Total Pageviews

Saturday, 15 October 2016

स्मार्ट हेरगिरी

स्मार्ट हेरगिरी September 11, 20160138 Share on Facebook Tweet on Twitter मुळात ‘भ्रमणध्वनी’ या संपर्क साधनाने लोकांना वेड लावलेलच आहे. त्यात आता ‘स्मार्टफोन’ या नव्या प्रकाराने ते वेड आणखीच वाढलेले आहे. इतकी असंख्य ऍप्लिकेशन्स या स्मार्टफोनवर उपलब्ध असतात की, वेड न लागलं तर नवल! आता ह्या ऍप्लिकेशन्सचे आणखी नवनवे प्रकार आपल्या फोनमध्ये उपलब्ध करून देण्याची वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. त्यात ‘झाओमी’ या चीनी मोबाईल कंपनीने खूपच धडक मारली आहे. साधारणपणे माणूस एखाद्या दुकानात जातो नि सतरा प्रकारचे भ्रमणध्वनी उलटेपालटे करून पाहतो आणि मग आपल्या सोईनुसार एखादा खरेदी करतो. जमल्यास किंमत कमी करूनही मागतो. पण, झाओमीचे मोबाईल असे मिळत नाहीत. निदान भारतात तरी, झाओमी कंपनीची ‘रेड मी वन एस’ आणि ‘एम आय- ३’ ही दोन मॉडेल्स् फ्लिपकार्ट या ऑनलाईन संकेतस्थळावरूनच मिळू शकतात. कंपनीने आतापर्यंत ही दोन्ही मॉडेल्स् अनुक्रमे ५ लाख ८० हजार आणि ९५ हजार एवढ्या संख्येत विकली आहेत. लोकांना झाओमीची ही दोन्ही मॉडेल्स् भलतीच पसंत पडली आहेत. कारण, इतर स्मार्टफोन्स्‌पेक्षा त्यांच्यामध्ये जास्त ऍप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. शिवाय, त्यांचा दर्जाही अधिक चांगला आहे. जगभर सर्वत्र त्यामुळेच झाओमी कंपनीला ‘चायनीज ऍपल’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. जगभरात अनेक नामवंत सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. पण, स्टीव्ह जॉब्सच्या ‘ऍपल’ या कंपनीच्या नावाला एक वेगळंच वजन, एक वेगळाच मान आहे. तर, या चिनी ऍपल झाओमी कंपनीने भारतातल्या अनुकूल प्रतिसादामुळे प्रोत्साहित होऊन भारतीय बाजारपेठेत आता ‘रेड मी नोट’ आणि ‘एम आय-४’ ही आणखी नवी मॉडेल्स् उतरवायचं ठरवलं आहे. झाओमी स्मार्टफोनच्या नानाविध सुबक ऍप्लिकेशन्सवर पब्लिक अगदी फिदा आहे. पण, त्यात काही दोष आहेतच. एक म्हणजे, हा फोन लवकर तापतो आणि बोलण्याचा कालावधी वाढत गेल्यावर बोलण्या- ऐकण्याच्या प्रवाहात अडथळे येऊ लागतात. हे अगदी उघड दोष झाले. पण, वापरणार्‍या सर्वांना, खोल कुठेतरी अशी जाणीव होते की, माझा ‘यूझर डेटा’ कोणीतरी पाहतंय्, कोणीतरी ऐकतंय्. आणि आता भारतीय हवाई दलाने चक्क एक परिपत्रकच काढून आपले कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना सावध केलंय् की, झाओमी कंपनीचे तथाकथित सर्वसामान्यांना परवडणारे स्मार्टफोन्स हे कॅरियर नेम, फोन नंबर, डिव्हाईस आयडेंटीफायर, ऍड्रेस बुकमधले नंबर्स आणि टेक्स्ट मॅसेजेस् या सर्व गोष्टी आपल्या बीजिंगमधल्या मुख्यालयाकडे फॉर्वर्ड करतात. म्हणजेच, झाओमी कंपनीचा प्रत्येक स्मार्टफोन हा एक हेर आहे आणि तो तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या बॉसकडे पाठवतो आहे. पूर्वी स्टॅलिनच्या काळात सोवियत रशियाच्या के.जी.