हे कधी थांबणार?
Sunday, October 16th, 2016
वाराणसीतल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर तिथे आक्रोश व आकांताचा माहौल आहे. धार्मिक उत्सव किंवा कार्यक्रम होऊ नयेत, भाविकांनी तेथे मोठ्या संख्येने उपस्थित राहू नये असे कोणीही म्हणणार नाही, पण याच गर्दीत एखादी दुर्घटना घडते आणि लोकांचे नाहक जीव जातात. हे कधी थांबणार हाच खरा प्रश्न आहे. गर्दीच्या ठिकाणी दुर्घटना टाळायच्या असतील तर शिस्त पाळा हे ठणकावून सांगायची वेळ आली आहे.
हे कधी थांबणार?
बाबा आणि महाराजांमुळे जगाचे किती कल्याण झाले ते माहीत नाही, पण भोळेभाबडे भक्तगण मात्र नाहक चिरडून मरत असतात. वाराणसीत जे घडले ते भयंकर आणि अस्वस्थ करणारे आहे. बाबा जय गुरुदेव यांच्या जयंतीनिमित्त वाराणसीत पदयात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा जास्त लोक आल्याने चेंगराचेंगरी झाली. राजघाट पुलावर अक्षरश: मृत्यूचे तांडव झाले व पंचवीसच्या वर लोक चेंगराचेंगरीचे बळी ठरले. हे प्रकार देशभरात वाढीस लागले आहेत व या प्रकारांना नक्की जबाबदार कोण? हा प्रश्नदेखील निरर्थक ठरत आहे. धार्मिक कार्य आणि उत्सव साजरे करायला हवेत, पण आपल्याकडे गर्दीवर नियंत्रण राहत नाही. पुन्हा त्याची काळजी अनेकदा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजक घेत नाहीत. येणार्या भक्तांच्या जीवाची काळजी जणू देवालाच आहे असाच सगळा मामला असतो. बरं गर्दी जेवढी जास्त तेवढी कार्यक्रमाची, आयोजकांची महती मोठी असेदेखील आपल्याकडे ठरूनच गेले आहे. संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज अशांनी गर्दीचे आकडे फुगवण्यासाठी समाजकार्य सुरू केले नव्हते. मृत्यूनंतर आपली स्मारके उभारून त्यावर फुले उधळावीत यासाठी आपले क्रांतिकारक फासावर गेले नव्हते. मात्र आता चित्र काय आहे?
अंधश्रद्धेचा बाजार
तर सर्वत्र भरलेला दिसतोच, पण श्रद्धेचा महापूरसुद्धा तडाखे देत असतो व त्यात जीव जातो तो गोरगरीब भक्तांचा. गर्दी करायची व प्रवचने द्यायची हे ठीक आहे, पण या सगळ्याचा ताण शेवटी पोलीस यंत्रणेवर पडतो. २००८ साली हिमाचल प्रदेशच्या नैनादेवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली व १५० भाविक मरण पावले. २०१०च्या मार्च महिन्यात उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील जानकी मंदिरात मोफत कपडे वाटपाचा कार्यक्रम होता. गरीबांनी इतकी गर्दी केली की यंत्रणा कोलमडून पडली व त्या चेंगराचेंगरीत ७० लोक मरण पावले. २०११ च्या जानेवारी महिन्यात केरळच्या शबरीमाला मंदिरात चेंगराचेंगरी होऊन १२० लोक मरण पावले. हरिद्वार, बिहारची छठपूजा, मध्य प्रदेशच्या रतनगढ, अलाहाबाद आणि नाशिक येथील कुंभमेळ्यात यापूर्वी चेंगराचेंगरी होऊन शेकडो लोकांचे प्राण गेले आहेत. सातारच्या मांढरदेवी मंदिराच्या जत्रेतील चेंगराचेंगरीनेसुद्धा असंख्य भक्तांचे बळी घेतले. आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे गेल्या वर्षी गोदातीरी ‘पुष्करम’ या उत्सवासाठी भाविक जमले असताना चेंगराचेंगरी होऊन २७ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. जगभरातील मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या मक्का मदिना येथेदेखील गेल्या वर्षी झालेल्या चेंगराचेंगरीत ७०० भाविकांचा मृत्यू झाला होता. आपल्या देशात तर सण, उत्सव,
धार्मिक कार्यक्रमांना जसा तोटा नाही
तसाच तेथे उसळणार्या गर्दीलाही नाही. त्यामुळेच अत्यंत क्षुल्लक कारणामुळे हलकल्लोळ माजतो आणि चेंगराचेंगरीत अनेकांचे नाहक बळी जातात. शेवटी उत्सव देवांचे असले तरी गर्दी माणसांची असते आणि त्यांच्या सुरक्षेचा ताण मानवी यंत्रणांवरच पडत असतो. बाबा व महाराजांनी रथात किंवा पालखीत बसावे, शेकडो भक्तांनी त्या यात्रेत सामील व्हावे ही खरंच आपली संस्कृती आहे काय, याचे भान ठेवायला हवे. वाराणसीतल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर तिथे आक्रोश व आकांताचा माहौल आहे. हरवलेल्या लहान मुलांचा शोध घेत हतबल आई-बाप फिरत आहेत हे चित्र काळीज फाडणारे आहे. गर्दीचे मानसशास्त्र ज्यांना समजत नाही ते लोक अशा मृत्यूंची जबाबदारी घेणार आहेत काय? असे काही अघटित घडले की त्याची जबाबदारी सरकारवर टाकून मोकळे व्हायचे आणि सरकारनेही मृत व जखमींना मदतीचे आकडे जाहीर करून कार्य सिद्धीस न्यायचे, हे थांबवायला हवे. प्राणापुढे पैशांचे मोल ते काय? धार्मिक उत्सव किंवा कार्यक्रम होऊ नयेत, भाविकांनी तेथे मोठ्या संख्येने उपस्थित राहू नये असे कोणीही म्हणणार नाही, पण याच गर्दीत एखादी दुर्घटना घडते आणि लोकांचे नाहक जीव जातात. हे कधी थांबणार हाच खरा प्रश्न आहे. गर्दीच्या ठिकाणी दुर्घटना टाळायच्या असतील आणि माणसांचे प्राण वाचवायचे असतील तर शिस्त पाळा हे ठणकावून सांगायची वेळ आली आहे.
No comments:
Post a Comment