चिनी मालावरील बहिष्कारामुळे किरकोळ मागणीत २० टक्के घट
Friday, October 14th, 2016
नवी दिल्ली, दि. १४ (वृत्तसंस्था) – चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन सोशल साइटच्या माध्यमातून होत असल्यामुळे दिवाळीच्या तोंडावर चिनी मालाच्या किरकोळ मागणीत तब्बल २० टक्के घट झाल्याची माहिती देेशातील व्यापार्यांच्या संघटनेने येथे आज दिली.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) या संघटनेचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी चिनी मालाच्या मागणीबाबत आज येथे माहिती दिली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील विद्युत रोषणाई आणि डेकोरेशनच्या विविध वस्तूंनी देशातील बाजारपेठा ओसंडून वाहत असतात.
चिनी मालावर बहिष्कार घालावा याबद्दल सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे. चिनी वस्तू यापूर्वीच घाऊक बाजारात आल्या आहेत, मात्र चिनी वस्तूंच्या मागणीत किरकोळ विक्रेत्यांकडून २० टक्के घट झाली आहे. चिनी माल ग्राहक घेणार की घेणार नाही या चिंतेत किरकोळ व्यापारी आहेत, असे खंडेलवाल यांनी सांगितले.
जैश ए महम्मद संघटनेचा प्रमुख मसूद अझर याच्यावर बंदी घालण्याच्या संयुक्त राष्ट्रांतील ठरावाला चीनने विरोध केला. याखेरीज अणुपुरवठादार गटात हिंदुस्थानला सदस्यत्व देण्यासही चीनने विरोध केला. त्यामुळे सोशल मीडियातून चीनच्या मालावर बहिष्कार घाला, असे आवाहन करण्यात येत आहे.
चिनी मालावर बहिष्कार घालण्याच्या लोकांच्या भूमिकेचा आपली व्यापारी संघटना (सीएआयटी) आदर करील, असे खंडेलवाल यांनी सांगितले
घाऊक विक्रेत्यांकडील चिनी वस्तू काही काळात विकल्या जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे, अन्यथा विक्रेत्यांचे पैसे या चिनी वस्तून गुंतून राहतील, असे मत खंडेलवाल यांनी व्यक्त केले.
- See more at: http://www.saamana.com/desh-videsh/chini-malavaril-bahishkaramule-kirkol-magnit-20-ghat#sthash.LPx6Azxe.dpuf
No comments:
Post a Comment