Total Pageviews

Wednesday, 26 October 2016

चिनी बागुलबुवा By pudhari


| Publish Date: Oct 26 2016 काळ बदलतो तसा जमानाही बदलत असतो. संदर्भही बदलून जात असतात. त्यामुळे एका काळातील कौतुकाची गोष्ट नंतरच्या काळात कालबाह्य होऊन गेलेली असते; पण काही लोकांना काळाबरोबर बदलता येत नाही. साहजिकच अशी माणसे कालौघात बाजूला फेकली जात असतात. जशी माणसे बाजूला पडतात, तसे काही विचार भूमिकाही संदर्भहीन होऊन जात असतात. ते विचार रहात नाहीत, तर अंधश्रद्धा वा समजुती होऊन जातात. मागल्या तीन दशकात असेच जागतिक संदर्भ बदलले आहेत. सोवियत युनियन राहिलेले नाही आणि अमेरिकाही आता जगातली महाशक्ती उरलेली नाही. काही मूठभर जिहादी दहशतवादी अमेरिकेच्या बलाढ्य फौजेला जेरीस आणू शकतात, हे सिद्ध झालेले आहे. म्हणूनच 1970-80 च्या जमान्यातून बाहेर पडून नव्या जागतिक मांडणीच्या चष्म्यातून जगाकडे स्वच्छ नजरेने बघण्याची गरज आहे. चीन तेव्हा होता तितकाच आजही बलशाली असला, तरी तीन दशकांपूर्वी शेजार्‍यांना दमदाटी करणारा चीन, आज तितका मस्तवाल राहिलेला नाही, व्हिएतनामसारख्या इवल्या देशाने काही महिने लढाई करून चीनला गप्प रहायला भाग पाडले, अशी आजची वस्तुस्थिती आहे. म्हणूनच 1962 च्या पराभवातून भारतीयांनी बाहेर पडून, आजच्या चिनी वास्तवाची दखल घेतली पाहिजे. त्यानुसारच त्या देशाच्या बळाचे मूल्यांकन केले पाहिजे. पाकिस्तानच्या पाठीशी चीन उभा आहे म्हणजे काय, त्याचेही मूल्यमापन त्याच नव्या मोजपट्टीने करण्याची म्हणूनच गरज आहे. आज चीन पाकच्या पाठीशी उभा असला, तरी चिनी समाज त्या राजकीय मैत्रीला तितका प्रतिसाद देणारा राहिला नाही. प्रसंगी दहशतवादी संकटाला सामोरे जाण्याची वेळ आल्यास चीनलाही पाकविषयक भूमिका बदलणे भाग पडू शकते. ही निव्वळ कल्पना नाही. चिनी सोशल मीडियाचा कानोसा घेतला तर त्याचीच प्रचिती येत असते. भले चीन अरबांची वा पाकची बाजू घेत असेल; पण सामान्य चिनी माणूस मात्र मोठ्या प्रमाणात जिहादी दहशतवादाच्या विरोधात बोलत असतो. जगभर बोकाळलेल्या हिंसात्मक घातपाती घटनेमुळे तिथे पाकविरोधी भूमिकेलाही मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. किंबहुना त्यामुळेच चिनी लोकसंख्येतला नगण्य वाटणारा मुस्लिम घटक आणि बाकीचे चिनी समाजघटक; यांच्यात वितुष्टाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यात एखाद्या मोठ्या जिहादी घटनेची भर पडली, तर चीनला पाकचे राजकीय समर्थन करणेच अशक्य होऊन जाईल. त्यालाही भारताच्या बाजूने उभे रहाणे भाग पडेल. कारण मोठ्या प्रमाणात चिनी नागरिकच पाकविरोधात मैदानात येऊ शकतील. पाकमधून तशी कलागत काढली जाण्याचा अवकाश आहे. मग चीनच पाकला धडा शिकवण्यापर्यंत