1962 मध्ये ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ म्हणत चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता. त्यानंतरच्या काळातही बेरक्या चिन्यांचे धोरण भारताला नेहमीच प्रतिकूल राहिले. आता व्यापारीवृत्तीच्या चिन्यांनी भारतासोबत छुपे आर्थिक युद्ध सुरू केलेले आहे. भारतासारखी जगातील बडी बाजारपेठ हस्तगत करण्यासाठी चिनी माल मोठ्या प्रमाणात देशात येत असतो. अलीकडे तर हे प्रमाण डोळ्यांत भरण्याइतके वाढलेले आहे. मोबाईल, फटाके आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून ते गणेश-लक्ष्मी मूर्ती व दिवाळीच्या पणत्यांपर्यंत अनेक तकलादू वस्तू चीनमधून येत असतात. त्यांच्या विक्रीतून आर्थिक लाभ चिन्यांना होतो व भारताच्या या उघड शत्रूला आपणच प्रबळ करीत जातो. त्यामुळे देशभरात सध्या चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची एक मोहीमच सुरू आहे. सोशल मीडियात तर या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अर्थात, सरकारी पातळीवर अधिकृतपणे असा बहिष्कार टाकणे शक्य नसले तरी प्रत्येक नागरिक व्यक्तिगत पातळीवर तो टाकू शकतो. या मोहिमेला व्यापारी आणि ग्राहकांमधून चांगला प्रतिसादही मिळत आहे. राजधानी दिल्लीतील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा आशियातील सर्वांत मोठा बाजार असलेल्या भगिरथ पॅलेसमध्ये चिनी मालाच्या विक्रीत 60 टक्क्यांची घट झाली आहे. व्यापार्यांनी जुन्या ऑर्डर रद्द केल्या असून नव्या ऑर्डर्स नोंदवण्यास नकार दिला आहे. थोड्या महाग असल्या तरी स्वदेशी वस्तूच अनेक ग्राहक खरेदी करीत आहेत. इंदूरमध्ये चिनी मालाच्या खरेदी-विक्रीविरुद्ध तब्बल 21 किलोमीटरची मानवी साखळी तयार करून जनजागृती करण्यात आली. या मोहिमेची झळ थेट चीनमध्ये गेली आहे. तेथे या मोहिमेबद्दल प्रसिद्धी माध्यमांमधून आकांडतांडव केले जात आहे. गांधीजींनी दिलेले बहिष्काराचे हत्यार वापरून आजही आपण चीनसारख्या बलाढ्य शत्रूलाही जेरीस आणू शकतो, हेच यामधून दिसते!
No comments:
Post a Comment