दहशतवाद्यांची मुले सुरक्षित कोशात
on: October 02, 2016In: रूपगंधNo Comments
सर्वसामान्य, गरीब काश्मिरी तरुणांची माथी भडकवून त्यांना अक्षरश: गुन्हेगार बनवणाऱ्या आणि दंग्यामधे सामील करून त्यांचे संपूर्ण आयुष्य बरबाद करणाऱ्या नेत्यांनी मात्र त्यांच्या मुलांना डॉक्टर आणि इंजिनिअर बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. यांच्यातील अनेक नेत्यांनी स्वत:ची मुले ही सुरक्षित कोशात ठेवली आहे. या मुलांच्या केसालाही धक्का लागू नये अशी सोय करण्यात आली आहे. या गोष्टी काश्मीरमधील लोकांना आणि खास करून तरुणांना माहीत आहेत का, किंवा त्यांच्यापर्यंत ती पोहोचवली जाते का, ते याबाबत विचार करतात का, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. केवळ स्वतंत्र देश, स्वायत्तता एवढा एकच विचार अठरा-विशीतल्या तरुणांच्या डोक्यात घातला जातो आणि त्यांना मारामाऱ्या, सरकारच्या विरोधात बंड, आत्मघातकी कारवायांसाठी समुपदेशन अशा एक ना अनेक गोष्टींसाठी त्यांच्या हातात आधुनिक शस्त्रास्त्र दिली जातात. मरायला आणि मारायला तयार केले जात आहे.
असे करण्याला भाग पाडणाऱ्या नेत्यांची, सूत्रधारांची मुले आणि कुटुंबिय मात्र मलेशिया, कॅनडा, ब्रिटन आणि अमेरिका या ठिकाणी राहतात. काही जणांची मुले तर चक्क भारतातीलच सुरक्षित शहरांमध्ये म्हणजे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, तर काही उच्चपदावर नोकरीही करत आहेत. नेत्यांच्या या नीतिमत्तेवर “जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’च्या संस्थापकांमधील एक असलेला हाशिम कुरेशीचा मुलगा जुनैद कुरेशी यानेच संशय व्यक्त केला आहे. बंदूक हातात घेणे एवढे आवश्यक आहे, तर स्वत:च्या मुलांच्या हातात ते बंदूक का देत नाहीत, असा प्रश्न त्याने काश्मिरी तरुणांना विचारला आहे. प्रत्यक्षात कोणताही विचार न करता दहशतवादी कारवायात, बंडात, दंगलीत सामील होणाऱ्या काश्मिरी तरुणांनी या बंडखोर नेत्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे, असेही त्याने म्हटले आहे. जुनैद कुरेशी हा त्याच हाशिमचा मुलगा आहे की ज्याने 30 जानेवारी 1971 मध्ये “इंडियन एअरलाइन्स’चे विमान अपहरण करून ते लाहोरला नेले होते. त्यानंतर तेथे प्रवाशांना सोडण्यात आले आणि त्या विमानाला आग लावली होती; परंतु त्यानंतर त्याने दहशतवादी कारवायांचा मार्ग सोडून दिला.
या नेत्यांची मुले जेव्हा थोडी मोठी होतात तेव्हा त्यांना काश्मीरच्या बाहेर पाठवले जाते. जवळपास सर्वच नेत्यांनी असे केले आहे. त्यात तहरिक-ए-हुर्रियतचा नेता सय्यद अली शाह गिलानी, हिज्बुलचा नेता सय्यद सलाउद्दीन, दुख्तरान-ए-मिल्लतच्या आसिया अंद्राबी अशी एकेक नावे घेता येतील. या नेत्यांची मुले कधीही मोर्चांमध्येही सहभागी झाली नाहीत. ती कधीही दंगलीमध्ये नसतात किंवा दहशतवादीही बनत नाहीत.
सन 2008, 2010 मधील दंग्यांची बाब असो किंवा स्वातंत्र्यापासून धुमसत असलेल्या काश्मीरच्या प्रश्नात असो, आजपर्यंत असेच पाहिले गेले आहे की, जेव्हा जेव्हा काश्मीरमध्ये अस्थिर वातावरण निर्माण झाले, त्याचवेळी जर या नेत्यांची मुले जर घरी आली असतील तर त्यांना पुन्हा सुरक्षित कोशात परत पाठवण्यात आले आहे, तसेच येथील वातावरण खराब असतानाही कोणी आपल्या मुलांना काश्मीरमध्ये बोलावले नाही. त्यामुळे प्रत्येक दंग्यावेळी, काश्मीरमधील अस्थिर वातावरणावेळी, लष्करी कारवायांच्यावेळी या नेत्यांची मुले ही काश्मीरच्या बाहेर सुरक्षितच राहिली आहेत.
दुख्तरान-ए-मिल्लत – आसिया अंद्राबी
ऑगस्ट 2015 मध्ये चकमकीत मारल्या गेलेल्या एका दहशतवाद्याला आसिया हे जेव्हा श्रद्धांजली वाहात होते त्यावेळी त्यांचा मुलगा कासिम हा मलेशियामध्ये मित्रांबरोबर फिरण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा फेसबुक स्टेटस’ होता चिलिंग अराऊंड विथ फ्रेण्डस’.
