त्यांनी रचिली शौर्याची गाथा- दिगंबर शं. पांडे-October 17, 2016
मानवता, माणुसकीला कलंकित करणार्यार पाकधार्जिण्या अतिरेक्यांच्या/ दहशतवाद्यांच्या काश्मीरमधील उरी येथील भारतीय लष्करावरील भ्याड हल्ल्याचे पडसाद संपूर्ण भारतात तीव्रतेने उमटले. २० जवानांच्या नाहक वीरगतीमुळे देशवासीयांची मने हेलावलीत. सर्वत्र संतापाचा डोंब उसळला. अजून किती सोसावे. शहीदांचे बलिदान व्यर्थ न जावे यासाठी जशास तसे उत्तर देण्याची मागणी देशाच्या कानाकोपर्याातून करण्यात आली. पाकव्याप्त प्रदेशातून भारतावर दहशतवाद्यांकडून सातत्याने होत असलेले प्राणघातक हल्ले, युद्धविराम व नियंत्रण रेषेसंबंधातील सर्व संकेत धाब्यावर बसवून पाक सैन्याकडून होत असलेला गोळीबार, आक्रमण निश्चियतच चिंतेचा, चिंतनाचा, आत्मसंरक्षणाचा आणि सुरक्षिततेचा गंभीर आव्हानात्मक यक्षप्रश्नय भारत सरकारपुढे उभा ठाकला. सबुरची, सलोख्याची भाषा, भूमिका समजण्याइतपत पाक प्रगल्भ नाही. मैत्रीचे मूलभूत, पायाभूत संकेत समजण्यास व उमजण्यास पाक असमर्थ आहे याची जाणीव उशिरा का होईना भारत सरकारला झाली. असमंजस पाकशी मैत्रीची संकल्पना भारतासाठी आत्मघाती सिद्ध होत असल्याचा प्रत्यय आला. पाकच्या घातपाती कृत्याचा कडवा प्रतिकार करून पाकला जबर जरब बसविण्याशिवाय दुसरा विकल्प नाही, याची जाण भारत सरकारला झाली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकची कोंडी करण्याचा प्रतिशोध भारताने घेतला आणि त्यात काही अंशी यशही प्राप्त झाले. २० जवानांचा अकाल मृत्यू भारत सरकारच्या इतका उरी, जिव्हारी लागला की, पाकला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देऊन शहीद जवानांना खर्या अर्थाने श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी, संतप्त जनभावनांना प्रतिसाद देण्यासाठी भारत सरकारने मनोबल एकवटले. अत्यंत गनिमी काव्याने, योजनाबद्ध पद्धतीने, गोपनीयता ठेवून साहसाने, खंबीर नेतृत्वाने पाक सीमेत ३० कि. मी. आत घुसून अतिरेक्यांची ७ प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त केलीत. ५० पेक्षा अधिक अतिरेक्यांना कंठस्नान घातले. पाकिस्तानी सैनिकांनाही यमसदनी पाठविले. याची कबुली पाकिस्तानने लगोलग दुसर्या्च दिवशी दिली आहे. भारतीय सैन्याची कोणतीही प्राणहाणी न होऊ देता कामगिरी फत्ते केली व शूरवीर जवान मायदेशी सुखरूप परतले. देशाच्या दृष्टीने हा एक मोठा लष्करी, राजकीय, राजनैतिक व सामाजिक विजय होता. भारत सरकार व पंतप्रधान मोदींच्या खंबीर नेतृत्वाला एक नवीन उभारी देणारी ही घटना होती. याहीपेक्षा उरीच्या जवानांच्या दृष्टीने त्याला असामान्य महत्त्व होते. कारण या सर्जिकल स्ट्राईकमुळे जवानांना त्यांचा हरविलेला आत्मविश्वापस, मनोबल व मनोधैर्य परत मिळविता आले. सैन्यात सर्वात जास्त महत्त्व सैनिकांच्या मनोबलाला, धैर्याला दिले जाते. हत्यारे अथवा शस्त्रे लढाई जिंकत नाहीत. लढाई जिंकतात ते हत्यार चालविणारे जांबाज, शूरवीर, समर्पित सैनिक. त्यांच्या आत्मबल, मनोधैर्य, राष्ट्रप्रेम, कर्तव्यदक्षता, चिकाटी आणि देशाप्रति प्रसंगी बलिदान देण्याच्या दृढ संकल्पामुळेच भारत देश व भारतीय आज सुरक्षित आहेत. संपूर्ण देशात या प्रतिहल्ल्यामुळे भारताची आत्मप्रतिष्ठा, अस्मिता जोपासल्या गेली. जशास तसे उत्तर देण्याचे समाधान भारतीयांना लाभले. भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, लष्करप्रमुख व समस्त सैनिक अभिनंदनास, कौतुकास पात्र आहेत.
