त्या’ पोलिसांच्या मुलांनी अन्न सोडले
Sunday, October 16th, 2016
आधी आमच्या बाबांना आणा
उपनिरीक्षक राठोड, पोलीस नाईक माळी यांच्या घरात सन्नाटा
ठाणे, दि. १५ (प्रतिनिधी) – बेल वाजली की बाबा… असे ओरडत मुले धावतात, पण दारात दुसरेच कोणी असते. मुले हिरमुसतात… मुलांना सांगायचे काय, त्यांची समजूत कशी काढायची, असा प्रश्न धर्मांधांच्या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड आणि पोलीस नाईक पंढरीनाथ माळी यांच्या कुटुंबीयांना पडला आहे. त्यांच्या घरात पसरला आहे सन्नाटा… गेल्या चार दिवसांपासून बाबा घरी आले नाहीत. ते दिसत नाहीत यामुळे या चिमुकल्यांचे चेहरे कोमेजून गेले आहेत. त्यांनी अन्नही सोडले आहे. त्यांची नजर भिरभिरतेय ती त्यांचे बाबा शोधण्यासाठी…
भिवंडीत मोहरमच्या मिरवणुकीत दंगल घडवून पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकणार्या धर्मांधांच्या हल्ल्यात सात पोलीस जखमी झाले आहेत. त्यातील शांतीनगर पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेले उपनिरीक्षक संजय राठोड आणि पोलीस नाईक पंढरीनाथ माळी यांच्या अंगावर पेट्रोल बॉम्ब फुटले आणि हे दोन पोलीस होरपळून गेले. राठोड हे ३० टक्के तर माळी ४१ टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर नवी मुंबईतील बर्न सेंटर रुग्णालयात शर्थीचे उपचार सुरू आहेत.
घरातल्या कर्त्या पुरुषावर झालेल्या या निर्घृण हल्ल्यामुळे या दोन्ही पोलिसांची कुटुंबे हादरून गेली आहेत. राठोड यांचे कुटुंब ठाण्यातील खारकरआळी येथे राहते, तर माळी यांचे कुटुंब कळव्यातील खारेगाव येथे राहते. राठोड यांना सहा वर्षांची श्रावणी आणि चार वर्षांचा आदित्य अशी दोन मुले आहेत. माळी यांना १० वर्षांचा पारस तर १२ वर्षांची मंजुषा अशी दोन मुले आहेत.
राठोड यांची मुले तर चिमुकली आहेत. चार दिवस बाबा घरी का आले नाहीत? कुठे गेलेत आमचे बाबा? त्यांना आधी घरी घेऊन या असा धोशा त्यांनी लावला आहे. राठोड यांची पत्नी राजश्री यांच्या डोळ्यांतील अश्रूंना खंड नाही. राठोड यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नाही. चिमुकले श्रावण आणि आदित्य मात्र आईकडे बघतात, तिचे अश्रू पुसतात. आई का रडते हे कळण्याचेही त्यांचे वय नाही. दारावरची बेल वाजली की बाबा… असे म्हणत ते दरवाजाकडे धावतात. राजश्री यांच्या जाऊबाई त्यांना आधार देत आहेत. श्रावणी आणि आदित्य यांना त्यांचे बाबा भरवायचे. बाबांनी भरवल्याशिवाय जेवणार नाही असा हट्ट करीत या चिमुकल्यांनीही अन्न सोडले आहे. तुम्ही हा घास खा, मग मी तुम्हाला बाबांना भेटण्यासाठी घेऊन जाईन असे खोटे सांगत राजश्री यांच्या जाऊबाई मुलांना बळेच भरवत आहेत.
नंतर फोन करतो… पण फोन आलाच नाही
बुधवारी सायंकाळी ७ वाजता माळी यांच्या पत्नी मीनाक्षी यांनी त्यांना फोन केला, तेव्हा मी नंतर फोन करतो, इथे काहीतरी गडबड सुरू आहे असे सांगून त्यांनी फोन कट केला. रात्री १० वाजता मीनाक्षी यांनी पुन्हा फोन केला तेव्हा माळी यांच्या सहकार्याने तो घेतला आणि पंढरीनाथ हल्ल्यात जखमी झालेले आहेत. त्यांना हॉस्पिटलला नेत आहोत असे सांगून फोन कट केला. त्या रात्री माळी यांचे अन्य नातेवाईक घरी धावत आले आणि त्यांनी मीनाक्षी यांना आधार दिला, पण आई सांगना बाबांना काय झालंय, त्यांना बघायला घेऊन चल असा हट्ट रात्रभर करत होती. त्या दिवसानंतर रोज ही मुले दरवाजाकडे डोळे लावून आपले बाबा कधी येतील याची वाट पाहत आहेत. माळी ड्युटीवरून घरी आले की मुलांना जेवायला घेऊन बसत. गेल्या चार दिवसांत त्यांच्या मुलांनी अन्नाला हातही लावलेला नाही. आत्या, मामा, काका त्यांची समजूत काढत दोन घास खाण्याचा आग्रह करतात.
माझ्या पतीवर पेट्रोल बॉम्ब फेकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करणार्या नराधमांना अटक झाली आहे. त्यांना सोडवण्यासाठी आता प्रयत्न होतील. त्यांना जामीन देऊ नका, त्यांना भरचौकात तुडवून मारा.
– राजश्री राठोड
पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत मग त्यांच्यावर हल्ले का होतात? आमचा माणूस सकाळी ड्युटीवर गेल्यावर संध्याकाळी सुखरूप घरी येईल की नाही याचीच चिंता आम्हाला असते आणि आता तेच घडलंय.
– मीनाक्षी माळी
- See more at: http://www.saamana.com/mainpage/tya-polisanchya-mulani-anna-sodle#sthash.LYVEujCy.dpuf
No comments:
Post a Comment