आसिया अंद्राबीला दोन मुले आहेत. मोठा मुलगा मोहम्मद बिन कासिम मलेशिया मध्ये मावशीबरोबर राहतो. मावशी तेथेच नोकरी करते. तो मलेशियामध्ये बॅचलर ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’चा कोर्स करतो. लहान मुलगा श्रीनगरमध्ये शिकत आहे आणि एक भाचा पाकिस्तानी लष्करात कॅप्टन तर दुसरा इस्लामाबाद विद्यापीठात नोकरी करतो.
हिज्बुलचाचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन
सय्यद सलाउद्दीनच्या परिवाराविषयी ऐकले तर सर्वसामान्य भारतीय बेशुद्धच पडेल. सय्यद सलाउद्दीनचा परिवार काश्मीरमध्ये ऐशोआरामात राहतो आणि त्याची तीन मुले चक्क राज्य सरकारच्या सेवेत उच्चपदावर काम करतात. तर तो स्वत: पाकिस्तानात एका सुरक्षित घरामध्ये संपूर्ण संरक्षणात राहतो. त्याला पाच मुले आहेत मोठा मुलगा शकील युसूफ हा श्रीनगरमधील हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सहाय्यक आहे, दुसरा मुलगा जावेद युसुफ हा शिक्षण विभागात, तर तिसरा शाहिद युसूफ हा कृषी विभागात उच्चपदावर आहे. चौथा वाहिद हा “शेर-ए-कश्मीर इस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’मध्ये डॉक्टर आहे, तर पाचवा मुलगा माजिद युसूफ हा “एमटेक’चा विद्यार्थी आहे.
जेकेएलएफ – यासीन मलिक
काश्मीरमधील महिलांना इस्लामिक ड्रेसकोडचे बंधन घालणाऱ्या नाहीतर मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या यासीन मलिक याची पत्नी मात्र परदेशात अतिशय कमी कपड्यात कोणत्याही बंधनाविना वावरताना दिसते. त्याचा पत्नीबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची पत्नी त्या फोटोमध्ये “वेस्टर्न आऊटफिट’मध्ये होती. मुशहाला हुसेन या पाकिस्तानी मुलीबरोबर 2009 मध्ये मलिकचे लग्न झाले. मुशहाला ही “न्यूड पेंटिंज’ची चित्रकार आहे. ती “लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधली पदवीधर आहे. मुशहाला चे वडील एम. ए. हुसेन हे पाकिस्तानातील नावाजलेले अर्थतज्ज्ञ आहेत, तर आई पाकिस्तानात मुस्लीम लीग पक्षाच्या महिला विभागाची प्रमुख आहे. 2012 मध्ये मलिकला मुलगीही झाली.
हुर्रियत नेते
मसरत आलम
मसरत आलमला दोन मुले आहेत. दोघेही वयाने खूप लहान आहेत. ते श्रीनगरमधील एका शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. मसरत हा 2008-10 मधील काश्मीरमधील कारवायांचा मास्टरमाइंड’ आहे.
सय्यद अली शाह गिलानी
सन2010 मध्ये काश्मीर बंद घडवून आणला. काश्मिरी युवकांना हाताशी धरून, त्यांना भडकवून काश्मीरमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण करण्यात या नेत्याचा पुढाकार होता; परंतु जेव्हा गिलानीच्या नातवाने सांगितले की, आमचे करियर धोक्यात आले आहे तुम्ही हा बंद मागे घ्या’. त्यावेळी त्याने केवळ नातवासाठी हा बंद मागे घेऊन दंगे बंद केले होते. गिलानीचा मोठा मुलगा नईम आणि सून बजिया ही पाकिस्तानातील रावळपिंडीत डॉक्टर आहे. लहान मुलगा जहूर हा परिवाराबरोबर दिल्ली येथे राहतो. नातू इजहार हा दिल्लीतील एका खासगी विमान कंपनीत काम करतो तर मुलगी फरहत ही शिक्षिका असून जेद्दाह मध्ये राहते तर भाऊ गुलाम नवी हा लंडनमध्ये राहतो.
मीरवाईज उमर फरूक
मीरवाईज या नेत्याने अमेरिकन वंशाच्या मुस्लीम मुलीशी लग्न केले आहे. तिचे नाव शीबा मसदी असे आहे. त्यांना एक मुलगी असून ती शीबाबरोबर अमेरिकेतच राहते. तिची बहीण सबिया फारुख ही अमेरिकेत डॉक्टर आहे.
मोहम्मद अशरफ सहराई
मोहम्मदला गिलानीचा उत्तराधिकारी मानले जात आहे. मोहम्मद चा मुलगा आबिद हा दुबईमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअर आहे.
गुलाम मोहम्मद सुमजी
गुलामचा मुलगा जुगनू हा दिल्लीमध्ये शिक्षण घेत आहे. याला खूप कोवळ्या वयातच दिल्लीमध्ये एका नातेवाइकाकडे पाठवले आहे. तेथे राहून तो शिक्षण घेत आहे.
दुख्तरान-ए-मिल्लत’ – फरीदा
फरीदा ही दुख्तरान-ए-मिल्लत’ या संघटनेशी संबंधित आहे. तिचा मुलगा रूमा मकबूल हा दक्षिण आफ्रिकेमध्ये डॉक्टर आहे. 2014 च्या निवडणुकांमध्ये फरीदाला अटक झाली होती.
एयाज अकबर
सय्यद अली शाह गुलानी गटाचा असलेला एयाज अकबर हा त्यांच्या गटाचा प्रवक्ता आहे. त्याचा मुलगा सरवर याकूब हा पुण्यात राहून मॅनेजमेण्टचे शिक्षण घेत आह.
– अंजली खमितकर
No comments:
Post a Comment