कोणत्याही देशाच्या विकासाचे, प्रगतीचे एक द्योतक म्हणून क्रीडा क्षेत्राकडे पाहिले जाते. क्रीडा, शिक्षण, उद्योग यांच्या विकासावरून त्या देशाने जागतिकस्तरावर किती प्रगती केली आहे, हे लक्षात येते. असे असूनही भारतामध्ये क्रीडा क्षेत्राकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही. विशेषतः, प्रगत देशांची तुलना करता ही बाब अधिक प्रकर्षाने जाणवते. क्रीडाविश्वातल्या सर्वोच्च ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं-वहिलं वैयक्तिक पदक मिळवून देणार्या खाशाबा जाधव यांना हेलसिंकीवारीसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना, राज्य सरकार किंवा अन्य कोणाकडूनच मदत उपलब्ध होऊ शकली नाही. राजाराम महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य जाधव यांनी स्वत:चे घर गहाण टाकून खाशाबा यांचा खर्च उचलला. या मदतीला जागत खाशाबांनी पदकाची कमाई केली. मात्र, मायदेशी परतल्यावर त्यांचे स्वागतदेखील झाले नाही.
1983 चा विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेट प्रेमाचा ज्वर वाढण्यास सुरुवात झाली. तो इतका वाढत गेला की, मधल्या काळात इतर खेळ नामशेष होतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, कपिल देव यासारखे खेळाडू युवकांचे आदर्श बनले. सुरुवातीच्या काळात क्रिकेटमध्ये फारसा पैसा नव्हता. परंतु, नंतरच्या काळात यामध्ये पैसा आला आणि त्यापाठोपाठ राजकारणही आले. गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलसारख्या स्पर्धांना सुरुवात झाली आणि त्या माध्यमातून नवोदित क्रिकेटपटूंना चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले. तसेच पैसाही मिळू लागला. त्यामुळे क्रिकेटविषयीचे प्रेम अधिक वाढत गेले. आज त्याच धर्तीवर कबड्डी लीगही तयार झाली आहे आणि त्यातून अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेला हा क्रीडा प्रकार आता चांगलाच लोकप्रिय होत आहे. कबड्डीसारख्या खेळाला मोठे ग्लॅमर मिळवून देण्याचे काम प्रो -कबड्डी लीग या स्पर्धेने केले आहे. अस्सल देशी मानल्या गेलेल्या या खेळासाठी स्टार या विख्यात विदेशी दूरचित्रवाणी वाहिनीने प्रायोजकत्व घेतल्याचे अनेकांना अप्रूप वाटत आहे. अभिषेक बच्चनसारखा कॉन्व्हेंट संस्कृतीत वाढलेला अभिनेता या स्पर्धेत एका संघाची खरेदी करतो आहे, हे दिसल्यावर अनेक नामवंत मंडळी या स्पर्धेतील संघांची खरेदी करण्यास पुढे आली. त्यामुळे या स्पर्धेला मोठे ग्लॅमर मिळाले. या स्पर्धेचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे.
दुसरीकडे, गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये ऑलिम्पिकसारख्या जागतिक पातळीवरील स्पर्धांविषयीचे आकर्षणही वाढले आहे. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी केलेली आहे. अंजली भागवत, धनराज पिल्ले, वीरधवल खाडे, अपर्णा पोपट अशी अनेक नावे सांगता येतील. ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणार्या कविता राऊत या धावपटूने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावून महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंचावले. देविंदर वाल्मीकी या महाराष्ट्राच्या खेळाडूला रिओ ऑलिम्पिकसाठीच्या भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ललिता बाबर या अॅथलिटने महिलांच्या 3,000 मीटर स्टिपलचेस शर्यतीच्या फायनलमध्ये धडक दिली. या टप्प्यापर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय अॅथलिट ठरली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावची कन्या प्रार्थना ठोंबरेला यंदा टेनिस दुहेरीत सानिया मिर्झासह सहभागी होण्याची संधी मिळाली. रोईंग अर्थात नौकानयन हा तर क्रीडा प्रकार आहे हेच मुळात अनेकांना माहीत नसेल. परंतु, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातल्या तळेगाव रोही गावचा रहिवासी असलेल्या दत्तू बबन भोकनाळने आपल्या प्रयत्नांच्या जोरावर ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला. ऑलिम्पिकच नव्हे, तर अनेक जागतिक नामांकित स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चमक दाखवत आहेत. त्यामुळेच अलीकडील काळात क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे.
