अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा एक शब्द या देशात अनेक अर्थांनी स्वैराचाराचे समर्थन करण्यासाठीच वापरला गेला आहे. शब्दांचे अर्थ आपापल्या सोयीने वापरायचे तसे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अर्थ सोयीने घेत गंभीर अपराध करायचे आणि जर अडचण झाली तर अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा कांगावा करत इतका गदारोळ माजवायचा की सामान्य माणसाचाही संभ्रम व्हावा की खरोखर अभिव्यक्तीवर घाला तर नाही? ज्यांना राजकारण करायचे आहे, ज्यांना वैचारिक धुणी जिथे तिथे धुवायची सवय लागली आहे असे नतद्रष्टही ही नामी संधी आहे असे मानून अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे नाव घेत सरकारवर तोंडसुख घेणार. एनडीटीव्हीवर एका दिवसाकरिता बंदी घालताच हे सगळे पुराण गेल्या काही दिवसांत अगदी किंचाळलेल्या आवाजात चालले आहे. एनडीटीव्हीने पठाणकोट हल्ल्याच्या वेळी काय दिवे लावले होते ते लोकांसमोर न आणता फक्त ‘सरकारने त्यांच्यावर बंदी घालून अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी चालविली आहे. हे गुजरात मॉडेल आहे.’ अशी ओरड केली जात आहे.
‘आता आणिबाणीसारखी परिस्थिती आली आहे.’
‘अशा प्रकारची बंदी पहिल्यांदाच घातली जात आहे.’ अशीही ओरड केली जात आहे.
या सगळ्या गोष्टी धादांत खोट्या आहेत. केवळ सरकारशी आपले राजकीय, वैचारिक वैर साधण्यासाठी अशा प्रकारे किंचाळणे चालू आहे.
पठाणकोट येथील भारतीय एअरबेसवर अतिरेकी घुसले होते तेव्हा एनडीटीव्हीने खुबीने बातम्या प्रसारित करत असताना दहशतवाद्यांना त्यामधून माहिती मिळेल आणि भारताचे अधिकाधिक नुकसान करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने कव्हरेज केले होते. एकीकडे दहशतवादी पठाणकोट एअरबेसमध्ये घुसले होते. भारतीय सैनिक त्यांना पकडून किंवा खात्मा करून हा हल्ला नाकाम करण्याचा प्रयत्न करत होते, त्याचवेळी एनडी टीव्हीचे दिवटे या एअरबेसवर हत्यारे कुठे आहेत, स्फोटके कुठे ठेवलेली आहेत हे दाखवत होते. या ठिकाणी दहशतवादी पोहोचता कामा नयेत असे म्हणत ती ठिकाणे दाखवत होते. एमआयजी, फायटर विमाने, रॉकेट लॉन्चर, हेलिकॉप्टर, फ्युअल टँक कोठे ठेवलेला आहे याची माहिती हे सर्रास त्याच संघर्षाच्या काळात दाखवत होते. मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांचे पाकिस्तानात बसलेले मास्टर माईंड भारतीय टीव्हीचे कव्हरेच पाहून ताज आणि ओबेरॉयमध्ये घुसलेल्या दहतशवाद्यांना सूचना करत होते, ही चर्चा उघडपणे झालेली असताना एनडी टीव्हीने अशा प्रकारे पठाणकोटची अतिशय संवेदनशील माहिती उघड करणे म्हणजे दहशतवाद्यांना इथे हल्ला करा म्हणजे नुकसान जास्त होईल, असे मार्गदर्शन केल्यासारखेच होते. यांना तर दहशतवाद्यांना सहकार्य केल्याबद्दल एक दिवसाचीच नव्हे तर कायमची बंदी घातली पाहिजे. टीव्ही चॅनेल सुरू करण्याचा परवाना मागताना देशहिताच्या विरोधात कसलेही प्रसारण दाखवणार नाही, असे कबूल केलेले असते ना? मग इतक्या गंभीर प्रकारे नुकसान करणारे आणि देशाच्या शत्रूला मदत करणारे प्रसारण या टीव्हीने केले असताना त्यांच्यावर एका दिवसाची बंदी घातली तर इतका गदारोळ कशासाठी? देशहिताचा विषय सत्तारूढ पक्षाच्या हिताशी जोडत गल्लत करत बुद्धिभेद करण्यासाठी आपले सडके मेंदू या देशातील तमाम डावे आणि समाजवादी का झिजवत आहेत? राजकीय अस्तित्व संपत चाललेल्या कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि राजकीय संयम नसलेले केजरीवाल यांना तर मोदी सरकारच्या विरोधात कोणताही मुद्दा मिळाला की थयथयाट करण्याला ते तयारच आहेत.
