हिन्दी भाषेत ‘आगबबुला होना’ असा एक वाकप्रचार असून त्याचा नेमका अर्थ समजून घ्यायचा तर ‘ग्लोबल टाईम्स’ या चिनी सरकारच्या अधिकृत माध्यमाकडे नजर वळवायला हरकत नाही. दिसेल तिथे आणि जमेल त्या पद्धतीने भारताची अडवणूक करायची व त्याच वेळी पाकिस्तानची तळी उचलून धरायची या चीनच्या भूमिकेमुळे यापुढे कटाक्षाने चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकावा असे आवाहन करणारी एक मोहीम सध्या भारतात सामाजिक माध्यमांमधून चालविली जात आहे. या मोहिमेमुळे चीनचे पित्त भयानक खवळले असून प्रस्तुत ग्लोबल टाईम्सच्या स्तंभांमधून भारताच्या नावे कडाकडा बोटे मोडली गेली आहेत. ‘भारत केवळ भुंकू शकतो, करु काहीही शकत नाही, तिथे प्रचंड भ्रष्टाचार आहे, पैसे आहेत पण ते सारे भ्रष्टाचारी लोकांनी दडवून ठेवले आहेत, (हे बरीक खरं) वीज-पाणी यांचा पत्ता नाही, नरेन्द्र मोदी यांचे मेक इन इंडियाचे स्वप्न म्हणूनच अव्यहार्य आहे, अमेरिका कोणाचीच मित्र होऊ शकत नाही, तिने केवळ चीनच्या दुस्वासातून भारताला जवळ केले आहे, चिनी उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करण्याचा विचार चुकूनदेखील करु नये’, यासारखी प्रचंड आदळआपट या चिनी माध्यमाने केली आहे. खरे तर चीनने इतके पिसाळून जाण्याचे काही कारण नाही. कदाचित चीनमध्ये लोकशाही नसल्याने तिथे एकदा ठरले की साऱ्यांनी ते आचरायचे आणि नाही आचरले तर गोळी खायची, अशी पद्धत तिथे असल्याने व तसेच काहीसे भारतातही असेल या गैरसमजातून हा आक्रस्ताळेपणा उद्भवला असावा. त्यामुळे चिनी लोकाना कोणी तरी हे सांगायला हवे की, भारतात असे काही नसते. इथे एक साधा पोटभरु सिनेमावाला थेट पंतप्रधानांना माफी वगैरे मागायलाही सांगू शकत असतो. केवळ तेच नाही तर अमुक करु नका असे कोणी सांगितले तर हटकून तेच करायचे ही भारतीय मानसिकता आहे. त्यातून ‘स्वस्त’, ‘फ्री’ आणि ‘फॉरेन’ या तीन शब्दांचे भारतीयांना कमालीचे आकर्षण असते. कोणे एकेकाळी भारतात खुद्द तत्कालीन पंतप्रधानांनी ‘बी इंडियन, बाय इंडियन’ म्हणजे भारतीय बना व भारतीय वस्तू खरेदी करा, असे कळकळीचे आवाहन केले होते. पण ते आवाहन जितक्या सहजतेने घेतले गेले तितक्याच सहजतेने आज चिनी वस्तुंवरील बहिष्काराच्या संदर्भातले आवाहनदेखील घेतले जाणार आहे, याची खात्री चिन्यांना कोणी तरी पटवून दिली पाहिजे. पण सांगूनही ती पटणार नसेल तर चिनी सरकारने आपले काही खास निरीक्षक भारतात पाठवावे. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. या सणात प्रत्येक घरावर लुकलुकणारे चिनी दिवे आणि आकाशकंदील बघितले की निरीक्षकांचे मिचमिचे चिनी डोळेदेखील लकाकून जाती
No comments:
Post a Comment