघू शकतात. (लिंक अप झालेल्या बाजार समित्यासुद्धा)
११ अन्य व्यापाऱ्याला वाटले की जादा दर द्यावा तर तोही टॅबवरून खरेदीची प्रस्तावित रक्कम नोंदवितो.
१२ त्यानंतर सदरचा शेतमाल ई टेंडरिंग पद्धतीने व्यापारामार्फत खरेदी केला जातो.
१३ श्रेणीनिहाय मालाचा लिलाव करण्यासाठी व्यापाऱ्यांना २० ते २५ मिनिटांचा अवधी दिला जातो. या वेळेतच व्यापाऱ्यांनी शेतमालाचा भाव नोंदवावा लागतो.
१४ ही प्रकिया संपल्यानंतर शेतकऱ्याच्या मालाचे नाव, वजन त्यांना देण्यात येणारी रक्कम याची संगणकीय नोंद केल्या जाते.
१५ ठरलेल्या व्यवहाराचे संगणकीय बिलिंग होते
१६ व्यापाऱ्यामार्फत शेतमाल बाहेर घेऊन जाताना पुन्हा संगणकीय नोंद केली जाते.
No comments:
Post a Comment