Total Pageviews

Tuesday, 1 November 2016

भारताचा नकाशा मंदिरापेक्षा कमी पवित्र आहे काय?आता नागरिकांनीच जागरूक होऊन भारताच्या नकाशाचे पावित्र्य जोपासण्याची आणि यासंदर्भात कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे


November 2, 2016015 काही दिवसांपूर्वी ज्या दिवशी ब्रिक्स शिखर परिषदेचा प्रारंभ होणार होता, अगदी त्याच दिवशी दिल्लीच्या एका ख्यातनाम इंग्रजी दैनिकाने चीनचे दैनिक वर्तमानपत्र ‘डेली चायना’ची एक जाहिरात (परिशिष्ट) छापली, ज्यात भारताचा नकाशा चुकीचा होता. म्हणजे त्यात काश्मीर पाकिस्तानात दाखविण्यात आले होते आणि अरुणाचल प्रदेश चीनचा भाग दाखविण्यात आला होता. सकाळी सकाळी ही असली जाहिरात पाहून तीव्र संताप आला आणि मी काही काळ वाट पाहिली. कदाचित कुठून तरी प्रतिक्रिया येईल आणि या गंभीर चुकीविषयी कुणीतरी आवाज उठवेल. मात्र, कुठलीही प्रतिक्रिया न आल्याने असे वाटले की सर्वांनी एकतर या जाहिरातीकडे लक्ष दिले नाही अथवा चूक लक्षात आल्यावरही हा विचार केला की आम्ही याविषयी काय करू शकतो? मी माझ्याकडून प्रयत्न केले आणि गृहमंत्री राजनाथसिंह आणि माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या लक्षात ही बाब आणून दिली आणि सोशल मीडियात या विषयावर अभियान चालविले. तसेच दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त मुकेशकुमार मीना यांच्याकडे या संदर्भात औपचारिक तक्रारही नोंदविली. व्यंकय्या नायडू यांनी यावर त्वरित कार्यवाही करून माहिती व प्रसारण सचिवांकडे माझी तक्रार पाठविली आणि त्यावर शासकीय कार्यवाही होईल, असा मला विश्‍वास आहे. मात्र, सोशल मीडियावर अभियान चालविण्याचा एक परिणाम असा झाला की दुसर्‍याच दिवशी त्या वर्तमानपत्राला पहिल्या पानावर असा खुलासा करावा लागला की जो नकाशा प्रकाशित करण्यात आला आहे त्याच्याशी या वर्तमानपत्राचा काहीही संबंध नाही आणि तसा नकाशा प्रकाशित केल्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. कुणी भारताचा नकाशा चुकीचा छापतो आणि भारताच्या सीमांशी छेडछाड करून आमचा भूभाग विदेशात असल्याचे दाखवितो आणि तरीही आम्हाला संताप का येत नाही? पोलिस अथवा शासन-प्रशासनाची कुठलीही संबंधित शाखा अथवा नेता, मग तो कुठल्याही पक्षाचा असो यावर स्वत:हून पुढाकार घेऊन काही करत का नाही? भारताचा नकाशा चुकीचा प्रकाशित करणे आणि भारताच्या सीमेवर झालेला दहशतवादी हल्ला, सारखाच गंभीर गुन्हा नाही काय? कल्पना करा कुणी आमचे कुराण, बायबल, गीता अथवा श्री गुरू ग्रंथसाहिब या धार्मिक ग्रंथाचे एखादे पान चुकीचे प्रकाशित केले अथवा त्याच्या मूळ तत्त्वाशी छेडछाड केली, अथवा अपमान केला तर त्याचा काय परिणाम झाला असता? दंगली भडकतात, संपत्तीचे प्रचंड नुकसान करण्यात येते, लोक मारले जातात, स्थितीवर नियंत्रण आणणे सरकारपुढे मोठेच आव्हान होऊन बसते. ही तर त्या धार्मिक ग्रंथांची स्थिती आहे जे आमचे मन आणि धर्माला प्रभावित करतात. पण, त्या महान भारत देशाच्या नकाशाचा अपमान झाला आहे असे कुणाला वाटतच नाही. उलट अशासारखी प्रकरणे सहजपणे घेऊन गुंडाळण्याचेच प्रयत्न केले जातात, जणू काहीही गंभीर घडलेलेच नाही. गेल्या वर्षी मी जागतिक बँकेच्या संसदीय मंडळाच्या एका बैठकीसाठी वॉशिंग्टनला गेलो होतो. तेथे जगाची आर्थिक परिस्थिती दर्शविण्यासाठी जागतिक बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञांचे (जे मूळ भारतीय वंशाचेच होते) एक भाषण आमच्या सत्रात झाले. आपल्या भाषणात विविध देशांतील आर्थिक परिस्थिती दाखवत ते