बी. या गुप्तहेर खात्याने हेरगिरीची एक अत्यंत अभिनव, पण निर्दयी अशी पद्धत शोधून काढली होती. नवरा आणि बायको एकमेकांवर नजर ठेवायचे, पालक आणि मुलं एकमेकांवर नजर ठेवायचे, शिक्षक-प्राध्यापक आणि विद्यार्थी एकमेकांवर नजर ठेवायचे, अधिकारी आणि कर्मचारी एकमेकांवर नजर ठेवायचे. साम्यवादी राजवटीविरुद्ध तोंडाने ब्र काढणं सोडा, तसा विचार मनातल्या मनात कुणी केला, तरी केजीबीला तो कळायचा आणि मग तो माणूस एकदम नाहीसाच व्हायचा. आता चीनची ही हेरगिरी त्याच्याही पुढची आहे. हल्ली गंंमतीने असं म्हटलं जातं की, मोबाईल फोन हा तुमच्या अंडरवेअरसारखाच आहे. एक म्हणजे, तुम्ही त्याच्यावाचून राहू शकत नाही. मग आता तुमचा अंडरवेअरच तुमच्यावर हेरगिरी करू लागला आणि तुमच्या सर्व गोष्टी कुणी तिसर्‍या माणसाला कळवू लागला, तर तुमच्या जीवनाचं खाजगी असं राहिलंच काय? आपल्याकडे संतांनी एक फार उत्तुंग कल्पना मांडलीय्. माणूस जे जे म्हणून काम करतोय्, ते परमेश्‍वर पाहतोय्. कितीही लपूनछपून एखादं काम पूर्ण केलं, तरी सर्वव्यापी ईश्‍वरापासून ते गुप्त राहूच शकत नाही. कविवर्य जयदीश खेबुडकरांनी एका सुंदर गीतात ही कल्पना मांडताना म्हटलंय्- ‘आभाळाचा डोळा सारे, खेळ तुझे पाही सावधान होई वेड्या, सावधान होई. साधुसंत सांगून गेले, त्याचा बोध घेई, सावधान होई वेड्या, सावधान होई…’(राम कदमांच्या संगीत दिग्दर्शनाखाली खुद्‌द देशपांंड्यांनी हे गीत गायलंय्) पण, सर्वव्यापी ईश्‍वराच्या आभाळाच्या डोळ्यांची ही जागा, आज चीन घेऊ पाहतोय् आणि तुम्ही पुण्य करताय् की पाप करताय्, यात त्याला काही रस नाहीये्. त्याला रस आहे, तुमच्या लष्करी, हवाई नाविक दलात काय चाललंय् यात! त्याला रस आहे, तुमच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक जगात काय चाललंय् यात. त्याला रस आहे, तुमच्या व्यापार आणिा आर्थिक क्षेत्रात काय चाललंय् यात. चीनला जागतिक महासत्ता बनायचंय्. आज यासाठी त्याची स्पर्धा मुख्यत: अमेरिका आणि नंतर रशिया व युरोपिय प्रगत देशांशी असली, तरी तो भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यातही जोपर्यंत भारतात नेभळट आणि अस्मिताविहीन अ-राष्ट्रीय लोकांची सत्ता होती, तोपर्यंत भारताची दखल घेण्याचं कारण नव्हतं. पण, आता तसं करून चालणार नाही, याची चीनला जाणीव आहे. त्यामुळेच ही स्मार्ट हेरगिरी किंवा सायबर हेरगिरी वाढत चालली आहे. आता या सायबर हेरगिरी प्रकाराची गंमत अशी आहे की, चीनने भारतात किंवा जगभर चालवलेली ही हेरगिरी हा काही नवा उपक्रम नाही. हे उद्योग अमेरिका आणि युरोपिय देश पार शीतयुध्द काळापासून करतातच आहेत. १९४५ साली दुसरं महायुध्द संपलं. ते संपेपर्यंत ब्रिटन-फ्रान्स-अमेरिका-रशिया यांच्या युतीविरुद्ध जर्मनी-इटली-जापान असं चित्र होतं. पण, जर्मनी-जपान-इटलीचा पराभव आल्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यात आता जगावर वर्चस्व कुणाचं, अशी स्पर्धा लागली. या स्पर्धेने प्रत्यक्ष युध्दाचं स्वरूप घेतलं नाही, पण सतत एकमेकांवर राजकीय, औद्योगिक, वैचारिक कुरघोडी करण्याचे त्यांचे प्रयत्न अखंड सुरू राहिले. त्यालाच म्हणतात युद्ध! या युद्धातला फार महत्त्वाचा भाग म्हणजे, सर्वच क्षेत्रातल्या एकमेकांच्या गुप्त बातम्या काढणं, हा होता. वर्षे उलटत गेली. विज्ञान आणखी पुढारत गेलं. संदेशांची देवाणघेवाण अधिकाअधिक सुंलभ होत गेली. १९७० साली तर हे शीतयुद्ध अगदी कळसाला पोहोचलं. तेव्हा, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा ऑष्ट्रेलिया आणि न्यूझिलंड या पान देशांच्या गुप्तहेर खात्यांनी एकत्रितपणे एक यंत्रणा निर्माण केली. तिचं सांकेतिक नाव होतं- ‘फाईव्ह आईज्!’ म्हणजे पाच नेत्र. या पाच डोळ्यांनी सोवियत रशियानी आणि त्यांंच्या मित्र देशांवर सतत नजर ठेवायची होती. नंतरच्या काळात अमेरिकेने अक्षरश: असंख्य उपग्रह गुप्तपणे अवकाशात पाठविली. हे उपग्रह पृथ्वीवरून प्रक्षेपित होणारा प्रत्येक दृक अथवा श्राव्य संदेश पकडू शकतात. म्हणजेच ‘फाईव्ह आईज्’ यंत्रणेपासून पृथ्वीवरची कोणतीही गोष्ट गुप्त राहूच शकत नव्हती. पुढच्या काळात संगणक, ई-मेल या गोष्टी जगभर सर्वत्र सर्रास प्रचलित झाल्या. लवकरच त्यात मोबाईल फोनची भर पडली. तेव्हा, या देशांनी ‘फाईव्ह आईज्’ यंत्रणेला पूर्णपणे आत्याधुनिक स्वरूप दिलं आणि नाव ठेवलं- ‘इचेलॉन!’ या यंत्रणेपसून जगातील कोणतीही गोष्ट गुप्त राहू शकत नाही. समजा, तुम्ही हे काम पंचवीस मजली टॉवरच्या बेसमेण्टमध्ये तुमची गाडी पार्क करताय्, तर उपग्रहाचा डोळा वरच्या पंचवीस मजल्यांच्या भिंतींचा भेद करीत हे दृश्य पाहू शकतो. हे तंत्र आता इतलं सुलभ झालं आहे की, मध्यंतरी अमेरिकेने ते भाड्याने कुणालाही उपलब्ध करून दिलं होतं. त्याचा गैरफायदा घेऊन काही आचरट, आंबटशौकी लोकांनी एका अमेरिकन नटीच्या बाथरूममधील दृष्याची व्हिडीओ क्लिप काढून ती ई-मेलद्वारे जगभर फिरवली होती. असो. २००९ साली हॉलिवूडने या हेरगिरीवर ‘इचेलॉन कॉन्स्पिरसी’ नावाचा चित्रपटच काढला. गंमत म्हणजे, अमेरिकन हेरखातं ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ उर्फ एनएसएचा एक अधिकारी एडवर्ड स्नोडेन याने या चित्रपटापासून स्फूर्ती घेऊन आपल्याजवळचा सायबर डेटा सर्वत्र प्रसारित केला. अमेरिकेने स्नोडेनला देशद्रोही घोषित केल्यावर त्याने रशियात राजकीय आश्रय घेतला. स्नोडेन प्रकरण आणि चीन व इस्लामी अतिरेक्यांचा वाढता उपद्रव यामुळे ‘फाईव्ह आईज्’ गटाने आपला विस्तार केला आहे. मूळ पाच देशांखेरीज आता यात फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, नॉर्वे, नेदरर्लंड, बेल्जियम, इटली, स्पेन आणि स्वीडन हे नऊ देश सामील झाले आहेत. आता अधिकृतपणे या यंत्रणेचं नाव ‘फोर्टीन आईज्’ असं ठेवण्यात आलेलं आहे. थोडक्यात, अमेरिका आणि पश्‍चिम युरोप पुन्हा एकत्र आले आहेत. अमेरिका, रशिया, पश्‍चिम युरोपीय देश, चीन किंवा इस्लामी देश एकमेकांचं जे काही करायचं ते करोत, आपण आपल्या सायबर सुरक्षेची काळजी घ्यायलाच हवी. त्यासाठीच भारताने इलेक्ट्रानिक्स क्षेत्रातला आशिया खंडातला प्रगत देश जपान याच्याशी हातमिळवणी केलेली आहे. जपान आणि चीन यांचं फार जुनं हाडवैर आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र! वैयक्तिकरीत्या आपण घ्यायची काळजी म्हणजे, कोणतीही चिनी उत्पादनं ऑनलाईन खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या कंपन्या नीट तपासून घ्या. ऑनलाईन कंपन्या मागणी नोंदवून घेताना तुमच्या वैयक्तिक जीवनातले अनेक बारीक-सारीक तपशील विचारत असतात. उदा. तुमच्या आईचं मेडन नेम म्हणजे लग्नापूर्वीचं माहेरचं नाव काय? आता आमच्या नावाशी यांना काय करायचंय्? तुमचा माल द्या, पैसे घ्या की विषय संपला..! तेव्हा मुळातच ऑनलाईन खरेदी करायची का, हे ही ठरवून घ्या.

No comments:

Post a Comment