मुजोर पाकिस्तानने नेहमीच्या सवयीप्रमाणे हा प्रतिहल्ला नाकारला आहे. सर्जिकल हल्ले झालेच नाही असा कांगावा, दुष्प्रचार आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकने चालविला आहे. राजकारणातील विदूषक, अर्ध्या हळकुंडात पिवळा झालेला अपरिपक्व राजकारणी, दिल्लीचे मुख्यमंत्री व मोदींचे कट्टर विरोधक अरविंद केजरीवाल यांनी भारत सरकारची व मोदीची एकीकडे प्रशंसा केली, पण पाकच्या खोटेपणाचा आधार घेऊन राजकीय विरोधासाठी हल्ला झाल्याचे सिद्ध करण्याचे मोदींना आव्हान दिले. केजरीवालने या हल्ल्याविषयी साशंकता दर्शवून न केवळ लष्कराच्या प्रामाणिकपणावर अविश्वामस दाखविला, तर शूरवीरांचा घोर अवमान केला. पाकच्या दाव्याला अप्रत्यक्षरीत्या पुष्टी देऊन देशाचा हितचिंतक नव्हे, तर पाकचा हस्तक असल्याचे निंदनीय व निषेधार्ह कर्म केले आहे. तिकडे राहुल गांधींनी स्वत: व कॉंग्रेस पक्ष मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे समर्थन केले, तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम् व मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे वादग्रस्त अध्यक्ष संजय निरुपम यांनी या प्रतिहल्ल्यावर शंका व्यक्त केली. कॉंग्रेसच्या सत्ताकाळातही असा प्रतिहल्ला झाल्याचा दावा केला. खरे म्हणाल तर देशाचा प्रश्न् येतो तेव्हा सर्वांनी एकजूट होण्याची आवश्यकता आहे. दुसरा कोणताही विचार मनात यायला नको. आधी देश नंतर राजकारण हा खरा राजधर्म आहे. दुर्दैवाने भारतीय लोकशाहीत त्याचा अभाव आहे. हीच या देशाची मोठी शोकांतिका आहे. भारतीय लोकशाही म्हणावी की घाणेरडेशाही. प्रत्येक घटनेत अकारण केवळ विरोधासाठी राजकारण करण्याचा अभिशाप भारतीय लोकशाहीला लाभला आहे. सर्जिकल हल्ले झाले, संपले. आता राजकारणी स्वार्थी राजकारण करून कर्तृत्वाचा डिंगोरा पिटत आहे. राजनैतिक मुत्सद्दी आपल्या राजनैतिक चालीचे, मुत्सद्देगिरीचे कौतुक करण्यात रममाण झाले आहेत. केजरीवाल, कॉंग्रेससारखे नतद्रष्ट विरोधक नसता वाद निर्माण करून राजकीय वातावरण प्रदूषित करण्याचा केविलवाणा प्रयास करीत आहेत. बाटला हाऊस चकमकीलाही या केजरीवाल महाशयांनी बनावट चकमक म्हणून तेव्हाच आमच्या जवानांचा अपमान केला होता. तो प्रसंग अजून भारतीय विसरलेले नाहीत. एकीकडे भारताचा निष्ठावान, कर्तव्यदक्ष, राष्ट्रभावनेने प्रेरित आमचा शूर सैनिक, ज्याच्या गळा विजयश्रीची देदीप्यमान, गौरवशाली माळा दिमाखाने झळकत असताना त्याच वेळी तो देशसंरक्षणासाठी आपल्या हत्यारांची साफसफाई करण्यात मग्न आहे. त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रसंगी प्राणांची आहुती द्यायला सज्ज आहे. कटिबद्ध आहे. त्याला कोणी शाबासकी देवो अथवा न देवो. अशा या शूरवीरांना मानाचा मुजरा.
जय हिंद, जय जवान, जय भारत
No comments:
Post a Comment