वस्तुतः, भारतामध्ये क्रीडाकौशल्याची वानवा नाही. ही बाब अलीकडील काळात पुरेशी आणि नव्याने स्पष्ट झाली आहे. बॉक्सिंग, टेनिस, नेमबाजी, धावणे आदी क्रीडा प्रकारांमध्ये तरबेज असणारे अनेक क्रीडापटू केवळ आर्थिक पाठबळ आणि प्रसिद्धीअभावी अडगळीत पडून राहिलेले होते. अलीकडील काळात काळोखात गेलेले हे प्रकाशदिवे उजळू लागले आहेत. त्यांच्या प्रकाशामुळे भारतीय क्रीडा क्षेत्र झळाळून निघाले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमुळे त्यांच्या क्रीडाकौशल्याला व्यासपीठे उपलब्ध झाली आहेत आणि या संधीचे सोने करत भारतीय क्रीडापटूंनी जागतिकस्तरावर आपला ठसा उमटवत देशाचे नाव उंचावले आहे. यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, महिला खेळाडूंचे यश. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तर केवळ पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक या दोन तरुणींनाच पदक पटकावता आले होते. सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी करत पदकांची लूट चालवली असली, तरी त्यामध्येही महिला खेळाडूंचा वरचष्मा दिसून येतो. या स्पर्धेत 218 भारतीय खेळाडू सहभागी झालेले आहेत. या स्पर्धेत 71 देश सहभागी असून, एकूण 6,600 हून अधिक खेळाडू आहेत.
भारताच्या महिला टेबल टेनिस संघाने सिंगापूरच्या संघावर 3-1 अशी मात करत राष्ट्रकुल स्पर्धेतले पहिले सुवर्णपदक पटकावले. या विजेत्या भारतीय संघात ठाण्याच्या मधुरिका पाटकरचा समावेश होता. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. मणिपूरच्या संजिता चानूनेही महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत 53 किलो वजनी गटात निर्विवाद वर्चस्व गाजवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. यापूर्वी 2014 ग्लास्को राष्ट्रकुल स्पर्धेत 48 किलो गटामध्ये सुवर्ण कामगिरी केली होती, तसेच गतवर्षी पार पडलेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेतही तिने सुवर्णपदकावर नाव कोरले होते. भारताच्या हिना सिद्धूने राष्ट्रकुलमधील नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. या रुपेरी यशावर तिने सुवर्ण कळस चढविला आहे. 28 वर्षीय हिनाने गेल्यावर्षीच्या वर्ल्डकप स्पर्धेत मिश्र सांघिकमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत हिनाने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तूल सांघिकमध्ये सुवर्ण, तर वैयक्तिकमध्ये रौप्यपदक मिळवले होते. राष्ट्रकुलमधील एकूण चार पदके तिच्या नावावर जमा आहेत. एशियन गेम्समध्ये तिने आतापर्यंत एक रौप्य आणि एक ब्राँझपदक मिळवले आहे. गेल्यावर्षी ब्रिस्बेनमध्ये झालेल्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत तिने 10 मी. एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. स्क्वॅशसारखा खेळ आजही भारतात अनेकांना परिचित नाही. मात्र, या क्रीडा प्रकारात महिला दुहेरीत ज्योश्ना चिनप्पा-दीपिका पल्लीकल जोडीने विजयी सलामी दिली.
