Total Pageviews

Wednesday, 2 November 2016

घरभेद्यांच्या मुसक्या आवळा…-navshkti editorial


आपले शूर जवान देशाच्या सीमांचे संरक्षण डोळ्यात तेल घालून करीत आहेत. हे करीत असताना पाकिस्तानच्या घुसखोर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात काही जवान शहीद होत आहेत, तर काहींना दहशतवाद्यांशी लढतालढता वीरमरण येत आहे. एकूणच आपले लष्कर देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात प्राणाची बाजी लावत आहे. मात्र, आपल्यातीलच काही गद्दार किंवा काही कामचुकार, काही कर्तव्यचुकार मंडळींमुळे एखादी अप्रिय घटना घडून जाते व त्यामुळे देशाची, सुरक्षा यंत्रणांची नाचक्की होते. अशाच काही त्रुटींमुळे पठाणकोटचा हल्ला झाला व नंतर उरी येथील लष्करी मुख्यालयावर दहशतवाद्यांनी घाला घातला. या हल्ल्यांमध्ये आपले जवान हकनाक शहीद झाले. आपल्या सुरक्षा यंत्रणा, हेरगिरी पथके, यांनी थोडी जरी सतर्कता बाळगली असती तर हे दहशतवादी हल्ले झालेच नसते किंवा हल्ले करू धजणार्यांचा त्यापूर्वीच खात्मा करण्यात यश आले असते. आताही मध्यप्रदेशच्या भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून `सिमी’ या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचे आठ दहशतवादी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास निसटल्याची घटना घडली. लक्ष्मीपूजनानंतर झालेली फटाक्यांची आतषबाजी आणि गोडधोड जेवणानंतर भोपाळवासी निद्रेत असताना हे दहशतवादी निसटले. मात्र, कारागृहातून पळालेल्या या आठ दहशतवाद्यांना आठ तासांतच सोमवारी चकमकीत ठार करण्यात आल्याने पुढील फार मोठा अनर्थ टळला असेच म्हणावे लागेल. या दहशतवाद्यांनी तुरुंगातून निसटताना सुरक्षा रक्षकाची गळा चिरून हत्या केली. या दहशतवाद्यांना मध्यवर्ती कारागृहाच्या `बी’ ब्लॉकमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांनी पळून जाण्यासाठी चादरींचा दोरीसारखा उपयोग करत कारागृहाची भिंत ओलांडल्याचे स्पष्ट झाले आहे. या सार्यांना `बी’ ब्लॉकमध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले होते. मात्र रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दहशतवाद्यांनी बराक तोडल्यानंतर मुख्य सुरक्षारक्षक रामाशंकर याची गळा चिरून हत्या केली. स्टिलच्या जेवणाच्या प्लेटने त्यांनी रामाशंकर यांचा गळा चिरला आणि दुसर्या एका पोलिसाचे त्यांनी हात-पाय बांधून ठेवले होते, अशी माहिती भोपाळचे डीआयजी रमण सिंह यांनी दिली आहे. मानिखेडा येथे हे दहशतवादी लपले असल्याचे पोलिसांना समजले. मनिखेडा येथे काही ग्रामस्थांनी त्यांना खडसावले असता त्यांनी ग्रामस्थांवर दगडफेक सुरू केली. ग्रामस्थांना सुरुवातीला हे लोक चोर असावेत असा संशय आला. पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता नजिकच्या गावातील डोंगराळ भागात ते दडून राहिल्याची माहिती गावकर्यांनी दिली. त्यानंतर पोलिस आणि एटीएसने 10.30 वाजता भोपाळपासून 10 किलोमीटर दूर पर्वतावर या दहशतवाद्यांना घेरले. त्यांना प्रथम शरण येण्यास सांगितल्यावर त्यांनी पोलिसांवरच गोळीबार सुरू केला. तेव्हा पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सुमारे 45 मिनिटे चाललेल्या चकमकीत सर्व दहशतवादी ठार झाले. जाकीर हुसैन, मेहबूब शेख, अमजद उर्फ पप्प्y शेख, शेख मुजीब, खालीद अहमद, अकील, अब्दुल माजिद, मोहंमद सलीक अशी त्यांची नावे असून यापैकी दोघे 2013 मध्येही कारागृहातून पळाले होते. 2013 मध्ये सिमीचे सात दहशतवादी खांडवा तुरुंगातून पळाले होते. त्या सात दहशतवाद्यांना तीन वर्षांनी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी तुरुंग अधीक्षकासह 4 जणांना निलंबित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने मध्यप्रदेश सरकारकडून अहवाल मागवला आहे. सिमीच्या या आठ दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीवरून आता निराळाच वाद रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेसने या चकमकीवर प्रश्नचिन्ह लावत घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. तर आम आदमी पक्षानेही चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी हे प्रकरण म्हणजे एक षडयंत्र असून त्याची निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे, असे म्हटले आहे. हे दहशतवादी तुरुंगातून पळाले की त्यांना कुठल्या षडयंत्रांतर्गत पळवण्यात आले, हा तपासाचा विषय असावा, असे दिग्विजयसिंग यांनी म्हटले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनीही या चकमकीवर शंका घेतली आहे. तसेच, एमआयएमचे नेता असदुद्दीन ओवैसी यांनीही, ज्युडिशियल कस्टडीत म्हणजे अंडर ट्रायल असणारे हे कैदी तुरुंगातून पळाल्यानंतर त्यांच्याकडे घडय़ाळे, जोडे, बेल्ट हे सारे आले कुठून? असा प्रश्न उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर भोपाळच्या मध्यवर्ती तुरुंगात हे एव्हढे मोठे व वेगळेच कारस्थान शिजत असताना तेथील सुरक्षायंत्रणा, तेथील गुप्तहेर किंवा तत्सम यंत्रणा काय करीत होत्या हा प्रश्नच आहे. कारण हा मोठा कट शिजत असल्याचा सुगावाच कुणाला लागू नये हे कसले द्योतक आहे? जेलमधून पळून जाण्यास यांना कोणी मदत केली याचा कसून तपास सुरू असून घरभेद्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत. या अक्षम्य हेळसांडीची चौकशी झालीच पाहिजे व सत्य लवकरात लवकर बाहेर येऊन दोषींना कठोर शासन होणे गरजेचे आहे. दीपावलीतील धामधुमीचा फायदा घेत तुरुंगातून पळून जाण्याचा कट सिमीच्या या आठ कुख्यात अतिरेक्यांनी आखला आणि त्यात ते यशस्वीही झाले ही तेथील सरकारसाठीही शरमेची बाबच म्हटली पाहिजे. उच्चस्तरीय सुरक्षाव्यवस्था असलेल्या भोपाळ मध्यवर्ती तुरुंगातून आठ अतिरेकी पळून गेल्याने तुरुंग प्रशासनाची झोपच उडाली आहे. दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत मध्य प्रदेश तुरुंग उपमहानिरीक्षक, भोपाळ मध्यवर्ती तुरुंग अधीक्षक, उपतुरुंग अधीक्षक आणि सहायक तुरुंग अधीक्षक या चार वरिष्ठ अधिकार्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. याप्रकरणी अधिकार्यांचे केवळ निलंबन करून भागणार नाही तर या घटनेच्या मुळाशी जाऊन त्याला खतपाणी घालणार्यांच्या मुसक्या आवळल्या तरच मध्यप्रदेशात गेली काही वर्षे सत्ताधारी असलेल्या शिवराजसिंह चौहान यांच्या कारभाराबाबत वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण न होता सर्वसामान्यांना त्याच्याबाबत विश्वास वाटू लागेल

No comments:

Post a Comment