Total Pageviews

Sunday 30 October 2016

सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार हे सर्वसामान्य लोकांच्या हातात असलेलं हत्यार वेळप्रसंगी किती प्रभावी बनू शकतं ह्याचं यंदाच्या दिवाळीतला चिनी बनावटीच्या मालावरचा बहिष्कार हे एक आदर्श उदाहरण आहे


दिवाळीचे फटाके आणायला दुकानात गेले होते. सगळ्या स्टॉल्स मध्ये अनिल, स्टॅण्डर्ड, अनमोल हे भारतीय बनावटीचेच ब्रॅण्ड डिस्प्लेला लावलेले दिसत होते. मी मुद्दाम वेगवेगळ्या तीन-चार स्टॉल्स मध्ये विचारलं, 'फटाके सगळे भारतीयच बनावटीचे आहेत का'? 'ताई आम्ही चायनीज माल ठेवलाच नाही ह्या वर्षी' मला उत्तर आलं. केवळ मीच नव्हे तर फटाके घ्यायला आलेली बहुतेक सगळीच गिऱ्हाइकं थोड्या-फार फरकाने आवर्जून हा एकच प्रश्न विचारत होती, 'फटाके इंडियनच आहेत ना हो'? गेल्या वर्षी चायनीज बनावटीचे फटाके खूप दिसले होते बाजारात, पण घेताना विचारलं तर दुकानदार प्रामाणिकपणे सांगायचे 'चायनीज माल स्वस्त असला तरी चांगला नसतो ताई, अर्धे फटाके पेटतील, अर्धे तसेच राहतील. हा भारतीय माल कसा, वर्षभर तसाच ठेवला तरी पुढच्या वर्षी पटेलच बघा'. ह्या वर्षी एकूणच चायनीज मालाविरुद्ध वातावरण देशात बरंच तापलेलं दिसतंय. समाजातल्या सगळ्याच थरातले लोक कुठलीही गोष्ट खरेदी करताना दुकानदाराला आवर्जून विचारत आहेत की का माल चिनी बनावटीचा तर नाही ना? मग तो आकाश कंदील असो, फटाके असोत किंवा दिव्यांच्या माळा असोत. काल संध्याकाळी एका हार्डवेरच्या दुकानात गेले होते दिव्यांच्या माळा आणायला. दुकानदाराला म्हटलं, 'भारतीयच दाखवा, चिनी नको', तर तो हसला, म्हणाला, 'ह्या वर्षी सगळे हेच म्हणायला लागलेत'. त्याने मला भारतीय बनावटीच्या दिव्यांच्या माळा दाखवल्या. चिनी बनावटीच्या माळा आणि भारतीय बनावटीच्या माळा ह्यांच्या किमतीत सरासरी वीस ते पन्नास रुपयांचा फरक होता, आणि मुख्य म्हणजे भारतीय माळा महाग असूनही लोक त्या विकत घेत होते. तो दुकानदारही मोठ्या आनंदाने भारतीय बनावटीच्या माळा विकत होता. मी माझं सामान घेत असतानाच तिथे अजून एक माणूस आला, 'चांगल्या रंगीत माळा दाखवा राव, पण आपल्याच दाखवा, त्या चिनी नको', तो म्हणाला. दुकानदाराने त्याला दोन-तीन वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांच्या माळा दाखवल्या. 'ह्या नक्की भारतीयच आहेत ना?' एक माळ हाताळत त्याने विचारलं. 'हो. त्या चायनीज माळा त्या बघा बाहेर डिस्प्लेला लावल्यात. त्या दिसताना सुद्धा वेगळ्याच दिसतात', दुकानदाराने सांगितलं. 'तुम्ही ठेवल्यात कशाला चायनीज माळा दुकानात? खरंतर तुम्ही चायनीज माल विकायलाच नाही ठेवला पाहिजे' त्या माणसाने सात्विक संतापाने म्हटलं. दुकानातल्या बाकीच्या गिऱ्हाईकांनी लगेच त्याला दुजोरा दिला. 'काही काही बारीक माळा इंडियन नाही मिळत अजून म्हणून ठेवाव्या लागतात चायनीज माळा. काय करणार'? दुकानदार ओशाळून म्हणाला. 'ह्या वर्षी चायनीजचा डिमांड कमी झालाय का हो'? मी विचारलं. 'हो ताई, खूपच कमी झालाय. जवळ जवळ पन्नास ते साठ टक्के खप घटलाय चायनीज मालाचा. जो येतो तो इंडियनच वस्तू मागतोय', दुकानदार म्हणाला. 'हा सगळा सोशल मीडियाचा परिणाम आहे ताई'. चायनीज वस्तूंचा बहिष्कार ही आता केवळ कवीकल्पना राहिलेली नाही. ह्या दिवाळीत त्या बहिष्काराचा चांगलाच परिणाम बाजारात दिसून येतोय. स्वतः चायनीज दूतावासालाही ह्याबाबत अधिकृत स्टेटमेंट द्यावं लागलं इतका मोठा ह्या बहिष्काराचा आर्थिक परिणाम आहे. अखिल भारतीय विक्रेता संघटनेने तर म्हटलंय की ह्या वर्षी दिवाळीशी संबंधित चायनीज मालाचा खप जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्यांनी घटेल असं त्यांना वाटतंय. चिनी दूतावासाने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलंय की चायनीज मालाचा भारतात बहिष्कार झाला तर त्याचा चीनच्या अर्थकारणावर काहीच परिणाम होणार नाही, कारण भारत ही चीनसाठी मोठी बाजारपेठ नाहीच आहे. चीनचं असं म्हणणं आहे की त्यांच्या एकूण निर्यातीतला फक्त दोन टक्के वाटा भारताचा आहे. पण हे अर्धसत्य आहे, कारण चिनी मालावर घातलेल्या अघोषित बहिष्काराचा परिणाम चिनी निर्यातीवर अगदीच नगण्य असता तर चिनी दूतावासाला असं अधिकृत निवेदन देण्याचा खटाटोप का करावा लागला असता? सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार हे सर्वसामान्य लोकांच्या हातात असलेलं हत्यार वेळप्रसंगी किती प्रभावी बनू शकतं ह्याचं यंदाच्या दिवाळीतला चिनी बनावटीच्या मालावरचा बहिष्कार हे एक आदर्श उदाहरण आहे. -शेफाली वैद्य

No comments:

Post a Comment