राष्ट्रकुल स्पर्धेत 18 वर्षीय दीपक लाथेरने पुरुषांच्या 69 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले. दीपक हा शेतकरी कुटुंबातून आलेला आहे. यापूर्वी आशियायी चॅम्पियनशिपमध्ये दीपकने एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली होती, तसेच दोन वर्षांपूर्वी वेटलिफ्टिंगचा राष्ट्रीय विक्रमही त्याने आपल्या नावे केला होता. या स्पर्धांमध्ये रौप्यपदकाची कमाई करत कर्नाटकच्या गुरुराजाने भारताचे खाते उघडले. 56 किलो वजनी गटामध्ये 294 किलो वजन उचलून गुरुराजाने रौप्य पटकावले. देशाचे नाव उंचावणारा गुरुराजा हा कर्नाटकच्या कस्बे कुंडुपारा या छोट्या खेड्यात राहतो. 2010 मध्ये वेटलिफ्टिंग करिअरला सुरुवात करणार्या गुरुराजाचे आयुष्य खूप संघर्षमय राहिले. गुरुराजाचे वडील चालक असून, त्यांना आठ मुले आहेत. गुरुराजा हा त्यांचा पाचवा मुलगा. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सुरुवातीच्या काळात गुरुराजाला अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागले. एका वेटलिफ्टरला लागणारा खुराकही त्याला मिळत नसे. अशा परिस्थितीतही त्याच्या वडिलांनी त्याला नेहमी साथ दिली. खेळासाठी नेहमी प्रोत्साहित केले. अशा कठीण परिस्थितीवर मात करून गुरुराजाने मिळवलेले हे पदक नक्कीच कौतुकास्पद आहे. अशाच प्रकारे भारताची आंतरराष्ट्रीय ख्यातीची नेमबाज मनू भाकरने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. मनूची कहाणीही अशीच संघर्षमय आहे. खेळताना झालेल्या दुखापतींमुळे आईने क्रीडा क्षेत्राचे दरवाजे तिच्यासाठी बंद केले होते. मात्र, मर्चंट नेव्हीमध्ये असणार्या वडिलांनी मनूच्या हातात पिस्तूल दिली. तिला नेमबाजीत तरबेज बनवण्यासाठी वडिलांनी नोकरी सोडून दिली.
हा सर्व यशाचा आलेख पाहिला की, देशातील क्रीडा क्षेत्राला कशाप्रकारे बहर येत आहे, हे लक्षात येते. मोदी सरकारने खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत एक क्रीडा महोत्सव अलीकडेच पार पडला. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून चार हजारांच्या वर खेळाडू यात सहभागी झाले होते. क्रीडा संस्कृतीला खर्या अर्थाने चालना देणारा हा निर्णय आहे. आर्चरी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युडो, कबड्डी, खो-खो, नेमबाजी, जलतरण, व्हॉलीबॉल, कुस्ती या क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना वेगळे आणि अत्यावश्यक व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी, गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून विविध स्वरूपाचे क्रीडा पुरस्कार दिले जातात. गावा-शहरांमध्ये राजकीय नेते मंडळींकडून तालीम, जीमची उभारणी केली जाते. तसेच शालेय शिक्षणापासून ते सरकारी नोकरीपर्यंत क्रीडापटूंना सवलतही दिली जाते. अर्थात, परदेशांच्या तुलनेने विचार केल्यास हे प्रमाण नक्कीच कमी आहे. पाश्चिमात्य संस्कृतींनी लहानग्या बालकांच्या खेळाचे महत्त्व एकोणिसाव्या शतकापासून ओळखलेले आहे. खेळ हे शिक्षणाचे अतिशय प्रभावी माध्यम असल्याचे पाश्चिमात्य जगात मान्य झालेले आहे. अमेरिकन लोकांमध्ये खेळाचे वेड आहे. तेथे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना अत्यंत उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिले जाते. टेनिससाम्राज्ञी स्टेफी ग्राफने जेव्हा हातात रॅकेट पकडले, तेव्हा ती अवघी दोन वर्षांची होती. भारतात मात्र खेळ आणि काम हे एकमेकांपेक्षा वेगवेगळेच असल्याचे मानले गेले होते. हळूहळू ही परिस्थिती बदलत आहे. येत्या काळात याबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल आणि इतर देशांप्रमाणेच आपल्याकडेही क्रीडा संस्कृती रुजेल अशी अपेक्षा ठेवूया
No comments:
Post a Comment