एनडी टीव्हीने एकदा एका विषयाचा निषेध म्हणून आपले प्रसारण शहाजोगपणे काही काळ बंद केले होते. त्याची बरीच जाहिरातही केली होती. मग आता यांनी देशद्रोही चाळे केल्याबद्दल यांना एक दिवसाची प्रसारणबंदी घातली तर इतकी मिरची झोंबण्याचे कारण काय?
अभिव्यक्तिस्वातंत्र्य या विषयावर एक शब्द तरी बोलण्याचा अधिकार इंदिरा कॉंग्रेसच्या नेत्यांना आहे काय? आणिबाणीत ज्यांनी सगळ्या प्रसारमाध्यमांची गळचेपी केली होती. लोकांची तोंडे बंद केली होती. देशातील भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी या सगळ्या मुस्कटदाबीला टाळ्या वाजवत पाठिंबा दिला होता. त्यांनी देशद्रोही प्रसारणाबद्दल एक दिवसाची बंदी घातली तर इतका गदारोळ करावा? ही सगळी राजकीय बदमाशी आहे.
अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने एका दिवसाच्या बंदीचे निमित्त करून उलटे हात तोंडावर घेण्याचा जो सपाटा या लोकांनी लावला आहे त्यांची तरी लायकी काय आहे? यांनीच अटलजी पंतप्रधान असताना अटलजी आणि मुशर्रफ यांच्यात आग्रा शिखर परिषद झाली तेव्हा सगळा पाकिस्तानी मीडिया मुशर्रफ यांचेच बरोबर असे ड्रम वाजवत होता आणि भारतातील हे दिवटे अटलजी कसे चुकत आहेत याबद्दल उलट्या बोंबा मारत होते. आपले वडील पाय घसरून पडले तर कोणी मुलगा हसत नसतो. मात्र, या देशाचे राष्ट्रपती खाली पडले तर येथील मीडिया निर्लज्जपणे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा दुरुपयोग करत राष्ट्रपती खाली पडल्याची छायाचित्रे पहिल्या पानावर प्रकाशित करत होता. आपल्या देशाचा अपमान करणारे असले अभिव्यक्तिस्वातंत्र्य काय कामाचे? एक चित्रकार एम. एफ. हुसैन यांनी सरस्वतीचे नग्न चित्र काढले, मकबुलकडून एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर बलात्कार असे चित्र काढले. त्या चित्रकाराचा लोकांनी विरोध केला. तेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे असे ढोल बडविले गेले की त्यामुळे शेफारलेले हे महाशय देश सोडून निघून गेले. देशाबद्दलचे प्रेम आटून कोरडे करणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्य काय चाटायचे आहे?