भारताच्या स्थितीवर टिप्पणी करू लागले आणि समोर भारताचा नकाशा दाखविला. त्यात काश्मीरचा प्रदेश पाकिस्तानात दाखविण्यात आला होता आणि भारत खंडित, तुकड्यातुकड्यात दिसत होता. जगातील विविध देशातील जवळजवळ १५२ खासदार तेथे उपस्थित होते. मला ही गोष्ट मुळीच सहन झाली नाही. मी ते भाषण मध्येच थांबवून तीव्र विरोध दर्शविला. भारतीय खासदारांसमोर आपण भारताचा चुकीचा नकाशा दाखविण्याचा असभ्यपणा कसा दाखवू शकता? भाषण देणारे ते अर्थतज्ज्ञ एकदम गडबडून गेले. मी त्यांना म्हटले, ‘आपण मूळ भारतीय वंशाचे असूनही आणि भारताचा योग्य नकाशा कोणता हे आपल्याला माहीत असूनही आपण असा चुकीचा नकाशा दाखविता ही लज्जास्पद बाब आहे. आपण असा चुकीचा नकाशा दाखवूच कसा शकता? कदाचित जागतिक बँकेत कधीच भारताच्या चुकीच्या नकाशाबद्दल कुणी आक्षेप घेतला नसावा?’ त्या अर्थतज्ज्ञाने खेद व्यक्त करून आपली स्लाईड पुढे सरकवून प्रस्तुतीकरण जारी ठेवले. जवळजवळ आठ महिन्यांपूर्वी ब्रसेल्स येथे पाश्‍चिमात्य देशांची संरक्षण संघटना नाटोच्या मुख्यालयात जागतिक संरक्षण परिस्थितीवर एक बैठक आयोजित करण्यात आली होती. माझ्यासमवेत कॉंग्रेसचे एक वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्तेही होते. तेथील प्रमुख जनरलने दक्षिण आशियातील संरक्षणात्मक परिस्थिती व आव्हाने या विषयावर नाटोचा दृष्टिकोन प्रस्तुत करताना जेव्हा नकाशे दाखविले तेव्हा त्यातही भारताचा नकाशा चुकीचा होता. आणि आम्ही तेथेही आक्षेप नोंदविला. यात कॉंग्रेस नेत्याचेही पूर्ण सहकार्य मिळाले आणि जनरलला माफी मागावी लागली. आम्ही भारताच्या एक इंच सीमेवरही विदेशी अतिक्रमण सहन करू शकत नाही. जसे मंदिर, चर्च, मशीद आमच्या आस्था व श्रद्धेचे प्रतीक आहेत अगदी त्याचप्रमाणे नकाशाही आमचा मानसन्मान आणि राष्ट्रीय सीमांच्या पावित्र्याचे प्रतीक आहे. जर आमच्या आस्था व श्रद्धास्थानाला धक्का लागलेला, त्याचे पावित्र्य नष्ट झालेले आम्हाला चालत नाही, तर मग नकाशाचे पावित्र्य नष्ट झालेले आम्ही चुपचाप कसे सहन करू शकतो? शेवटी राष्ट्रीय ध्वजही कपड्याचा तुकडाच तर असतो. मात्र, त्याचा अपमान झाल्यास तुरुंगात जावे लागते, गोळ्यांच्या फैरीही झाडतात, प्राण घेतले जातात. कॅसाबलांका नामक एक प्रसिद्ध इंग्रजी कविता आहे, ज्यात १३ वर्षांचा एक मुलगा आपल्या राष्ट्राच्या ध्वजाचे रक्षण करण्यासाठी जळणार्‍या नौकेत स्वत:ला अर्पण करून आपले बलिदान देतो मात्र, पळ काढत नाही. दुर्दैवाने भारतात भारताचा राष्ट्रीय नकाशा चुकीचा छापणे अथवा त्याचा अपमान करणे जाणीवपूर्वक केलेल्या गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही. भारतीय दंड विधानात १९९९ मध्ये दुरुस्ती करून चुकीचा नकाशा छापल्यास ६ महिन्यांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली. मात्र, यात ही अट आहे की तक्रार सरकारला करावी लागेल. कुठलाही नागरिक याविरुद्ध तक्रारही नोंदवू शकत नाही. मायक्रोसॉफ्ट, गूगल तथा अन्य देशातील सॉफ्टवेअर कंपन्या उघडउघड भारताचा नकाशा चुकीचा दाखवतात, ज्याचा चुकीने अथवा अज्ञानामुळे लाखो भारतीय नागरिक उपयोग करतात आणि भारताच्या पवित्र सीमांचे उल्लंघन करतात. मी हा विषय संसदेत अनेकदा मांडला, त्यावर चर्चा घडवून आणली. चुकीचा नकाशा दर्शविल्याविषयी गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणीही केली. आता नागरिकांनीच जागरूक होऊन भारताच्या नकाशाचे पावित्र्य जोपासण्याची आणि यासंदर्भात कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे

No comments:

Post a Comment