कोलांटी उडी मारू शकतो. अलीकडेच जी-20 देशाचे संमेलन चीनच्या झिंगझॅन्ग प्रांतात झालेले होते. तेव्हा पाच देशांतील पर्यटकांना त्या प्रांतातल्या कुठल्याही हॉटेलात प्रवेश देण्यावर बंदी लागू करण्यात आलेली होती. त्यात सीरिया लिबियासह पाकिस्तानचाही समावेश होता. कारण चीनमधील मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात याच झिंगझॅन्ग प्रांतामध्ये वसलेली आहे. चिनी समाजात प्रामुख्याने 56 वंश आहेत. त्यापैकी हान वंशाची संख्या मोठी असून, बाकीचे समाज किरकोळ संख्येने आहेत, त्यापैकी दोन कोटी हुयी आणि उयघुर अशा दोन वंशाचे चिनी प्रामुख्याने मुस्लिम धर्माचे आहेत. ती लोकसंख्या मुख्यत: पश्‍चिम चीनमध्ये आहे आणि त्याच्या दक्षिणेला पाकिस्तान, तर पश्‍चिमेला कझाकस्तान वगैरे देश आहेत. त्याच कझाकस्तानमध्ये असलेल्या चिनी दूतावासावर अलीकडेच जिहादी घातपाती हल्ला झालेला होता. त्यानंतर चिनी सोशल मीडियात प्रक्षोभक प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या. अशा मुस्लिमविरोधी प्रतिक्रिया वा भाषेला चिनी सरकारी अधिकृत माध्यमात प्रतिबंध आहेत; पण सोशल मीडियात खुलेआम जिहाद व मुस्लिमविरोधी भडक प्रतिक्रिया व्यक्त होत असतात. काही प्रतिक्रिया तर मुस्लिम विरोधासाठी इस्रायलचे टोकाचे समर्थन करणार्‍या असतात. त्या जागतिक चिनी राजकारणाला पोषक नसल्याने, त्याला अधिकृत व मुख्य प्रवाहातील माध्यमात प्रतिबंध आहे. तरी सोशल मीडियात जबरदस्त प्रक्षोभक मतप्रदर्शन चालू असते. साहजिकच जगात कुठेही जिहादी घातपात झाला, की चिनी सोशल माध्यमात मुस्लिमविरोधी व प्रामुख्याने चिनी मुस्लिमांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटतात. त्या बघता फार काळ चीनला पाकिस्तानचे समर्थन करण्याची स्थिती आज उरलेली नाही. ही बाजू विचारात घेतली, तर चीनला पाकशी फार काळ राजकीय जवळीक ठेवणे अशक्य होणार आहे. अनेक चिनी मुस्लिम आधीच पाकमधून जिहादचे प्रशिक्षण घेऊन मायदेशी परतलेले आहेत. त्यांना आवर घालताना चीनच्या नाकी दम आला आहे. बलुची स्वातंत्र्यवाद्यांना भारताने चिथावणी देण्याचे डावपेच अलीकडे खेळले, तसाच प्रयोग चिनी हान बहुसंख्येवर करण्याचे काम हाती घेतले; तर चीनला घरचे थोडे होऊन पाकची साथ सोडण्याखेरीज पर्याय उरणार नाही. अजून तरी भारताने तशा काही हालचाली केलेल्या नाहीत; पण तसे काही प्रयत्नही होत नसतील याची आपण हमी देऊ शकत नाही. 15 ऑगस्टपूर्वी बलुची असंतोष भारत हत्याराप्रमाणे वापरण्याच्या सज्जतेत आहे, याची कुणाला खबरबात होती? मोदींनी लालकिल्ल्यावरून बोलताना नुसता उल्लेख केला आणि बलुची बंडाला तोंड फुटले. मग चिनी बागुलबुवा कितीकाळ चालू शकेल?.

No comments:

Post a Comment