एनडी टीव्हीवरील एका दिवसाच्या बंदीच्या निमित्ताने दुसरा एक खोटारडा प्रचार चालला आहे की अशा प्रकारची बंदी पहिल्यांदाच घातली गेली आहे. लोकांना भ्रमित करणारा हा प्रचार आहे. यापूर्वी डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या काळात २००५ ते २०१४ या दरम्यान युपीए सरकारने तब्बल २१ वेळा वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या प्रसारणावरबंदी घातली होती. हे अभिव्यक्तिस्वातंत्र्याची ओरड करणारे तेव्हा तोंडाला सेक्युलर कुलूप लावून गप्प बसले होते. अगदी दोन महिने प्रसारण बंद करण्याचेही आदेश त्यावेळच्या सरकारने दिले होते, तर ती अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी नव्हती. मात्र, आता एक दिवस तेही देशविरोधी प्रसारण केल्याबद्दल बंदी घातली की इतकी ओरड कशाकरिता? युपीए सरकारच्या काळात जी बंदी घातली गेली त्यातील १३ वेळा फक्त प्रौढांसाठी असे अश्ली?ल चित्रपट दाखविल्याबद्दल घातली गेली होती. स्टिंग ऑपरेशन दाखविल्यामुळे एका चॅनलला तब्बल तीस दिवस बंदी घातली गेली होती. त्यावेळी अभिव्यक्तिस्वातंत्र्य कुठे चरायला गेले होते माहीत नाही. आता या सर्व बंदीपेक्षाही भयंकर आणि गंभीर गुन्हा देशहिताशी खेळ केल्याचा असताना एक दिवसाची बंदी घातली तर इतका गदारोळ मुद्दाम माजवला जात आहे. एक पत्रकार अनुराग मुसकान यांनी एनडी टीव्हीचे समर्थन करण्याची फॅशन असल्यासारखे जे अनेकजण डोळे झाकून पुढे आले त्यांच्यावर टीका करताना फेसबुकवर लिहिले आहे की, ‘जेवढे लोक एनडी टीव्हीला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले त्यांनी जरी हा टीव्ही पाहिला तरी एनडी टीव्हीचा टीआरपी पहिल्या नंबरवर जाईल.’ पत्रकार यशवंत देशमुख म्हणतात की, ‘या बंदीमुळे हे सुमार चॅनल शहीद होण्याला सरकारचाच हातभार लागण्याची शक्यता आहे.’
एनडी टीव्हीवर एका दिवसाच्या प्रसारणावर बंदी हा अन्याय आहे, असे जर कोणाला वाटत असेल तर केवळ ओरड करून सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा या लोकांनी सरळ न्यायालयात दाद मागावी. तसे केले तर एनडी टीव्हीने पठाणकोटचे कव्हरेज करताना काय दिवे लावले ते न्यायालयासमोर आणि सगळ्या जनतेसमोर येईल. मात्र, ही पोल न खोलू देता त्यांना केवळ सरकारला बदनाम करायचे आहे. सर जडेजा नावाचे गृहस्थ फेसबुकवर लिहितात की, ‘प्रिय रविशकुमार, तुम्हाला जर असे वाटत असेल की एनडी टीव्हीवरील बंदी चुकीची आहे तर तुम्ही तथ्याचा आधार घेऊन न्यायालयात जा. सहानुभूती मिळविण्यासाठी विनाकारण या बंदीला अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील हल्ला असे भासवण्याचा प्रयत्न करू नका.’ अभिषेक रंजन नावाच्या सोशल मीडिया कार्यकर्त्याने फेसबुकवर लिहिले आहे की, जर एनडी टीव्हीचे समर्थन करणारे कोर्टात गेले तर तेथे उघडे पडतील. त्यामुळे हे न्यायालयात जाणार नाहीत. लगाम नसलेल्या मोकळ्या घोड्यासारखे हे अजून किती लोकशाही आणि देशाची सुरक्षा यांना लाथाडत राहाणार?
रंजन यांनी विचारलेल्या या प्रश्नालचे उत्तर या सगळ्या गदारोळाला बळी न पडता देशहिताच्या बाजूने ठामपणे उभे राहात देशातील जनतेनेच दिले पाहिजे!
No comments:
Post a Comment